Tuesday, 7 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 07 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

भारत आणि इंडोनेशियाच्या युवापिढीत कृत्रिम बुद्धिमत्ता – एआय, दूरसंचार आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रांमधलं तांत्रिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एका महत्वाच्या करारावर स्वाक्ष-या झाल्या असून, या दोन देशांमध्ये स्टार्टअप सहकार्य आणखी दृढ करण्यासही सहमती झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबावो सुबियांतो यांच्यासोबत आज झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर ते बोलत होते. या भागीदारीचा एक भाग म्हणून, भारताची अग्रगण्य व्यवस्थापन संस्था, आयआयएम बंगळूर, इंडोनेशियामध्ये आपलं कॅम्पस स्थापन करणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.

पंतप्रधान आज इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं पोहचले. तिथल्या राष्ट्रपती भवनात त्यांचं भव्य स्वागत झालं. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'बिंतांग आदिपुर्णा' हा इंडोनेशिया प्रजासत्ताकाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.

****

राज्यात सध्या सुमारे साडेचार लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आलेली असताना पेट्रोल बाईक्सही सुरू करण्यात आल्यामुळे सरकारनं त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला, पण देशभर एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली, असं त्यांनी सांगितलं. भविष्यात अशा बाईक टॅक्सींद्वारे तरुणांना रोजगार मिळण्यासोबतच सरकारलाही महसूल मिळावा यासाठी या बाईक्सकडून प्रतिदिन पाच रुपये महसुलापोटी आणि प्रति राईड दोन टक्के रक्कम जनकल्याण निधी म्हणून घेण्याची सरकारची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

सरकारनं आत्तापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी, असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. १७ डिसेंबर २०१५ रोजीच्या उत्तरीत प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा, असंही त्यांनी सरकारला सांगितलं.

****

आषाढी वारीमधील १० मानाच्या पालख्या ज्या मार्गावरुन जातात त्या मार्गावर पथकरातून सूट देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. यासंदर्भातला शासन निर्णय आज जारी करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना आणि वारकरी तसंच भाविकाच्या वाहनांना पथकरातून सूट ‌देण्यात आली आहे.

****

नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दरम्यान ढगफुटीचा धोका टळला असला तरी घाटमाथा तसंच नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. नाशिक शहरासह अन्यत्र रात्री पासून मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. आतापर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानीचं वृत्त नाही. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यात दरड कोसळण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अतिधोकादायक भागातली परिस्थिती हाताळण्यासाठी इगतपुरी इथं राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचं एक पथक तैनात करण्यात आलं आहे. नाशिक–त्र्यंबकेश्वर दरम्यान आज ढगफुटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. मात्र त्र्यंबकेश्वर–नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले परिसराकडे सरकल्याचे दिसत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

****

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावाच्या शेलारवाडीत काल रात्री उशिरा भूस्खलनाची घटना घडली. त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळला आणि घरातले तिघे जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी एका महिलेला वाचवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी साधना बांगर आणि कंत्राटी लिपिक पठाण मुजीबखान यासिनखान यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आलं. क्षेत्रीय कामकाजासाठी भाडेतत्वावर पुरवठा केलेल्यावाहनाचं बिल काढण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

भारत आणि इंग्लंड संघात तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...