Sunday, 19 July 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 19 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जुलै २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

क्वांटम कंप्यूटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती लक्षात घेता त्याच्याशी त्वरेनं  जुळवून घेणं आवश्यक आहे; आणि त्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्था उभारणे ही काळाची गरज आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. २०२४ मध्ये क्वांटम कंप्यूटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाची जागतिक बाजारपेठ दोन ते तीन ट्रिलियन डॉलर होती. आणि आगामी पाच वर्षांत ती सहा ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वेगाने होत असलेल्या या परिवर्तनाचा सक्रिय भाग बनणे भारतासाठी अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशन सुरळीत पार पडावं आणि महत्त्वाच्या विधेयकांवर सकारात्मक चर्चा व्हावी, यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सहकार्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली जाणार असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. हे पावसाळी अधिवेशन उद्या २० जुलै पासून पुढील महिन्याच्या १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाची विधेयकं  चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत.

****

जम्मू-काश्मीरमध्ये, प्रतिकूल हवामानाच्या अंदाजामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून होणारी श्री अमरनाथजी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी, हा निर्णय घेण्यात आला. पुढील आदेशापर्यंत बालताल आणि नुनवान-चंदनवारी बेस कॅम्पवरून यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुसळधार पावसामुळं कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद आहे. श्री माता वैष्णो देवी देवालय मंडळानंही वैष्णो देवी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. हवामान परिस्थितीवर प्रशासन सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि भाविकांसाठी परिस्थिती सुरक्षित असेल तरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. प्रशासनानं नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि जलाशयांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

****

बनावट किंवा कृत्रीम बुद्धीमत्ता ,एआय-निर्मित ओएमआर शीट्स अर्थात उत्तर पत्रिका सादर केल्यास तक्रारदारांवर गंभीर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रीय परीक्षा संस्था- NTA ने दिला आहे. तपासणीसाठी अलीकडेच सादर केलेल्या अनेक ओएमआर शीट्स बनावट किंवा कृत्रिमरीत्या AI द्वारे तयार केल्याचं  आढळून आल्यानं सर्व तक्रारींवर बारकाईने लक्ष ठेवलं  जात असल्याचं NTA नं स्पष्ट केलं आहे.

****

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSE नं इयत्ता दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून 'डिजी लॉकर रिझल्ट्स पोर्टल'  द्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येतील.

****

मराठवाड्यात बीड परभणी, आणि हिंगोलीसह पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, पुणे, आणि विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, काल छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या.

****

संत एकनाथ महाराजांची पालखी परंडा इथल्या मुक्कामानंतर आज बिटरगावकडे मार्गस्थ होत आहे. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं इंदापूर इथं काल दुसरं गोल रिंगण मोठ्या भक्तिभावात पार पडलं.

****

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला २१-१७, २१-१७ असं सरळ दोन गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे.

****

महिलांच्या कुस्तीमध्ये, काल हंगेरीतील बुडापेस्ट इथं झालेल्या रँकिंग स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू काजलने महिलांच्या ७६ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं.

५३ किलो वजनी गटात अंतिम फेरीत, दुखापतीमुळे सुवर्णपदकाची लढत गमावल्यानं भारताच्या अंतिम पंघाल हीला - रौप्यपदकावर समाधान मानावं  लागलं.तर,५७  किलो वजनी गटात नेहा शर्मा हिनं रौप्य पदकाची कमाई केली.

****

भारत आणि इंग्लंड संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ एक – एक नं बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

****

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे बारा वाजता हा सामना सुरु होईल.

दरम्यान, या स्पर्धेत इंग्लंडनं फ्रान्सला सहा – चार असं पराभूत करत तृतीय स्थान पटकावलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...