Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 July 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ जुलै २०२६ सायंकाळी
६.१०
****
· सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार वचनबद्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची
ग्वाही
· पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळं देशाची ऊर्जा
सुरक्षा मजबूत झाल्याची सरकारतर्फे माहिती
· आषाढी एकादशीच्या निमीत्तानं पंढरपुरकडे निघालेली
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या
पुण्यातून मार्गस्थ
आणि
· इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय महिला
संघ मजबूत स्थितीत
****
सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज नागपूर इथं महापालिकेतर्फे
महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत स्वप्नपूर्ती
सदनिका प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ झाला, त्यावेळी
ते बोलत होते. महानगरांच्या वाढत्या गरजा व आव्हानं लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या
शिफारसींनुसार सुमारे ५०० लोकांना नियुक्तीची आदेश दिले जात असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी मार्गदर्शन
केलं.
****
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळं देशाची ऊर्जा
सुरक्षा मजबूत झाली असून कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत
होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. २०१३-१४ मधील दीड टक्क्यांपेक्षा कमी
असलेलं इथेनॉल मिश्रण २०२५-२६ मध्ये २० टक्क्यांवर पोहोचलं असून भारतानं हे
उद्दिष्ट नियोजित वेळेपेक्षा पाच वर्ष आधी गाठलं आहे.
२०१४-१५ पासून मे २०२६ पर्यंत या कार्यक्रमामुळं १ लाख ९०
हजार कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. या कालवधीत ३१० लाख मेट्रिक
टनांहून अधिक कच्च्या तेलाची आयात टळली असून सुमारे ९३० लाख मेट्रिक टन कार्बन
डायऑक्साइड उत्सर्जनात घट झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार कोटी
रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळं
वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचंही
केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. व्यापक चाचण्यांनंतरच ई-२० इंधनाला मान्यता
देण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं असून, ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल मिश्रण कार्यक्रम पुढंही
सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
****
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सवलतप्राप्त भविष्य
निर्वाह निधी’ चालवणाऱ्या आस्थापनांना त्यांचा दर्जा नियमित करण्यासाठी एक-वेळची
संधी देणारी माफी योजना, २०२६ सुरू केली आहे. कामगार
आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं की, ही योजना सहा
महिन्यांच्या कालावधीसाठी खुली राहणार असून ही योजना आयकर कायदा, १९६१ अंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी विश्वस्त संस्था चालवणाऱ्या
आस्थापनांना लागू आहे. पात्र आस्थापनांनी संबंधित प्रादेशिक कार्यालयात ईमेलद्वारे
औपचारिक अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
आषाढी एकादशीच्या निमीत्तानं पंढरपुरकडे निघालेली
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या
पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून
तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होत आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची
पालखी अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेतर्फे
यावेळी वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. संत मुक्ताई यांच्या
पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड
जिल्ह्यात राक्षसभुवन इथल्या मुक्कामावरून पुढं रवाना झाली आहे. विघनवाडी, खोल्याची वाडी, सांगळवाडी येथून प्रवास करत पालखीचा
आजचा मुक्काम रायमोह इथं असेल.
****
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला
आयोगातर्फे "महिला उन्नती वारी २०२६" या विशेष उपक्रमाला आज पुणे
जिल्ह्यात ऊरळी कांचन इथं सुरुवात झाली. महिला, बालविकास
मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते डिजिटल जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन यावेळी
करण्यात आलं. यावेळी बोलताना तटकरे यांनी महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ
घ्यावा,
तसंच वारीदरम्यान उपलब्ध आरोग्य तपासणी, हिरकणी कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र आणि इतर
सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असं आवाहन केलं. या
उपक्रमाअंतर्गत पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून महिला
सक्षमीकरण,
सुरक्षा, हक्क आणि शासकीय
योजनांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
****
राज्यात मान्सूनची गती मंदावल्याने अनेक भागांमध्ये पावसाची
प्रतीक्षा कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहण्याची शक्यता
आहे. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी अपेक्षित असून, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
****
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं आज सकाळी नाशिकच्या ओझर
विमानतळावर आगमन झालं. एका रुग्णालयाच्या उदघाटनासाठी ते शहरात आले असून आगमन
प्रसंगी
जिल्हा प्रशासनाच्यावतीनं विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम
यांनी त्यांचं स्वागत केलं.
****
पिंप्री चिंचवडमधल्या मोशी कचरा डेपो इथं झालेल्या
दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नऊही जणांचे मृतदेह सापडल्यानंतर तिथं सुरू
बचावकार्य आज थांबवण्यात आलं. गेल्या आठ तारखेला दुपारी दीडच्या सुमारास इमारतीवर
कचऱ्याचा ढीग कोसळून ही दुर्घटना घडली. एनडीआरएफ, भारतीय
सैन्यदल,
पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासनातर्फे दूर्घटनास्थळी बचावकार्य सुरू होतं. अडकलेल्या पाचजणांनी
स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर उर्वरित १८पैकी नऊ नागरिकांना दुर्घटनाग्रस्त
इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं होतं. मृतांमध्ये छत्रपती
संभाजीनगरच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या
नजिकच्या नातेवाईकांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी दहा लाख रुपये मदत
निधी देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.विजय
सूर्यवंशी यानी या संदर्भात अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज दिले.
****
बुलढाणा जिल्ह्याच्या मानेगाव जवळ असलेल्या पूर्णा नदी
पात्रात आज दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही दोन्ही मुलं नांदुरा इथली
रहिवासी होती आणि पोहण्यासाठी नदी पात्रात उतरली होती, अशी
माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय
भौतिकशास्त्र ऑलिंपियाड २०२६ मध्ये सहभागी पाचही भारतीय विद्यार्थ्यांनी
सुवर्णपदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीचा ऋषित गर्ग आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. ८५
देशांतील ३८१ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. देशनिहाय पदकतालिकेत
भारतीय संघ, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम स्थानावर राहिला. भारतानं
आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये पाच सुवर्णपदकं जिंकण्याची ही दुसरी
वेळ आहे.
****
बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात सिरसाळा इथं जलसंधारण, वृक्षसंवर्धन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जलवृक्ष समृद्धी अभियानाचा
प्रारंभ झाला आहे. या उपक्रमात जिल्हा प्रशासन आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या
संयुक्त प्रयत्नातून विविध कामं हाती घेण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
यांनी नदी पुनरुज्जीवन तसंच तलावांच्या खोलीकरणाच्या कामांमुळं भविष्यात पाण्याची
उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असं यानिमित्त म्हटलं आहे.
****
इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं
सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं
दुसऱ्या डावात ३६५ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. भारतानं आज दुसऱ्या डावात चार
बाद २५० धावा केल्या आहेत. भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाला १७० धावांमध्ये माघारी धाडत ११५ धावांची आघाडी
मिळवली.
****
विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरीत अंतिम
सामन्यात आज अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेव्हशी
होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या
सामन्यांत इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश
केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर २-१ असा विजय मिळवला. तर
अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर ३-१ अशी मात केली. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच
उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या
पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना
गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे.
****
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा बीड यांच्या
माध्यमातून तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी बीड जिल्ह्यातले शेतकरी गुजरातमधील
आनंद इथं रवाना झाले आहेत. दुग्ध उत्पादन, पशूधनाचं
आरोग्य,
गोठा व्यवस्थापन आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री व्यवस्थापन या
विषयांचा प्रशिक्षणात समावेश असेल.
****
No comments:
Post a Comment