Sunday, 26 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 26 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

स्थानिक ज्ञान, सभोवतालची परिस्थिती आणि महिलांचा आत्मविश्वास एकत्र येतात तेव्हा छोटासा प्रयत्नही मोठ्या बदलाची सुरुवात ठरतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रमाच्या आज प्रसारित झालेल्या १३६व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

देशातील जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि त्यांचा स्वत:चंही जवळचं नातं असलेल्या चहाचा संदर्भ देताना, पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं उत्तर प्रदेशातील महिलांनी एकत्र येत बनवलेल्या चहाचा दाखला यासाठी दिला. विदूर प्रेरणा स्वदेशी चहा या उत्पादनानं अल्पावधीत लोकांमध्ये आपलं स्थान बनवलं. या चहाला प्रयागराजचा महाकुंभ, दिल्ली फूड फेस्टीवलसह परदेशी नागरिकांनीही पसंती दिल्यानं केवळ एक लाख रुपयांपासून सुरू झालेला हा प्रयत्न आज देशभरातील मोठ्या संस्थांपर्यंत पोहोचल्याचं ते म्हणाले.

आजच्या २६ जुलै रोजी असलेल्या कारगिल विजय दिवसाची यावेळी आठवण करुन देताना, मोदी यांनी हा दिवस आपल्याला गर्वानं भारून टाकतो असं सांगितलं. आपल्या जवानांचे साहस, त्यांनी कठीण - विपरित परिस्थीतही भारत मातेच्या रक्षणासाठी सर्वस्व कशाप्रकारे अर्पण केलं याचं स्मरण करत त्या वीरांना श्रद्धापूर्वक नमन करत असल्याचं मोदी म्हणाले.

आजचा भारत आपल्या वीरांची फक्त आठवणच ठेवत नाही तर पुढील नव्या पिढीपर्यंत त्यांची गाथासुध्दा पोहोचवतो असं सांगून गेल्या चौदा जुलैला दिल्ल्लीतील युद्ध स्मारकावरून द्रासच्या कारगील युद्ध स्मारकापर्यंत निघालेल्या एक स्वारी-एक राष्ट्र-एक सलाम असा संदेश देणाऱ्या ‘शौर्य विजय यात्रेची’ माहिती मोदी यांनी दिली.

देशाच्या सुरक्षेचा विचार करताना भारत आता तांत्रिकदृष्ट्या बळकट होत असल्याचं सांगून, भारतीय नौदलाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेली आणि ७५ टक्के स्वदेशी बनावटीच्या आयएनएस महेंद्रगिरी युद्ध नौकेबाबत पंतप्रधानानी यावेळी सांगितलं. आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या शक्तिचं हे प्रतीक असून कुशा, तसंच पिनाका या क्षेपणास्त्रांचं यशस्वी परिक्षण आपल्या वैज्ञानिक-इंजिनियर यांच्या परिश्रमाचं हे फलित असल्याचं ते म्हणाले.

आज संरक्षण उत्पादन-त्यांची निर्यात तसंच मित्र राष्ट्रांसोबत राजनैतिक सहकार्य यात भारत सतत नव्या ऊंचीवर पोहोचत असून याद्वारे एक सुरक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्माणाचा आपला संकल्प आपण अधिक मजबूत करुया, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

जेव्हा पाऊस पडेल तेव्हा त्या पाण्याला तिथचं मुरवण्यासाठी गेल्या चार जुलैपासून देशभरात एक विशेष अभियान सुरू असून याद्वारे पाणी साठवण, पुनर्भरण, जुन्या जलस्त्रोतांचं पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपण यांना नवी गती देण्यात येत असल्याचं ते म्हणाले. गावं-शहरं-सामाजिक संस्था-ग्राम पंचायती या कामात उत्साहानं आपलं योगदान देत असून तलावातील गाळ काढणं, आड-विहिरी यांना नवजीवन देणं तसंच बंद पडलेल्या कुपनलिका आता भूगर्भातील पुनर्जिवीत पाण्याचं माध्यम बनत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

गेल्या रविवारी विक्रम-वन या खासगी क्षेत्रात विकसित रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण हे देशासाठी गौरवपूर्ण क्षण होते. अंतराळ हा विभाग खासगी क्षेत्रासाठी आजपर्यंत देशात बंद होता. मात्र, युवकांचा विचार करता त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी आता देशात हा विभागही खासगी क्षेत्रासाठी खुला केल्यानंच हे यश दिसून आल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

गणेशोत्सवा संदर्भात स्थानिक मातीतून तयार झालेल्या मूर्तींची स्थापना-पूजा करण्याच्या आपल्या आवाहनाला अनेकांनी, आपले संदेश माझ्यापर्यंत पोहोचवून पसंती दिली असल्याचा उल्लेखही मोदी यांनी यावेळी केला.

आपण परिधान करत असलेलं पत्येक वस्त्र कोणत्या ना कोणत्या भागची-समुदायाची-त्याच्याशी संबंधित असंख्य लोकांची गोष्ट समोर आणत असते. संबंधित लोक ते आहेत जे गर्वानं भारताचा सांस्कृतिक वारसा जतन करत आहेत. आज आपण त्यामुळेच अशा विणकरांचा सन्मान करून स्थानिकतेचा अर्थातच लोकल फॉर व्होकलची भावना सशक्त करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

****

मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

नांदेड जिल्ह्यात शेतीच्या ९५ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जुलै अखेरीस हा आकडा शंभर टक्के जाईल अशी माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे. जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. त्या खालोखाल कापसाची पेरणी झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे मूग, उडीद ही कडधान्य हाती येतील की नाही अशी शंका शेतकरी व्यक्त करत आहेत. पिके तरली असली तरीही जलसाठे मात्र अद्यापही तळालाच आहेत. ही परिस्थिती पाहता प्रशासकीय स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. काल धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षणमंत्री म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

****

करगिल विजय दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी मातृभूमीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...