Tuesday, 28 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जुलै २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएच्या संसदीय मंडळाची मंगल मिलन बैठक आज दिल्लीत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह एनडीएचे खासदार या बैठकीला उपस्थित होते. संसदेच्या अधिवेशनात एनडीएच्या घटक पक्षांच्या रणनितीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

****

लोकसभेत आज पेपरफुटी आणि परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक २०२६ वर सहा तासांहून अधिक काळ चर्चा होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकारानं सत्ताधारी आणि विरोधकांमधील कोंडी दूर झाल्यानंतर या चर्चेवर एकमत झालं.

राज्यसभेत राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक २०२६ आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक २०२६ या दोन महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे. राष्ट्रगीत आणि वंदे मातरमच्या गायनादरम्यान जाणूनबुजून व्यत्यय आणणं किंवा त्याचा अपमान करणं दंडनीय गुन्हा ठरवण्याची तरतूद राष्ट्र गौरव अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयकात करण्यात आली आहे. तसंच, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक चर्चेसाठी मांडणार आहेत.

****

आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने २२ हजार ४३५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा, विकासकामं आणि आवश्यक सुविधांसाठी राज्य सरकारकडून मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे.

****

बीएस 6 प्रकारतल्या वाहनांना दिलं जाणारं PUC प्रमाणपत्रं तीन वर्ष कालावाधीसाठी देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सादर केला आहे. बीएस 6 प्रकारातल्या आणि सहा वर्षांपर्यंत जुन्या असलेल्या वाहनांना याचा लाभ मिळेल. सध्या दिलं जाणारं प्रमाणपत्र एका वर्षासाठी वैध असतं. सहा ते दहा वर्ष जुन्या वाहनांना दरवर्षी तर त्यापेक्षा जुन्या वाहनांना सहा महिन्यांनी हे प्रमाणपत्र नवीन काढावं लागेल. बीएस 1, 2, 3 प्रकारातल्या वाहनांना दर तीन महिन्यांनी तर बीएस 4 प्रकारातल्या वाहनांना सहा महिन्यांनी या प्रमाणपत्राचं नुतनीकरण करावं लागेल.

****

मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातला चिपळूण हा राज्यातला पहिला मतदारसंघ बनला आहे. चिपळूणचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आकाश लिगाडे यांनी याबद्दलची माहिती दिली. अहोरात्र काम करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचा या यशात सिंहाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया लिगाडे यांनी दिली. याआधी १०० टक्के पुनरीक्षण पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव बनण्याचा मान चिपळूण तालुक्यातल्याच मौजे टेरव बुद्रुक या गावाने पटकावला होता.

****

ग्लासगो इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या शॉटपुट F57 प्रकारात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल शर्मिला धनकरचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राघाकृष्णन यांनी अभिनंदन केलं आहे. पॅरा अॅथलेटिक्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली खेळाडू ठरून शर्मिलानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे देशातल्या युवा खेळाडूंना आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

तसंच पुरुषांच्या उंच उडीमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सर्वेश अनिल कुशारेचं, पुरुषांच्या ७९ किलो वजनी गटात भारोत्तोलनात रौप्यपदक पटकावणाऱ्या वल्लुरी अजया बाबूचं आणि महिलांच्या शॉटपुट F57 प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या शिल्पा के. शैलाचंही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी अभिनंदन केलं आहे.

****

पालघर जिल्ह्यात पश्चिम रेल्वेच्या भिलाड रेल्वे स्थानकाजवळ भरूचकडे जाणाऱ्या मेमू ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरल्यानं अहमदाबादकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही गाड्या उशिराने धावत असल्यामुळे अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

****

रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातल्या चोळमाळा इथं पोलिसांनी व्हेलमाशाची उलटी पासून तयार होणारा किंमती पदार्थ जप्त केला. बाजारात या उलटीची किंमत चार कोटी रूपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी आरोपी राहूल हातनी याला अटक करण्यात आली आहे. 

****

अहिल्यानगर तसंच नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक झाली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातल्या विविध धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडलेलं पाणी, नांदूर मधमेश्वरमार्गे ४६ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ६१ टक्क्यापर्यंत पोहोचला आहे.

****

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...