Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 July
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
नीट पेपरफुटीसंदर्भातलं आंदोलन संपल्याचं कॉक्रोच जनता
पार्टीकडून जाहीर
·
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; प्रल्हाद जोशी यांच्याकडे
कार्यभार
·
आज कारगिल विजय दिवस; विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हुतात्म्यांना
अभिवादन
·
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांशी
संवाद साधणार
·
आषाढी एकादशीचा सोहळा सर्वत्र भक्तिभावाने साजरा
आणि
·
भारताच्या अनाहत सिंगने पटकावलं जागतिक कनिष्ठगट स्क्वॅश
अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद; झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना जिंकून
भारताची मालिकेत विजयी आघाडी
****
कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपरफुटीसंदर्भातलं आपलं आंदोलन संपल्याचं जाहीर केलं
आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि जितेंद्रसिंह यांच्यासोबत सीजेपीचे
प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची सफल चर्चा झाली. या चर्चेनंतर झालेल्या संयुक्त
पत्रकार परिषदेत नड्डा यांनी, सीजेपीच्या सगळ्या मागण्यांवर सरकारने सहानुभूतीपूर्वक
विचार करून, मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. ते म्हणाले...
बाईट – केंद्रीय मंत्री
जे पी नड्डा
सदरच्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यावर तसंच सीजेपीच्या संयोजकांवर कारवाई न करणं, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या
कुटुंबाला नियमानुसार अधिकाधिक आर्थिक मदत देणं, आणि शिक्षण पद्धतीत सुधारणेसंदर्भात दिलेल्या
मुद्यांवर विचार करण्याच्या मागण्या सरकारने मान्य केल्याचं, सीजेपीच्या प्रवक्त्यांनी
सांगितलं. त्यामुळे हे आंदोलन तत्काळ मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आंदोलनात सहभागी
सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबवण्याचं आवाहन प्रवक्ते आशुतोष रांका यांनी केलं.
ते म्हणाले..
बाईट – आशुतोष रांका
****
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला.
जंतर मंतरवरचं आंदोलन आणि एकंदर परिस्थितीचा देशविरोधी घटकांनी फायदा घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला
वेळ आणि ऊर्जा स्वत:ची कारकीर्द घडवण्यासाठी वापरावी, या उद्देशाने आपण पंतप्रधानांकडे
राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. शिक्षण खात्याचं कामकाज आता
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
****
दरम्यान, प्रधान यांचा राजीनामा म्हणजे युवा शक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय
असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारनं आंदोलकांवर लाठीमार तसंच अश्रुधुराचा
वापर टाळायला हवा होता, असं मत पवार यांनी व्यक्त केलं.
**
कॉक्रोच जनता पार्टीने आपलं आंदोलन मागे घेतलं असलं तरीही, मुंबईत आजचा नियोजित तिरंगा
मार्च ठरल्याप्रमाणे होणारच असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. आंदोलनकर्त्यांवर
कारवाई करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाई होणार का असा सवालही त्यांनी केला.
****
टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले
मुख्य सूत्रधार मानले जाणारे विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजीत सिन्हा यांना भिवंडी
पोलिसांनी बिहारमधून अटक केली. या दोघांनाही भिवंडी न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलिस
कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आग्रा इथल्या छापखान्यातल्या कर्मचाऱ्यांसोबत विजेंद्र
कुमार गुप्ता याचे आर्थिक हितसंबंध असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात अटक झालेल्या
आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे २८ जून रोजी होणारी
टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
****
गडचिरोली जिल्ह्यात नक्षली बॅनर लावून तसंच पत्रकं टाकून दहशत निर्माण करण्याचा
प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली. यापैकी एक तरुण छत्तीसगडचा रहिवासी
असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. १९९९ साली भारतीय सैन्याने पाकिस्तानवर मिळवलेल्या
या विजयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या द्रास इथं कालपासून दोन दिवसीय
स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली.
राज्यभरातही ठिकठिकाणी आज विविध कार्यक्रमातून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येत
आहे. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक परिसरात आज सकाळी योग ॲण्ड स्पोर्ट्स वेलफेअर
आणि सायकलिस्ट फौंडेशनच्या वतीनं विशेष अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला आहे.
****
उत्तरप्रदेशातल्या सारनाथ या स्थळाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात
आला आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातल्या या महत्त्वाच्या स्थळाला जागतिक
पातळीवर स्थान मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
दरम्यान, पंतप्रधान आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देश-विदेशातील
जनतेशी संवाद साधणार आहेत. या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा हा १३६ वा भाग असेल. आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, एआयआर न्यूज हे संकेतस्थळ तसंच न्यूजऑनॲप मोबाईल ॲपवर
या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.
