Thursday, 2 November 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 02.11.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 November 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

ग्रामीण पंचायतराज संस्था अधिक सक्षम झाल्या तरच आपला देश वेगानं प्रगती करेल, असं प्रतिपादन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलं आहे. मुंबई इथं आयोजित ‘७३ आणि ७४व्या घटना दुरुस्तीची २५ वर्षे : प्रगती आणि भावी वाटचाल’ या विषयावरच्या परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यावेळी उपस्थित होते. राज्य शासनानं विविध अधिकारांचं विकेंद्रीकरण करुन पंचायतराज संस्थांचं अधिक सक्षमीकरण करावं, असं ते म्हणाले.

वित्त आयोगाचा १५ हजार कोटी रुपयांचा निधी राज्यातल्या ग्रामपंचायतींना थेट उपलब्ध करुन दिला जाणार आहे, तसंच सरपंचाची थेट निवड करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे, अशा विविध निर्णयातून ग्रामीण पंचायतराज संस्थांचं सक्षमीकरण करण्यात येत असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

****

युनेस्कोनं आज आशिया-पॅसिफिक पुरस्काराची घोषणा केली असून, यात देशातल्या सात वारसा स्थळांचा समावेश आहे. यापैकी चार वारसा स्थळे ही मुंबईतली आहेत. यात भायखळ्याचं ख्रिस्त चर्च, रॉयल बॉम्बे ॲपेरा हाऊस, बोमोनजी होरमर्जी वाडिया फौंटेन अँड क्लॉक टॉवर आणि वेलिंग्टन फौंटेन या स्थळांना वारसा स्थळाचा पुरस्कार मिळाला आहे. 

****

आधार कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं संमती दर्शवली आहे. आधार कायदा गोपनियतेच्या अधिकाराचं उल्लंघन करतो, तसंच बायोमॅट्रीक व्यवस्थाही योग्य काम करत नाही, असं या याचिकेत म्हटलं आहे.

****

वर्ल्ड फूड इंडिया २०१७ मेळावा उद्यापासून नवी दिल्लीत सुरु होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात खाद्यपदार्थ क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीसंबंधी तसंच तांत्रिक माहिती दिली जाणार आहे. या मेळाव्यात ३० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, विविध देशांच्या अन्न प्रक्रिया उद्योगांची माहिती देणार असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितलं. 

****

उत्तरप्रदेशात रायबरेली जिल्ह्यातल्या राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळाच्या उंचाहर प्रकल्पात काल झालेल्या स्फोटातल्या बळींची संख्या ३० वर पोहचली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून बचावकार्य पूर्ण झालं असून, संयंत्रामध्ये आता कोणीही नसल्याचं रायबरेलीचे जिल्हाधिकारी संजीव कुमार खत्री यांनी सांगितलं.

****

रेशीम उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडून त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी येईल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे. येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत राज्यात महारेशीम अभियान राबवण्यात येणार असून, जालना इथं आज या अभियानाचा शुभारंभ खोतकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. जालना इथं होणाऱ्या रेशीम कोष बाजारपेठेत जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले रेशीम कोष विक्री करणं शक्य होणार असल्याचं खोतकर यांनी यावेळी सांगितलं. या अभियानांतर्गत रेशीम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि समता दूतांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन रेशीम उद्योगाबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन हा व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

****

औरंगाबाद इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज मागासवर्गीय विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती देण्याच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढत भीक मांगो आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.

****

धुळे इथला गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्याच्या खून प्रकरणात सरकार पक्षातर्फे काम पाहण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधी न्याय विभागाचे सेक्शन अधिकारी आर.व्ही.चव्हाण यांनी ही माहिती दिली. गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्याचा १७ जुलै रोजी धुळे शहरात निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत आज भारतीय नेमबाज गगन नारंगनं ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेतलं कांस्य पदकंही भारताच्याच स्वप्नील सुरेशनं जिंकलं आहे. तर महिलांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात स्नूराज सिंह हीनं कांस्य पदक जिंकलं आहे.

****

महिलांच्या आशिया मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची एम सी मेरी कोम उपान्त्य फेरीत पोहोचली आहे. पहिल्या फेरीत ४८ किलोग्रॅम वजनी गटात मेरी कोमनं डियेम थ्रिम त्रिम क्यू हीचा पराभव केला. उपान्त्य फेरीच्या सामन्यात मेरी कोमचा सामना चीनी तैपेईच्या मेंग ची पिंग विरुद्ध होणार आहे.

****

TEXT-AIR NEWS AURANGABAD 02.11.2017- 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 November 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ०२ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.

*****

जम्मू काश्मीरमधल्या सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आज सकाळी पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. या हल्ल्याला प्रत्यूत्तर देताना सीमा सुरक्षा बलाच्या एका जवानाला वीरमरण आलं. आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या जवानांवर हा गोळीबार करण्यात आला. शहीद जवान पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद इथले रहीवाशी आहेत.

दरम्यान, अनंतनाग जिल्ह्यात सरनाल भागात दहशतवाद्यांनी आज सकाळी केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या तुकडीवर हल्ला केला. यात पाच जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. पोलिस बलाच्या जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं, मात्र दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

*****

उत्तरप्रदेशात रायबरेली जिल्ह्यातल्या राष्ट्रीय औष्णीक वीज महामंडळाच्या उंचाहर प्रकल्पात काल झालेल्या स्फोटातल्या बळींची संख्या २६ वर पोहचली आहे. यात अनेक जण ७० टक्क्यांपेक्षा जास्त भाजले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं गृहविभागाचे प्रधानसचिव अरविंद कुमार यांनी सांगितलं.

*****

भारताचे पाकिस्तानातले उच्चायुक्त म्हणून वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अजय बिसारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल रात्री परराष्ट्र मंत्रालयानं काढलेल्या निवेदनात ही माहिती दिली. १९८७ च्या तुकडीतले भारतीय प्रशासनिक सेवेचे अधिकारी असलेले बिसारिया हे गौतम बंबवाले यांची जागा घेतील. गेल्या महिन्यात बंबवाले यांची चीनमध्ये नियुक्ती झाली आहे. बिसारिया सध्या पोलंडमधील भारताचे राजदूत आहेत.

*****

बिहार सरकारनं आऊटसोर्सींग संस्थाच्या माध्यमातून व्यावसायिक आणि इतर कर्मचारी सेवेत घेतानाही आपलं आरक्षण धोरण राबवायचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पाटण्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह विविध तांत्रिक कामांसाठी तसंच वाहनचालकापासून सफाई कामगारापर्यंत इतरही कामांसाठी सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये हजारो लोकांना आऊट सोर्सींग संस्थामार्फत काम दिलं जातं. सध्याच्या धोरणानुसार  मागास जातींच्या आरक्षणाशिवाय महिलांसाठीही ३५ टक्के आरक्षण आहे.

*****

शेतकऱ्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी असल्याचं कृषी, फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद, मूग आणि सोयाबिन खरेदी केंद्र, तसंच शेतकरी भवनाचं उद्घाटन आज खोत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना आता मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होणार असल्याचं ते म्हणाले.

*****

कर्करोगाच्या रुग्णांसाठीच्या मार्गदर्शनासाठी लाईव्ह व्हर्चुअल ट्युमर बोर्ड चा वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितलं आहे. मुंबई इथं लाईव्ह व्हर्चुअल ट्युमर बोर्डचं उद्घाटन महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. याअंतर्गत कर्करोगाच्या रुग्णांना तज्ज्ञ वैद्यांकडून लाईव्ह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

*****

शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या तसंच लोककला प्रकारात सहभाग नोंदवणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देऊन प्रोत्साहन देण्याचा निर्णय सांस्कृतिक विभागानं घेतला आहे. मार्च २०१८ मध्ये घेतल्या जाणार्या दहावीच्या परिक्षेत या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळणार आहेत.

*****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या लाखणी-जांबरखेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सातपैकी तीन सदस्यांनी सरपंचाच्या कामकाजाला कंटाळून सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सरपंचांनी मात्र हा राजीनामा स्वीकारला नसून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लाखणी-जांबरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका बारसे या पदाचा गैरवापर करुन, सर्व निधी जांबरखेडा गावासाठीच खर्च करतात आणि लाखणीच्या विकासाकडे दुर्लक्ष करतात अशी या सदस्यांची तक्रार आहे.

*****

लातूर जिल्ह्यातल्या ११ बाजार समित्या तीन दिवसांपासून बंद असून, शेतकऱ्यांसोबत हमाल, मापाडी, मजूर आणि गाडीवानांचाही रोजगार बुडाला आहे. लातूर बाजार समितीच्या यंत्रणेत जवळपास पाच हजार कामगार काम करतात. सोयाबीनच्या भावावरून या समित्या बंद आहेत.

*****

जपानमधे काकामिगाहारा इथं सुरु असलेल्या आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारतानं कझाकीस्तानचा सात - एक असा पराभव केला. या स्पर्धेत भारतीय संघाचा आतापर्यंत एकही पराभव झाला नाही.  

*******

Regional Urdu Audio Bulletin, Aurangabad, Date: 02.11.2017 ,Time:8.40-8....


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad, Date: 02.11.2017 ,Time:8.40-8.45 am

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 02.11.2017_6.50

TEXT-AIR NEWS BULLETIN AURANGABAD 02.11.2017 06.50




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 November 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

*******

·    २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय नेत्यांनी उमेदवारी अर्जात नमूद केलेल्या गुन्हेगारी प्रकरणांसंदर्भात माहिती सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

·    सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचं पुनर्चक्रीकरण आणि पुनर्वापर करण्याच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

·    कृषी पंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीज बील भरण्यास पंधरा दिवसांची मुदतवाढ

आणि

·    नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेनुसार काँग्रेसच्या शीला भवरे यांची तर उपमहापौरपदी विनय गिरडे पाटील यांची निवड



*****

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरतांना ज्या राजकीय नेत्यांनी उमेदवारी अर्जात त्यांच्याविरूद्ध असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांचा उल्लेख केला आहे, त्या सर्व प्रकरणांची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. खासदार आणि आमदारांविरूद्धच्या गुन्हेगारीच्या प्रकरणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांची एकत्रित सुनावणी करताना न्यायालयानं काल एक हजार पाचशे एक्याऐंशी प्रकरणांपैकी किती प्रकरणं एका वर्षाच्या आत निकाली काढली, तसंच किती नेत्यांविरूद्ध गुन्हे सिद्ध झाले आणि किती जण निर्दोष सुटले याचीही माहिती सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. राजकीय गुन्हेगारीकरण संपुष्टात आणण्याची आवश्यकता असल्याचं केंद्र सरकारनं न्यायालयात सांगितलं असून यासाठी राजकीय नेत्यांविरूद्धचे गुन्हे लवकरात लवकर निपटण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यास सरकारचा विरोध नसल्याचं म्हटलं आहे. गुन्हेगारी प्रकरणात दोषी आढळलेल्या राजकीय नेत्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची निवडणूक आयोग आणि विधी आयोगाची सूचना सरकाच्या विचाराधिन असल्याचंही न्यायालयाला सांगितलं.

*****

पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करण्यासह जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्याच्या नागरी भागात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचं पुनर्चक्रीकरण आणि पुनर्वापर करण्याच्या धोरणास काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सध्या एकूण सांडपाण्यापैकी केवळ १० ते २० टक्केच सांडपाण्यावर प्रक्रिया होते. नव्या धोरणानुसार, राज्याच्या नागरी भागात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासोबत त्याचं पुनर्चक्रीकरण आणि पुनर्वापर करण्याचं कर्तव्य संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचं राहणार आहे. प्रक्रिया केलेलं हे पाणी औष्णिक विद्युत केंद्र,  औद्योगिक क्षेत्रं, रेल्वे किंवा इतर मोठे खरेदीदार आणि कृषी क्षेत्राला पुरवलं जाणार आहे.

*****

अंगणातल्या कुक्कुटपालनास चालना देण्यासाठी राज्यातल्या ३०२ तालुक्यांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यासदेखील काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेतून लाभार्थ्याला ५० टक्के म्हणजे ५ लाख १३ हजार ७५० रुपये अनुदान मिळणार आहे.

ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातल्या कारखान्यांना विविध सुविधांच्या वापरापोटी संबंधित पंचायतींना कराऐवजी ठोक रकमेच्या स्वरुपात अंशदान देण्याबाबतची तरतूद ग्रामपंचायत अधिनियमातून वगळण्यासदेखील काल मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. विविध कर आणि शुल्कापोटी ग्रामपंचायत कारखान्यांकडून अशा प्रकारची ठोक रक्कम वसूल करत असे. 

नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या ९१७ कोटी ७४ लाख रुपयांच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय प्रस्तावासही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मान्यतेमुळे येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यामधील एकूण ७४ हजार २१० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल.

*****

राज्यातल्या कृषी पंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीज बील भरण्यास सरकारनं पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. गेल्या ३० ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेनुसार शेतकऱ्यांना सात नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता १५ नोव्हेंबर पर्यंत वाढण्यात आली असून, आता १५ नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीजजोडणी खंडीत केली जाणार नाही.

*****

घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत त्र्याण्णव रुपयांनी वाढ झाली आहे. तर अनुदानित गॅस सिलिंडरची किंमतही साडे चार रुपयांनी वाढली आहे. कालपासून हे नवे दर लागू झाले.

*****

रेल्वेचं नवं वेळापत्रक कालपासून अंमलात आलं आहे. या नव्या वेळापत्रकानुसार अनेक गाड्यांच्या वेळेत बदल झाला असून, प्रवासाचा कालावधी कमी झाला आहे. रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागात वेळेत बदल झालेल्या गाड्यांमध्ये नांदेड-संभलपूर, नांदेड-विशाखापट्टणम, परळी –अकोला, परळी –आदिलाबाद, हैद्राबाद-अजमेर, नांदेड- बेंगळुरू, ओखा- रामेश्वरम, शिर्डी- सिकंदराबाद, पुणे –हैदराबाद, बिकानेर –सिकंदराबाद, नागपूर –मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस आदी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

*****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शीला भवरे यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसच्याच विनय गिरडे पाटील यांची निवड झाली आहे. या दोघांनी प्रत्येकी ७४ मतं मिळवत भाजपच्या उमदेवारांचा पराभव केला. भाजपच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी सहा मते मिळाली.

*****

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा काल सिने अभिनेते संदीप पाठक यांच्या उपस्थितीत समारोप झाला. पाठक यांच्या हस्ते यावेळी विविध कलाप्रकारातल्या विजेत्यांना तसंच महाविद्यालयीन संघांना बक्षीस वितरण करण्यात आलं. या युवक महोत्सवात औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद मिळालं.

*****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागच्या हंगामाची थकित बिलं त्वरित देण्यात यावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. या मागणीसह इतर विविध मागण्यांचं पत्र संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास, संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

*****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १० अधिसभा सदस्यांच्या निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या ज्ञानतीर्थ पॅनलचे नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित एका जागेवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचचा उमेदवार विजयी झाला.

*****

मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन संघटन स्थापन करणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. यासाठी आपण लवकरच मराठवाड्याचा दौरा करणार असून सर्व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय केला जाईल, असं ते म्हणाले.

*****

नांदेड इथले भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते संभाजी पवार आलूवडगावकर यांचं काल रात्री साडे दहा वाजता, दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थीवावर  सांगवी बुद्रुक इथं दुपारी दोन वाजेनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती, तसंच काही काळ ते नांदेड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षही होते.

*****

भारत आणि न्युझिलंड यांच्यात काल नवी दिल्लीत झालेला पहिला २० षटकांचा क्रिकेट सामना भारतानं ५३ धावांनी जिंकला. प्रारंभी फलंदाजी करत भारतानं २० षटकात, तीन गड्यांच्या मोबदल्यात २०२ धावांचं आव्हान न्यूझिलंड संघासमोर ठेवलं होतं. मात्र निर्धारीत षटकात न्यूझिलंडचा संघ केवळ १४९ धावाच करू शकला. सामन्यात ८० धावा करणारा भारताचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन सामनावीर ठरला.

*****

ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत काल पुरुषांच्या दहा मीटर्स एअर पिस्तुल स्पर्धेत भारतानं सर्व पदकं जिंकली आहेत. शाहजर रिझवीनं सुवर्ण, ओमकार सिंहनं रजत तर जीतू रायनं कांस्य पदक जिंकलं.

*****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...