Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 02 November 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
ग्रामीण
पंचायतराज संस्था अधिक सक्षम झाल्या तरच आपला देश वेगानं प्रगती करेल, असं प्रतिपादन
राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलं आहे. मुंबई इथं आयोजित ‘७३ आणि ७४व्या घटना
दुरुस्तीची २५ वर्षे : प्रगती आणि भावी वाटचाल’ या विषयावरच्या परिषदेचं उद्घाटन त्यांच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्य निवडणूक
आयुक्त जे एस सहारिया यावेळी उपस्थित होते. राज्य शासनानं विविध अधिकारांचं विकेंद्रीकरण
करुन पंचायतराज संस्थांचं अधिक सक्षमीकरण करावं, असं ते म्हणाले.
वित्त
आयोगाचा १५ हजार कोटी रुपयांचा निधी राज्यातल्या ग्रामपंचायतींना थेट उपलब्ध करुन दिला
जाणार आहे, तसंच सरपंचाची थेट निवड करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे, अशा विविध
निर्णयातून ग्रामीण पंचायतराज संस्थांचं सक्षमीकरण करण्यात येत असल्याचं मुंडे यांनी
यावेळी सांगितलं.
****
युनेस्कोनं
आज आशिया-पॅसिफिक पुरस्काराची घोषणा केली असून, यात देशातल्या सात वारसा स्थळांचा समावेश
आहे. यापैकी चार वारसा स्थळे ही मुंबईतली आहेत. यात भायखळ्याचं ख्रिस्त चर्च, रॉयल
बॉम्बे ॲपेरा हाऊस, बोमोनजी होरमर्जी वाडिया फौंटेन अँड क्लॉक टॉवर आणि वेलिंग्टन फौंटेन
या स्थळांना वारसा स्थळाचा पुरस्कार मिळाला आहे.
****
आधार
कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सुनावणी घेण्यास सर्वोच्च
न्यायालयानं संमती दर्शवली आहे. आधार कायदा गोपनियतेच्या अधिकाराचं उल्लंघन करतो, तसंच
बायोमॅट्रीक व्यवस्थाही योग्य काम करत नाही, असं या याचिकेत म्हटलं आहे.
****
वर्ल्ड
फूड इंडिया २०१७ मेळावा उद्यापासून नवी दिल्लीत सुरु होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या
मेळाव्यात खाद्यपदार्थ क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीसंबंधी तसंच तांत्रिक माहिती दिली
जाणार आहे. या मेळाव्यात ३० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, विविध देशांच्या
अन्न प्रक्रिया उद्योगांची माहिती देणार असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल यांनी सांगितलं.
****
उत्तरप्रदेशात
रायबरेली जिल्ह्यातल्या राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळाच्या उंचाहर प्रकल्पात काल झालेल्या
स्फोटातल्या बळींची संख्या ३० वर पोहचली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून बचावकार्य
पूर्ण झालं असून, संयंत्रामध्ये आता कोणीही नसल्याचं रायबरेलीचे जिल्हाधिकारी संजीव
कुमार खत्री यांनी सांगितलं.
****
रेशीम
उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडून त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी
येईल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर
यांनी व्यक्त केला आहे. येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत राज्यात महारेशीम अभियान राबवण्यात
येणार असून, जालना इथं आज या अभियानाचा शुभारंभ खोतकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी
ते बोलत होते. जालना इथं होणाऱ्या रेशीम कोष बाजारपेठेत जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले रेशीम कोष विक्री करणं शक्य होणार असल्याचं खोतकर यांनी
यावेळी सांगितलं. या अभियानांतर्गत रेशीम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि समता दूतांनी
प्रत्येक गावामध्ये जाऊन रेशीम उद्योगाबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन हा व्यवसाय करण्यासाठी
प्रवृत्त करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
****
औरंगाबाद
इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज मागासवर्गीय विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती
देण्याच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढत भीक मांगो आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी
विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा
काढण्यात आला. मोर्चानंतर समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.
****
धुळे
इथला गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्याच्या खून प्रकरणात सरकार पक्षातर्फे काम पाहण्यासाठी
विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधी न्याय
विभागाचे सेक्शन अधिकारी आर.व्ही.चव्हाण यांनी ही माहिती दिली. गुंड रफियोद्दीन शेख
उर्फ गुड्ड्याचा १७ जुलै रोजी धुळे शहरात निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात
१२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
ऑस्ट्रेलियातल्या
ब्रिस्बेन इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत आज भारतीय नेमबाज गगन नारंगनं
५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे. या स्पर्धेतलं कांस्य पदकंही
भारताच्याच स्वप्नील सुरेशनं जिंकलं आहे. तर महिलांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात स्नूराज
सिंह हीनं कांस्य पदक जिंकलं आहे.
****
महिलांच्या
आशिया मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची एम सी मेरी कोम उपान्त्य फेरीत पोहोचली
आहे. पहिल्या फेरीत ४८ किलोग्रॅम वजनी गटात मेरी कोमनं डियेम थ्रिम त्रिम क्यू हीचा
पराभव केला. उपान्त्य फेरीच्या सामन्यात मेरी कोमचा सामना चीनी तैपेईच्या मेंग ची पिंग
विरुद्ध होणार आहे.
****
No comments:
Post a Comment