Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 July
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
हायड्रोजनवर धावणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला आजपासून
हरयाणात सुरुवात
·
रेल्वे तिकिट आरक्षण अधिक सुलभ करण्यासाठी IRCTCचं नवीन पोर्टल
·
अंमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेचं समूळ उच्चाटन करण्याचे
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारं राज्य" अशी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व
विभागांनी समन्वयाने काम करण्याचं आवाहन
·
मोसमी पावसाच्या ओढीमुळे राज्यात आतापर्यंत फक्त ५६ टक्के
क्षेत्रावर पेरणी
आणि
·
नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला आज पावसाचा
यलो अलर्ट
****
हायड्रोजनवर धावणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला आजपासून देशात सुरुवात होत आहे. हरयाणात
जिंद रेल्वे स्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना
करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही रेल्वे गाडी जिंद आणि सोनीपत
स्थानकांदरम्यान धावेल. संपूर्णपणे स्वदेशी निर्मित असलेल्या या रेल्वे गाडीच्या तंत्रज्ञानात
हायड्रोजनचं विजेत रुपांतर करून त्यावर गाडी चालवली जाते. परिणामी धुराऐवजी पाण्याची
वाफ बाहेर पडत असल्यानं कार्बन उत्सर्जन शून्य होतं. 'ग्रीन हायड्रोजन'च्या वापरामुळे जीवाश्म इंधनावर
आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या विजेवरचं अवलंबित्व कमी व्हायला
मदत होणार आहे.
****
रेल्वे तिकिट आरक्षण अधिक सोपं व्हावं यासाठी IRCTC नं नवीन बिटा वेबसाईट सुरु केली आहे. या
संकेतस्थळावर अनावश्यक कॅपचा, पॉपअप्स, फ्लॅशिंग ग्राफिक्स किंवा इतर अडथळा आणणारे
घटक नसतील. सर्व श्रेणीतल्या जागांची उपलब्धता यावर दिसेल. या संकेतस्थळावर प्रवाशांची
माहिती जतन केली जाईल, त्यामुळे पुढच्या वेळी आरक्षण करताना प्रक्रिया सुलभ होईल. सध्याच्या संकेतस्थळाच्या
होम पेज वर देखील बिटा व्हर्जनची लिंक उपलब्ध आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसच्या अभ्यासक्रमात इयत्ता पाचवी किंवा सहावीपासून
त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचना, सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तमिळनाडूमधल्या
जवाहर नवोदय विद्यालय प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने, सीबीएसच्या अभ्यासक्रमात नवव्या
इयत्तेत त्रिभाषा धोरण लागू करण्याविषयी चिंता व्यक्त केली. यामुळे विद्यार्थ्यांवर
ताण वाढण्याची शक्यता असून, विद्यार्थ्यांना या बदलाशी जुळवून घेता यावं यासाठी इयत्ता पाचवी किंवा सहावीपासून
त्रिभाषा सूत्र लागू करावं, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
****
अंमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेचं समूळ उच्चाटन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत
होते. नैसर्गिकरित्या अमली पदार्थांचं उत्पादन, पुरवठा, खरेदी-विक्री तसंच कृत्रिमरित्या तयार
करण्यात येणाऱ्या अंमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा व्यवसायाच्या निर्मुलनाचे निर्देश
त्यांनी दिले. शालेय जीवनापासूनच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवषयी विद्यार्थ्यांमध्ये
जागृती आणण्यासाठी इयत्ता सातवी ते दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये अंमली पदार्थ दुष्परिणाम
विषयक घटकांचा समावेश करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केलं.
दरम्यान, महाराष्ट्राची "सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारं राज्य" अशी ओळख निर्माण
करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी
केलं. गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग-जीपीआर उपक्रमांतर्गत काल झालेल्या बैठकीत
ते बोलत होते. ‘जीपीआर’ अंतर्गत प्रत्येक सेवेसाठी सहा टप्प्यांची प्रक्रिया निश्चित
करण्यात आली असून, सर्व विभागांनी १५ ऑगस्टपर्यंत किमान पाचव्या टप्प्यापर्यंतच्या सेवा अंतिम चाचणीसाठी
तयार ठेवाव्यात, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
****
राज्यात मान्सूनच्या पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
आहेत. पेरणी झालेल्या पिकांनाही ओलाव्याची गरज आहे. मात्र पाऊस नाही. त्यामुळे दुबार
पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या हंगामात राज्यातल्या सरासरी एक कोटी ५७ लाख हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या खरीप
क्षेत्रापैकी, ८७ लाख ८२ हजार ७७२ हेक्टर, म्हणजे केवळ ५६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ऊसाचं
क्षेत्र विचारात घेतलं तर हे क्षेत्र ६० टक्क्यावर जातं. खरीपात भाताची १६ टक्के, ज्वारी १३ टक्के, बाजरी २२ टक्के, तर सोयाबीन आणि कापसाची प्रत्येकी
७४ टक्के पेरणी झाली आहे. पुढच्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला तर रखडलेल्या
पेरण्यांना वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
****
महिला या कृषी क्षेत्राचा कणा असल्याचं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं
आहे. राष्ट्रीय शेती आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या महाराष्ट्र प्रादेशिक
कार्यालयाच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत
होते. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष-२०२६ निमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात
महिला शेतकरी, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयं-सहाय्यता बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांचा
गौरव करण्यात आला. शेतकरी कल्याणासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांची कृषिमंत्र्यांनी
यावेळी माहिती दिली.