****
आषाढी एकादशीचा सोहळा काल सर्वत्र भक्तिभावाने साजरा झाला. मराठवाड्यासह राज्यातल्या
सर्वच विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
छत्रपती संभाजीनगर नजिक वाळूजच्या पंढरपूर मंदिरात काल पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी
गर्दी दिसून आली. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत विठ्ठल - रुक्मिणीचं दर्शन घेतलं.
पैठण इथं आषाढी एकादशीनिमित्त शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन
घेण्यासाठी वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठी गर्दी झाली. संत एकनाथ संस्थानचे अध्यक्ष
तथा आमदार विलास भुमरे यांनी सपत्नीक नाथ समाधीचं दर्शन घेऊन आरती केली. दर्शनासाठी
सुमारे दोन किलोमीटर पर्यंत भविकांच्या रांगा होत्या.
**
बीड शहरासह जिल्ह्यात अकराही तालुक्यांमध्ये विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये
भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत
दिंडी काढली.
परभणी इथं गुजरी बाजार परिसरातल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उपमहापौर गणेश
देशमुख यांच्या हस्ते सपत्निक विधिवत महापूजा आणि आरती करण्यात आली. शहरात विद्यार्थ्यांनी
काढलेल्या भव्य गोपाळ दिंडीचे महापौर आणि उपमहापौरांनी स्वागत केलं.
हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली
होती. आखाडा बाळापूर इथले प्रसिद्ध चित्रकार कलाशिक्षक दिलीप दारवेकर यांनी आषाढी एकादशीनिमित्त
'माझी चित्रवारी' हे चित्र प्रदर्शन भरवलं, नागरिकांचा या प्रदर्शनालाही
मोठा प्रतिसाद मिळाला.
जालना इथं श्री आनंदी स्वामी महाराजांच्या आषाढी एकादशी पालखीचा सोहळा उत्साहात
साजरा झाला. यावेळी तरुणांनी मल्लखांबावरच्या थरारक कसरती केल्या. भाविकांच्या सेवेसाठी
ठिकठिकाणी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
****
राज्य शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातल्या एक हजार २७६ गावांमधल्या, ९९ हजार ६४८ पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या
पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी ही माहिती दिली. पात्र
लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची तसंच अग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीने
पूर्ण करावी, असं आवाहनही जाधव यांनी केलं.
या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या एक हजार ५८२ गावांमधले एकूण ९६ हजार ९२०
शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केल्याची
माहिती, जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी सहा वाजून ५० मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य
धक्का जाणवला. भूकंप मापक केंद्रात या धक्क्याची तीव्रता तीन पूर्णांक एक रिश्टर स्केल
इतकी नोंदवली गेली. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू
नयेत, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मविभूषण गोविंदभाई
श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त काल एकदिवसीय गिरीभ्रमण मोहीम घेण्यात आली. संस्थेचे अडीचशेहून
अधिक विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले. वृक्षारोपणासाठी तयार केलेल्या सीड बॉल्सचं
या मोहिमेदरम्यान रोपण करण्यात आलं.
****
भारताची स्क्वॅश खेळाडू अनाहत सिंग हिने जागतिक कनिष्ठगट स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेचं
विजेतेपद पटकावलं आहे. कॅनडात ओंटारियो इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात अनाहतने इजिप्तच्या
रुकय्या सालेम हिचा ११-३, ११-७, ११-९ असा पराभव केला. कनिष्ठगट स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारी अनाहत पहिली
भारतीय खेळाडू ठरली आहे.
****
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत काल दुसरा सामना ९० धावांनी
जिंकून भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. काल हरारे इथं झालेल्या
सामन्यात भारतानं दिलेल्या २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना यजमान संघ अठराव्या
षटकांत अवघ्या १२९ धावांवर सर्वबाद झाला.
****
हवामान
राज्यात आज विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, कोकणात ऑरेंज अलर्ट, तर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा
परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात आज सोसाट्याच्या
वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे नांदूर मधमेश्वर प्रकल्पामधून सुमारे ६४
हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अहमदनगर
तसंच नाशिक जिल्ह्यातून होणाऱ्या विसर्गामुळे जायकवाडी धरणात सध्या सुमारे ८० हजार
दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाण्याची आवक होत आहे. धरणाची पाणीपातळी सुमारे
४८ टक्क्यांवर पोहोचली आहे.
****
No comments:
Post a Comment