Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 July
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उडाण पुलांचं बांधकाम
पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
· गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा समाजातल्या शेवटच्या
घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे- लोकसभा अध्यक्षांचं प्रतिपादन
· पिंपरी चिंचवड इथं कचरा डेपोत एकूण नऊ जणांचा मृत्यू, बचावकार्य थांबले
· आषाढी यात्रेसाठी एस टी महामंडळाकडून पाच हजार ५००
विशेष बस सोडण्यात येणार
आणि
· लॉर्ड्स क्रिकेट कसोटी सामन्यावर भारतीय महिलांची
मजबूत पकड
****
रेल्वे फाटक मुक्त
महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उडाण पुलांचं बांधकाम केलं जाईल
अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर इथून महारेलद्वारे विकसित
नागपूर, सांगली, सातारा, नाशिक, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांतल्या ४८४ कोटी रुपयांच्या नऊ महत्त्वपूर्ण पायाभूत
सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विक्रमी वेळेत आणि उत्कृष्ट दर्जा राखून
ही सर्व कामं पूर्ण केल्याबद्दल त्यांनी महारेलचं अभिनंदन केलं. पुढील तीन वर्षांत
हे सर्व पूल उभारण्याचं आश्वासन महारेलने दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिली. ते म्हणाले:
बाईट – मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
या कार्यक्रमाला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी
उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी महारेलकडून सुरू असलेली पायाभूत सुविधा विकासाची
कामं वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होत असल्याचं सांगितलं.
**
दरम्यान, नागपूर इथं महापालिकेतर्फे महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पाचं भूमिपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं ते यावेळी
म्हणाले. महानगरांच्या वाढत्या गरजा व आव्हानं लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या
शिफारसींनुसार सुमारे ५०० लोकांना नियुक्तीचे आदेश दिले जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
गुणवत्तापूर्ण आरोग्य
सेवा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं काल
अशोका हेल्थ सिटी तसंच अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत
होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं आरोग्य जपण्यासाठी विविध
योजना राबवल्या जातात, त्याचा लाभ नागरिकांना होत असल्याचं बिर्ला म्हणाले.
निरोगी आणि रोगमुक्त आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने योगासने आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा
अंगीकार करणे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते.
****
पिंपरी चिंचवडमधल्या
मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नऊही जणांचे मृतदेह सापडल्यानंतर
तिथं सुरू बचावकार्य काल थांबवण्यात आलं. गेल्या आठ तारखेला दुपारी दीडच्या सुमारास
इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या
एका व्यक्तीचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना पिंपरी चिंचवड
महापालिकेकडून प्रत्येकी दहा लाख रुपये मदत निधी देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे
निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
****
कतारचे माजी अमीर
शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. शेख हमद यांनी १८ वर्ष कतारचं नेतृत्व केलं आणि २०१३ मध्ये
स्वेच्छेने आपल्या मुलाकडे सत्ता हस्तांतरित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख
हमद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, ते भारताचे खरे मित्र असल्याचं सांगितलं. त्यांच्या निधनाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी
भारत सरकारने आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
****
आषाढी यात्रेसाठी
राज्य परिवहन महामंडळाकडून पाच हजार ५०० विशेष बसेस सोडणार असल्याची माहिती परिवहनमंत्री
प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपूर इथल्या चंद्रभागा बस स्थानकात
एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते. राज्यातल्या कोणत्याही
गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट
पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ७५ वर्षांवरील
ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर महिलांना तिकीट
दरात ५० टक्के सवलत दिली जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.
**
आषाढी वारीच्या
पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे
"महिला उन्नती वारी २०२६" या विशेष उपक्रमाला काल पुणे जिल्ह्यात ऊरळी कांचन
इथं सुरुवात झाली. महिला, बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते डिजिटल
जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन करण्यात आलं. महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, तसंच वारीदरम्यान उपलब्ध आरोग्य तपासणी, हिरकणी कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र आणि इतर सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असं आवाहन तटकरे यांनी केलं. या उपक्रमाअंतर्गत पालखी मार्गावर
डिजिटल चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सुरक्षा, हक्क आणि शासकीय
योजनांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
**
महाराष्ट्र आणि
कर्नाटकातून चार हजार सायकल्सची दिंडी काल पंढरपुरात पोहोचली, त्यानिमित्त पंढरपुरात सायकल संमेलन पार पडलं. यावेळी सायकलस्वारांनी
वारकरी परंपरेप्रमाणे सायकल वरून नगरप्रदक्षणा केली. भारतीय क्रीडा प्राधिकरणचे संचालक
पांडुरंग चाटे आणि आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी
सायकल दिंडीचं उद्घाटन केलं. फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रमा अंतर्गत या दिंडीमध्ये
सायकल सारख्या व्यायामाचं महत्व पटवून देण्यात आलं.
**
दरम्यान, राज्यभरातून निघालेल्या पालख्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेनं
आगेकूच करत आहेत. वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने वारीचा
उत्साह अधिक वाढला आहे.
संत ज्ञानेश्वर
माऊलींच्या पालखीचा काल सासवड इथं मुक्काम होता. माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी
भाविक आणि वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी
काल यवत मुक्कामी होती.
श्री संत निवृत्तीनाथ
महाराजांची पालखी काल अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी
संस्थेतर्फे यावेळी वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. पैठणच्या संत
एकनाथ महाराजांची पलखी काल रायमोह इथं मुक्कामी होती.
****
कोलंबियात बुकारामांगा
इथं झालेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड २०२६ मध्ये सहभागी पाचही
भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं जिंकली आहेत. विजेत्यांमध्ये मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीचा ऋषित
गर्ग आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. ८५ देशांतल्या ३८१ विद्यार्थ्यांनी
या स्पर्धेत सहभाग घेतला होता. देशनिहाय पदकतालिकेत भारतीय संघ चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम स्थानावर
राहिला. भारतानं आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये पाच सुवर्णपदकं जिंकण्याची
ही दुसरी वेळ आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये, लॉर्ड्स मैदानावर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट
सामन्यात भारताने आपला दुसरा डाव सात बाद ३४१ धावांवर घोषित केला. काल तिसर्या दिवसाचा
खेळ संपला तेव्ह इंग्लंडच्या सहा बाद १३० धावा झाल्या होत्या. दुसर्या डावात भारताकडून
यास्तिका भाटिया हिने ११३ धावा केल्या. तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन खेळाडू बाद
केले. भारताकडे सध्या ३२७ धावांची आघाडी आहे.
****
बीड जिल्ह्यात परळी
वैजनाथ तालुक्यात सिरसाळा इथं जलसंधारण, वृक्षसंवर्धन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ
झाला. या उपक्रमात जिल्हा प्रशासन आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून
विविध कामं हाती घेण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नदी पुनरुज्जीवन
तसंच तलावांच्या खोलीकरणाच्या कामांमुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असं यानिमित्त म्हटलं आहे.
****
मतदार यादीच्या
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला गती देण्यासाठी लातूर इथं नगरसेवक प्रवीण कस्तुरे
यांच्या पुढाकारातून जनजागरण रथ तयार करण्यात आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष अजित पाटील
कव्हेकर यांच्या हस्ते या रथाचं उद्घाटन झालं. हा रथ विविध भागांमध्ये फिरून मतदार
यादी पुनरीक्षण, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि मतदार नोंदणीचे महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये
जनजागृती करणार आहे.
****
राज्यात मान्सूनची
गती मंदावल्याने अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या
ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण तुलनेनं
कमी राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी अपेक्षित
असून, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त
करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment