Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 09
July 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.
****
भारतातल्या संधींचा लाभ घेण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
देत ऑस्ट्रेलियन सुपरनं भारतात ५० कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली
आहे. ही गुंतवणूक भारताच्या विकास आणि सुधारणांच्या प्रवासावरील वाढत्या जागतिक विश्वासाचं
प्रतिक आहे, तसंच भारताची गतीमान अर्थव्यवस्था जागतिक गुंतवणुकदारांना देत
असलेल्या प्रचंड संधींवरही प्रकाश टाकते असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. मेलबर्न इथं
भारत-ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्ये, ऑस्ट्रेलियन उद्योगांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन
मोदी यांनी केलं होतं. यावेळी दोन्ही देशांतल्या उद्योगपतींना संबोधित करताना त्यांनी, भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक
भागीदारी, गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, अणुऊर्जा, हरित हायड्रोजन, पायाभूत सुविधा आणि भविष्यातल्या
सहकार्याच्या संधींवर सविस्तर भाष्य केलं.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज
यांनी मेलबर्नमध्ये शिष्टमंडळस्तरावर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यावरील
संयुक्त घोषणापत्र जारी केलं. यात भारत-ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य आराखड्याच्या
माध्यमातून सागरी सहकार्य अधिक मजबूत करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली, तसंच शांततापूर्ण आणि समृद्ध
इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी आपली सामायिक वचनबद्धता व्यक्त केली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी न्यूझीलंडकडे रवाना होणार आहेत.
****
नागपुर इथं सुरू असलेल्या तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत परिवहन
कार्य गटाच्या बैठक सत्राचं आज उद्घाटन झालं. यावेळी केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर
यांनी परवहन अधिकाऱ्यांशी वृत्ताकार अर्थव्यवस्था, गतिशिलता आणि शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुद्द्यांवर
चर्चा केली.
दरम्यान, परवा ११ तारखेला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या
अध्यक्षतेखाली या बैठकीचे सत्र होणार असून ही बैठक १२ तारखेपर्यंत चालणार आहे.
****
राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश
न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती स्थापन केल्याची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या समितीने सहा महिन्यांत अहवाल
द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न
करू, असंही त्यांनी सांगितलं.
**
नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या आखणीत जाणूनबुजून
बदल करण्यात आले का याची चौकशी उच्च स्तरावरून येत्या पंधरा दिवसांत करून त्याचा अहवाल
तयार करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली.
रिंगरोड प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत गंभीर अनियमितता, अलायन्मेंट बदल, शेतकऱ्यांवर दबाव आणि महिलांशी
गैरवर्तन झाल्याचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष
चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय
वडेट्टीवार यांनी केली. कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात
येणार नाही असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
**
छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखान भेटीच्या
वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी
महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले
आहेत. मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली.
****
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे–मुंबई घाट विभागातल्या रेल्वे मार्गावरील
दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन
होऊन रेल्वे मार्गासह आजूबाजूच्या परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. रेल्वे मार्ग पूर्ववत
करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची पथकं
समन्वयाने कार्यरत आहेत. एक रेल्वे मार्ग दुरुस्त करण्यात आला असून, त्या मार्गावर सर्व गाड्या
दोन इंजिनांसह चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी बांधकाम साहित्य पोहोचवणं
आव्हानात्मक ठरत असलं तरी, जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या समन्वयाने दुरुस्तीचे काम
वेगानं सुरू आहे.
मुंबई आणि पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून
कसोशीचे प्रयत्न सुरू असल्याचं, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितलं.
सध्या एकाच मार्गिकेचा वापर करून दोन्ही दिशांना सुमारे २४ ते २५ गाड्या चालवण्यात
येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर आज ओसरला आहे.
नाशिकमध्ये पावसाने काल दुपारपासून विश्रांती घेतली असून, गेले दोन दिवस झालेल्या
मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण ६९ टक्के, तर दारणा धरण ४९ टक्के भरलं आहे. नांदूर
मध्यमेश्वर आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment