Thursday, 23 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 23 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जुलै २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीने कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासंदर्भात आज समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांनी, युवकांचं भविष्य आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं नमूद केलं. यासंदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. २३ जुलै १९२७ या दिवशी मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनीच्या पहिल्या रेडीओ प्रसारणाची सुरूवात झाली होती. आठ जून १९३६ या दिवसापासून ही सेवा ‘ऑल इंडिया रेडीओ’ म्हणून ओळखली जाऊ लागली. १९५६ मध्ये याचं नामकरण ‘आकाशवाणी’ असं करण्यात आलं. ‘बहुजनहिताय, बहुजन सुखाय’ या आपल्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत, आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे.

****

संयुक्त राष्ट्रसंघात सिंधू पाणी करारावर भूमिका स्पष्ट करताना भारताने, सीमापार दहशतवाद सुरू असताना परस्पर विश्वास आणि सहकार्य शक्य नसल्याचं सांगितलं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नैसर्गिक संसाधनांच्या प्रश्नावरील उच्चस्तरीय खुल्या चर्चेदरम्यान, अमेरिकेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी. हरीश यांनी ही टिप्पणी केली. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभाग खाली करणं हाच एकमेव प्रलंबित मुद्दा असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.

****

विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य असून, सरकार ते पूर्ण करणारच, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काही उणीवा राहिल्या असतील तर त्या दूर केल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करत आहेत, ते योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं. सगळ्यांनी आपल्या देशाची बदनामी होणार नाही याचा विचार करायला हवा, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या काल पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. संत सोपानकाका आणि माउलींच्या पालखीचा बंधु भेट सोहळाही काल पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्यांचं दर्शन घेतलं. यावेळेस एआयच्या माध्यमातून एकूण किती वारकर्यांचा अंदाज घेण्यात येत असून, खूप मोठ्या प्रमाणात वारकरी सगळीकडून आले असल्याची माहिती, जिल्हाधिकार्यांनी दिली.

****

मुख्यमंत्री समृद्ध गाव अभियानात धाराशिव जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातले ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व विभागाचे अधिकारी कर्मचार्यांची एकदिवसीय कार्यशाळा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत २७ जुलै रोजी होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या ७१० ग्रामपंचायती या अभियानात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

हॉंगकॉंग इथं सुरू असलेल्या २०२६ वरिष्ठ जागतिक तलवारबाजी स्पर्धेत भारतांच्या तनिक्षा खत्री आणि प्राची लोहान यांनी महिला एपी फेन्सिंगच्या मुख्य ६४ खेळाडुंमध्ये स्थान मिळवलं आहे. यासोबतच त्यांनी या फेरीत प्रवेश करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला एपी फेन्सर्स होण्याचा मान मिळवला आहे.

****

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम १६ मध्ये महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधुचा पराभव झाला. आज झालेल्या सामन्यात चीनच्या वाय एफ चेन हिने सिंधुचा १६–२१, २२–२०, २१–१८ असा पराभव केला. पुरुष एकेरीत अंतिम १६ मध्ये आज भारताच्या आयुष शेट्टीचा सामना व्हिएतनामच्या एन गुएन याच्याशी, तर लक्ष्य सेन चा सामना कॅनडाच्या व्हिक्टर लाय याच्याशी होणार आहे.

****

नाशिक शहर आणि ग्रामीण भागातल्या पाच ते सहा तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर इथं मेनरोड परिसरातून सात ते आठ भाविक जात असताना वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडून पडल्याने तीन भाविक अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात आलं.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पावसाची संततधार कायम असल्यामुळे आज  गंगापूर धरणातून ४९० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येणार आहे. नांदूर मध्यमेश्वर मधून चार हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी जायकवाडीच्या दिशेनं येत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...