****
ओडिशात जगन्नाथ पुरी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीत जगन्नाथ रथयात्रेला कालपासून
सुरुवात झाली. या यात्रेत चेंगराचेंगरी होऊन काल एका भाविकाचा मृत्यू झाला, तर काही भाविक जखमी झाल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हंटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथंही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत-इस्कॉन संस्थेच्या वतीने
रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
आषाढी वारीत पंढरपूरकडे निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज अनाळे मुक्कामाकडे
प्रस्थान करेल. तर संत गजानन महाराजांची पालखी श्रीक्षेत्र तुळजापूर हून सोलापूर मार्गे
पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आज काटेवाडी इथल्या मुक्कामावरून
तर संत ज्ञानेश्वरांची पालखी आज तरडगाव इथं मुक्कामावरून पुढे वाटचाल करेल.
****
धाराशिव शहरात काल सकाळी भूगर्भातून मोठा आवाज झाला. यामुळे खिडक्यांची तावदानं
हादरली तसंच जमीनही कंप पावल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे नागरिक भयभीत झाल्याचं आमच्या
वार्ताहराने कळवलं आहे.
बीड जिल्ह्यातही अनेक तालुक्यांमध्ये काल दुपारच्या सुमारास भूगर्भातून गूढ स्वरूपाचा
मोठा आवाज ऐकू आला. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही. या घटनेनंतर
नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून अनेकजण घराबाहेर आले.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये तसंच सामाजिक
माध्यमांवर चुकीची माहिती प्रसारित करणं टाळावं, असं आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी
केलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये ३० दिवसांची विशेष
एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचं उद्घाटन काल
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं. जनजागृती, तपासणी, दंडात्मक कारवाई आणि प्लास्टिकमुक्त
शहर उपक्रम अशा टप्प्यांत मोहिमेची अंमलबजावणी होणार आहे. कापडी पिशव्यांच्या वापराला
प्रोत्साहन देऊन नागरिक, व्यापारी, शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांनी या उपक्रमात सहभागी व्हावं, असे आवाहन प्रशासनाने केलं
आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी शहरातल्या जुना बसस्थानक परिसरातल्या गोळीबार आणि मृत्यू
प्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
१५ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत दोन गटांतील जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात एकाचा
मृत्यू झाला, तर चौघे जण जखमी झाले होते.
****
लातूर जिल्ह्यात किल्लारी पोलिसांनी गांजा शेती प्रकरणातल्या फरार आरोपीस सापळा
रचून अटक केली. या कारवाईत सुमारे ८० किलो वजनाचा अंदाजे ८ लाख रुपये किमतीचा गांजा
जप्त करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आरोपी फरार झाला होता.
****
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली
इथं श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालयात विशेष कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना जलसंवर्धन आणि पाणी गुणवत्तेचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं.
सहाय्यक भूवैज्ञानिक दीपक वाबळे यांनी "भूजलाचे स्त्रोत, भूजल पुनर्भरण आणि हिंगोली
जिल्ह्याची भूजल परिस्थिती" या विषयावर माहितीपूर्ण सादरीकरण करून विद्यार्थ्यांना
भूजल व्यवस्थापनाची माहिती दिली.
****
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला पराभव पत्करावा
लागला. काल झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताचा संघ ४४ षटकात २३३ धावांवर
सर्वबाद झाला. श्रेयस अय्यरने ६६, तर विराट कोहलीने ६५ धावा केल्या. इंग्लंडच्या संघाने
४५ षटकात सहा गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ
एक–एकने बरोबरीत असून, शेवटचा सामना येत्या रविवारी होणार आहे.
****
मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणातला जलसाठा ३१ पूर्णांक ४२ शतांश एवढा झाला आहे.
येलदरी सुमारे ६२, माजलगांव १६ पूर्णांक ७९, मांजरा १६ पूर्णांक ६३ तर विष्णुपुरी प्रकल्पात सुमारे
३५ टक्के पाणीसाठा आहे.
****
हवामान
मराठवाड्यात नांदेडसह धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला तसंच वाशिम आणि यवतमाळसह विदर्भात
बहुतांश भागाला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर परिसरात
काल सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मागील काही दिवसांच्या खंडानंतर धाराशिव
परिसरातही काल पावसानं हजेरी लावली.
****
No comments:
Post a Comment