Friday, 24 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

नीट-यूजी प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था, एनटीए यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा तात्पुरत्या उपायांवर न ठेवता संस्थात्मक पातळीवर राबविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यास सांगितलं आहे. तसंच, प्रस्तावित प्रशासकीय मंडळ, तज्ज्ञ समित्या, भागधारकांचे प्रतिनिधित्व आणि डिजिटल पायाभूत सुविधा, सुरक्षा, संशोधन, पारदर्शकता, प्रशासन आणि मनुष्यबळ यांसह विविध क्षेत्रांतील सुधारणांच्या अंमलबजावणीचा तपशीलही सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

नीट पेपरफुटीच्या मुद्यावरुन संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. १२ वाजता कामजाला गोंधळातच सुरुवात झाली, त्यानंतर राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. लोकसभेतही नीट पेपर फुटीच्या मुद्यावर विरोधकांनी गोंधळ घातला, त्यामुळं लोकसभेचं कामकाज सोमवारी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या खासदारांनी नीट पेपर फुटीच्या मुद्यावरुन संसदेच्या मकरद्वाराच्या बाहेर निदर्शनं केली.

****

पेपर फुटीशी संबंधित प्रलंबित प्रकरणांच्या सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी स्वागत केलं आहे. या न्यायालयांमध्ये प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित प्रकरणांची नियमित सुनावणी होईल आणि त्यांचा जलदगतीने निपटारा केला जाईल. यामुळं युवकांना जलद न्याय मिळण्यास मदत होईल, असं मेघवाल म्हणाले.

बाईट- केंद्रीय कायदा अर्जुन राम मेघवाल

****

दरम्यान, दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी हा आदेश दिला. केंद्र सरकारनं या प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. नीट पेपरफुटी घोटाळा प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय खेळाडू उत्कटता, जिद्द आणि उत्कृष्टतेच्या भावनेने स्पर्धेत सहभागी होतील, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारतीय क्रीडापटूंचे कौशल्य, समर्पण आणि निष्ठा देशातील असंख्य नागरिकांना नेहमीच प्रेरणा देत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटू उल्लेखनीय कामगिरी करून देशाचं नाव उज्ज्वल करतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

****

दिल्लीतील आंदोलनादरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्टीकरण पत्र सूचना कार्यालयानं दिलं आहे. समाज माध्यमांवरील महिलेचा व्हिडिओ AI द्वारे तयार केलेला 'डीपफेक' असून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचं पीआयबीनं म्हटलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती सामायिक करू नका, असं आवाहन कार्यालयानं केलं आहे.

दरम्यान, अफवा पसरवणाऱ्या ४८० पाकिस्तान संचलित समाज माध्यमांवर बंदी  घालण्यात आली आहे. तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी परदेशी अकाउंट्सवरील खोट्या माहितीला बळी पडू नये असं आवाहन दिल्ली पोलिसांनी केलं आहे.

****

आज देशभरात 'आयकर दिन' साजरा केला जात आहे. भारताच्या विकसित करप्रणालीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून हा दिवस आयकर विभागाची स्थापना आणि विकास दर्शवतो. तसेच हा दिवस कर प्रशासनाच्या करदात्यांसाठी केलेल्या पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रयत्नांवर प्रकाश टाकतो.

****

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या बीजारोपण पर्यावरण रक्षण समुहातर्फे बीजप्रसाद हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात सहभागी वारकऱ्यांनी पाच लाख देशी वृक्ष बीज संकलनाचा संकल्प केला असून आतापर्यंत सव्वा लाख बियांचे संकलन पूर्ण झालं आहे. आज खामगाव इथून निघालेल्या विठ्ठल एक्स्प्रेस या रेल्वेतील प्रवाशांना वृक्षबीज प्रसादाचे वितरण करण्यात आले. यानिमित्त प्रत्येक वारकरी प्रवासादरम्यान बीजप्रसादाच्या माध्यमातून वृक्ष लागवड करतील.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...