Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 July
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंधक सुधारणा
विधेयकावर चर्चा सुरू
·
गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना
सीजेपी आंदोलन प्रकरणातून मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
·
अॅट्रॉसिटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी राज्यात पाच विशेष
न्यायालयं स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
·
परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गासाठी १६३ कोटी रुपये
खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता
·
मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार
वाङ्मय पुरस्कार साताऱ्याच्या सावित्री जगदाळे यांना जाहीर
आणि
·
३१ जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागांत मध्यम ते मुसळधार
पावसाचा अंदाज
****
लोकसभेत गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेली कोंडी फोडून सार्वजनिक परीक्षा अनुचित
साधने प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर कालपासून चर्चा सुरू झाली. या विधेयकातल्या तरतुदींनुसार
संघटित पेपरफुटीसाठी सात ते दहा वर्षांची शिक्षा आणि १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद
आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाच ते दहा वर्षांची शिक्षा
आणि पाच कोटी रुपयापर्यंत दंड, तर परीक्षा आयोजक संस्थेला पाच कोटी रुपये दंड आणि आठ
वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदीची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. पेपर फुटीपासून
दोन महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं तीन महिन्यात सुनावणी
पूर्ण करुन निकाल द्यावा, अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर
चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. ते म्हणाले...
बाईट - केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलतांना, या आंदोलनादरम्यान तसंच आंदोलनानंतर
सरकारच्या भूमिकेवर टीका केली. भाजपचे तेजस्वी सूर्या यांनी याबाबत बोलतांना, पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांचं
नुकसान होऊ नये यासाठी सरकारने उचलेल्या पावलांची माहिती देत, पुढच्या वर्षीपासून ही परीक्षा
ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या सरकारच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी, या चर्चेत बोलतांना या विधेयकासंदर्भात
एक संयुक्त संसदीय समिती नेमून सर्व भागधारकांच्या विचारातून पेपरफुटी विरोधात कठोर
कायदा करण्याची गरज व्यक्त केली. तर शिवसेनेचे डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात, खासगी शिकवणी वर्गांचं नियमन
आणि विद्यार्थ्यांवर वाढता ताण कमी करण्यासंदर्भात काम करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
****
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या
१८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती
व्ही. मोहना यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत, विद्यार्थी तसंच पोलिसांना झालेल्या दुखापतींची
निःपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवलं. यासाठी सीसीटीव्हीचं
चित्रीकरण आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवावेत, मात्र ते जाहीर करू नये, असं न्यायालयानं सांगितलं.
यासंदर्भात दाखल याचिकांवर केंद्र सरकार तसंच महाराष्ट्र, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं
मागवली आहेत.
**
दरम्यान, या आंदोलनासंदर्भात महाराष्ट्रात आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे
मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केले आहे.
या आंदोलनादरम्यान, समाज माध्यमांवरच्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या ५०० पेक्षा जास्त खात्यांची
ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे. यातली काही खाती पाकिस्तानसह आखाती देशातून चालवली
जात असल्याचं समोर आलं आहे.
****
अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी
राज्यात पाच अन्य विशेष न्यायालयं स्थापन करण्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली
आहे. नांदेड, परभणी, अहिल्यानगर, सोलापूर आणि यवतमाळ इथं ही न्यायालयं स्थापन होणार आहेत.
मादक द्रव्यं आणि मादक पदार्थ अधिनियमांतर्गत दाखल झालेली प्रकरणं चालवण्याकरता
पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यालाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात
आली.
गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणांमध्ये स्वामित्वधनाच्या दहापट दंड
करण्यासाठी संबंधित नियमात सुधारणा करण्याला तसंच राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भातला अध्यादेश काढण्याला
मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
****
गुरुपौर्णिमा आज साजरी होत आहे. यानिमित्ताने शिर्डी इथं उत्सवाला कालपासून सुरुवात
झाली. काल सकाळी श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मुख्य
कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. भाविक
मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.
****
भारतीय रेल्वेनं दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या परभणी-मुदखेड दुहेरी
रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी १६३ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पाअंतर्गत या मार्गावरच्या सध्याच्या विद्युत पुरवठा प्रणालीचं संपूर्ण आधुनिकीकरण
करण्यात येणार असून, यामुळे या मार्गावरच्या प्रवासी तसंच मालवाहतूक रेल्वेची क्षमता आणि गती, दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ होणार
आहे. 'वंदे भारत एक्स्प्रेस'सारख्या वेगवान रेल्वेगाड्यांचं अधिक कार्यक्षम संचालन करण्यासाठीही हा प्रकल्प
महत्त्वाचा ठरणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा
साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे. येत्या २६
ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव
ठाले पाटील यांनी काल ही घोषणा केली. जगदाळे यांचा गोगलगाईचे पंख हा बालकवितासंग्रह, सफर मंगळावरची हा बालकथासंग्रह, तर उजळपरी, दुधाच्या मिशा, आजीपिझ्झा, स्पायडरमॅन ह्या बालकादंबऱ्यांसह
सोळा पुस्तकं प्रकाशित असून, या पुस्तकांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी
आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे
लातूर जिल्ह्यातल्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा व्हीएलई यांनी या प्रक्रियेसाठी
शेतकऱ्यांकडून कोणतंही शुल्क आकारू नये, शुल्क आकारल्याची तक्रार प्राप्त झाल्यास
किंवा तसे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.
भारत बास्टेवाड यांनी दिला.
****
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत परभणी जिल्ह्यात आजपर्यंत
दोन लाख एक हजार ९१२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून एक लाख ३४ हजार १८७ हेक्टर क्षेत्र
संरक्षित केलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी ३१ जुलै पूर्वी पिक विमा उतरवून योजनेचा लाभ
घ्यावा, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसंच तटबंदीपासून १५ मीटरच्या
आत असलेली सर्व अतिक्रमणं तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारसा जतन समितीचे
अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या
उपस्थितीत काल यासंदर्भात बैठक झाली. शहरातले ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी आणि इतर वारसास्थळांवरची
स्वच्छता करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
****
अनुसूचित जाती उपवर्गिकरणाच्या विरोधात धाराशिव इथं काल एल्गार मोर्चा काढण्यात
आली. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंनदराज आंबेडकर यांनी यावेळी दिला.
****
हवामान
राज्यात आजपासून ते ३१ जुलैपर्यंत विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे
तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातल्या
घाट परिसरात पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहावं, विशेषतः सखल भाग, नदी-नाल्यांचा परिसर तसंच
घाट रस्त्यांवरून प्रवास करताना अधिक काळजी घेणं आवश्यक असल्याचं आपत्ती व्यवस्थापन
विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पातून सुमारे ७० हजार दशलक्ष
घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे जायकवाडी धरणात सध्या
सुमारे ४२ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असून, धरणाची पाणीपातळी ६५ पूर्णांक
७६ टक्क्यांवर पोहोचली आहे.
****
ग्लासगो इथं सुरू
असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर
सिंगने रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीतलं भारताचं हे पहिलंच पदक
आहे.
****
No comments:
Post a Comment