Wednesday, 15 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 15 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे महाराष्ट्रात तपासल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा, १७ तारखेला पंजाब दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते जालंधर कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकाचं उद्घाटन आणि 'अमृत भारत स्टेशन योजने'अंतर्गत नूतनीकरण केलेल्या इतर ७४ रेल्वे स्थानकांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. त्यांनतर पंतप्रधान अमृतसर इथं संत रविदास एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.

****

शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंती निमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे 'सौश्रुतम् २०२६' या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचे आज उद्घाटन झालं. या परिषदेत जगभरातील तज्ज्ञ आयुर्वेद आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मिक वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून, अत्याधुनिक एमआरआय सुविधेचंही उद्घाटन केलं जाणार आहे.

****

लातूर जिल्ह्यात किल्लारी परिसरात महावितरणच्या वीजतारा चोरी करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना काल पोलीसांनी अटक केली. आरोपींकडून चोरीच्या वीजतारा, चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल आणि चार चाकी वाहन असा पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. किल्लारी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या तीन हजार नऊ धरणांमध्ये सुमारे ६३३ टीमसी पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या ८४३ टीएमसी साठ्यापेक्षा बराच कमी आहे.

राज्यातल्या सहा महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक ८६ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर विभागात ६६ टक्के, कोकण ६२, पुणे ५१, अमरावती ४२, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमधे ४० टक्के पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमधे जायकवाडी धरणात ३२ टक्के, कोयना धरणा ४९ टक्के, उजनी ५० टक्के, गोसीखुर्द ३६ टक्के, तर खडकवासला धरण समूहात ४१ टक्के पाणीसाठा आहे.

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात, आतापर्यंत राज्यात ३३४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो ९६ टक्क्यांच्या आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. बारा जिल्ह्यांमध्ये ५० ते ७५ टक्के, तर अन्य १२ जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला.

****

आज 'जागतिक युवा कौशल्य दिन' साजरा केला जात आहे. रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी तरुणांना कौशल्ये प्रदान करण्याचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे आजच्या दिवशी सुरू करण्यात आलेल्या 'स्किल इंडिया मिशन' या उपक्रमाला अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. रोजगार, उद्योजकता आणि शाश्वत उपजीविकेसाठी आवश्यक असलेली कौशल्ये तरुणांना प्रदान करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये या मोहिमेची सुरुवात केली होती.

****

नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईत इ पॉस साठ्यातील अनियमितता, भावफलक आणि साठाफलक अद्ययावत नसणे, अभिलेखे व्यवस्थित न ठेवणे, शेतकऱ्यांच्या बिलावर स्वाक्षरी न घेणे यासारख्या त्रुटी आढळून आल्या.

****

शेगावच्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं आज धाराशिव शहरात आगमन झालं. भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत केलं. तसंच रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावत पालखीचे दर्शन घेतले. यानिमित्त पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आज या पालखीचा धाराशिव शहरात मुक्काम असून उद्या पालखी तुळजापूरकडे प्रस्थान करणार आहे.

****

रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहराजवळ मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला चाललेल्या कारने उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...