Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 July
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ३० जुलै
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
विकसित
भारत २०४७ च्या संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी दोन ऑगस्ट रोजी नशा मुक्त युवा विकसित भारत
संकल्प अभियान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविय
यांनी ही माहिती दिली. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धची ही १०० आठवड्यांची
देशव्यापी मोहिम असेल. या मोहिमेचं नेतृत्व माय भारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केलं
जाईल. तरुणांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि सक्रिय बनवण्याच्या उद्देशाने चालवलं
जाणारं हे एक ऑनलाईन युवा नेतृत्व आणि सामाजिक सहभाग व्यासपीठ आहे.
****
मुंबईत
ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
नेतृत्वात होणार आहे. कौशल्य, उद्योजकता
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं
आहे. अंमली पदार्थ मुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई सारखं अभियान संपूर्ण राज्यात
राबवण्यात येईल, मुंबईसह
राज्यातल्या सर्व शाळा आणि, महाविद्यालयांमध्ये
नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल, असं लोढा यांनी सांगितलं.
****
मराठा
आरक्षण कक्षाचं कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे भरून हा कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहेत. उपसमितीच्या
बैठकीत ते काल बोलत होते. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रलंबित
असलेल्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांच्या सर्व प्रकरणांचा निपटारा तातडीने
करण्याची सूचना त्यांनी दिली.
****
केंद्र
सरकारने महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत नाफेडमार्फत करण्यात
येणाऱ्या कांदा खरेदीच्या किमान हमी खरेदी दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. आजपासून
ग्रेड-ए दर्जाच्या कांद्यासाठी प्रतिक्विंटल दोन हजार ३३५ रुपये इतका नवीन हमी दर लागू
करण्यात आला आहे. यंदाच्या कांदा खरेदी हंगामातली ही सातवी दरवाढ असून, सुरुवातीला प्रतिक्विंटल एक
हजार ३५० रुपये दराने खरेदी सुरू करण्यात आली होती. म्हणजे ९० दिवसांत एक हजार ८५ रुपयांची
दरवाढ नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादकांना मिळाली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या
वतीने याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला.
****
क्षयरोगाबाबत
जनजागृती करण्यासाठी काल मुंबईत विशेष पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत राज्यपाल
जिष्णू देव वर्मा यांनी सहभागी होत नागरीकांना क्षयरोगाविरोधातल्या जनजागृतीत सक्रिय
सहभाग घेण्याचं आवाहन केलं. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे एक हजार स्वयंसेवक
सहभागी झाले होते. स्वयंसेवकांनी क्षयरोगाबाबत जनजागृती करणारे माहितीफलक हातात घेत
नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केली. पदयात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी राज्यपालांनी
उपस्थित सर्वांना क्षयरोगमुक्त भारतासाठी प्रयत्न करण्याची शपथ दिली. या अभियानातून
क्षयरोगासाठी जनजागृती वाढवणं, वेळेवर
निदान आणि उपचारांचं महत्व नागरीकांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.
****
महाराष्ट्र
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. व्यंकट गिते यांची नियुक्ती करण्यात
आली आहे. विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी याबाबतची घोषणा काल केली. लेफ्टनंट
जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं हे पद रिक्त झालं
होतं.
****
राज्यातल्या
अनेक भागात आज पाऊस सुरु आहे.
गडचिरोली
जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. भामरागड तालुक्यात
पामुलगौतम नदी आणि परिसरातल्या नाल्यांना अचानक पूर आला. या पुरात अडकून पडलेल्या एकाच
कुटुंबातल्या तिघांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुखरूप बाहेर काढलं.
भंडारा
जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून एक लाख ३५ हजार ५९२
घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
छत्रपती
संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, सकाळपासून पावसाची संततधार
सुरु आहे.
****
बुलडाणा
जिल्ह्यात खामगाव इथं एलपीजी सिलेंडर वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅस चोरी करून काळाबाजार
करणाऱ्या एका टोळीला अन्न आणि पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकानं छापा टाकून
रंगेहाथ पकडलं. पथकानं गॅस टँकर सह ८८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
****
परभणी
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत २० कोटी रुपयांच्या २८ विकासकामांना काल मंजुरी देण्यात
आली. महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत पाणीपुरवठा, रस्ते, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, मोकाट कुत्रे आदी प्रश्नांवर
चर्चा करण्यात आली.
****
पेट्रोल
पंपांवर स्वच्छतागृह आणि वाहनांसाठी मोफत हवा भरण्याची सुविधा उपलब्ध नसलेल्या पंपांचा
परवाना रद्द करण्याची शिफारस संबंधित तेल विपणन कंपनीकडे केली जाईल असा इशारा बीडचे
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिला आहे.
****
No comments:
Post a Comment