Tuesday, 21 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 21 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

नीट पेपरफुटी प्रकरणासह इतर मुद्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज सलग दुसर्या दिवशी बाधित झालं.

लोकसभेत कामकाज सुरु झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र विरोधी पक्ष सदस्यांनी नीट पेपफुटीचा मुद्दा उपस्थित करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सदस्यांनी शांततेत कामकाज सुरु ठेवावं, असं आवाहन अध्यक्षांनी केलं, मात्र गदारोळ सुरुच राहिल्यानं कामकाज सुरवातीला १२ वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काल दिल्लीत झालेल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरुन झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय पक्षाची 'मंगल मिलन' बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत संसदेचं कामकाज सुरळीत आणि प्रभावीपणे चालवण्यासाठीची रणनीती तसंच विविध संसदीय विषयांवर चर्चा करण्यात आली.

भविष्यात परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत केल्याची माहिती, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई करून देशातल्या युवकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या सरकारच्या निर्धाराचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. अलीकडे घडलेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असंही पंतप्रधानांनी सांगिल्याचं रिजिजू म्हणाले,

बाईट – संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू

 

भारताने विविध देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार करारांचाही मोदी यांनी बैठकीत उल्लेख केला. देशाचे सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून कार्य करणारे पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन करणारा ठराव एनडीएच्या घटक पक्षांनी मंजूर केल्याचंही रिजिजू यांनी सांगितलं.

दरम्यान, संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सकारात्मक भूमिका बजावेल, राजकीय मतभेद असले तरी सर्व खासदार देशाची सेवा करण्यासाठी, देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि युवकांच्या कल्याणासाठी निवडून आले आहेत, असं म्हणत रिजिजू यांनी विरोधी पक्षांनी संसदेच्या कामकाजात सहकार्य करावं, असं आवाहन केलं.

****

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं भारतातल्या पहिल्या डेंग्यू लसीला - अटेन्युएटेड डेंग्यू व्हॅक्सीनला मंजुरी दिली आहे. ही मंजुरी भारताच्या डेंग्यूविरोधी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा टप्पा असून, डास नियंत्रण, रोगनियंत्रण देखरेख आणि लवकर निदानाच्या उपाययोजनांना अधिक बळ मिळणार असल्याचं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. ही लस डेंग्यू प्रतिबंधासाठी देशाच्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण पूरक ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

****

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून, राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएने दाखल केलेल्या एका गुन्ह्याच्या आधारे बंगळुरू मधल्या आठ ठिकाणांवर शोध मोहीम राबवली जात आहे. हे प्रकरण आयसिस या दहशतवादी संघटनेसाठी व्यक्तींची भरती करण्याशी संबंधित आहे. यामध्ये इकरा वेलफेअर ट्रस्ट, गायडन्स फॉर मॅनकाइंड आणि बंगळुरू इथल्या काही व्यक्तींचा समावेश आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्याच्या तरतुदींनुसार आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपी हे बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते आणि बंगळुरू मधल्या निष्पाप मुस्लिम तरुणांना आयसिसमध्ये भरती करण्यासाठी प्रवृत्त करत होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाई करण्यात आली असून, यात सुमारे १० ब्रास वाळू आणि २ हायवा असा एकूण साडे ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं. अवैध उत्खनन आणि वाहतुकीविरोधात जिल्हा पोलिसांची विशेष मोहीम सातत्यानं सुरू असून, अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई केली जात आहे. 

****

पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावमध्ये आज विद्यार्थ्यांनी 'आक्रोश मोर्चा' काढला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...