Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
*****
जम्मू काश्मीरमधल्या सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय
सीमेजवळ आज सकाळी पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. या हल्ल्याला प्रत्यूत्तर देताना
सीमा सुरक्षा बलाच्या एका जवानाला वीरमरण आलं. आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास गस्तीवर
असलेल्या जवानांवर हा गोळीबार करण्यात आला. शहीद जवान पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद
इथले रहीवाशी आहेत.
दरम्यान, अनंतनाग जिल्ह्यात सरनाल भागात दहशतवाद्यांनी आज सकाळी
केंद्रीय राखीव पोलिस बलाच्या तुकडीवर हल्ला केला. यात पाच जवान जखमी झाल्याचं वृत्त
आहे. पोलिस बलाच्या जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं, मात्र दहशतवादी
पळून जाण्यात यशस्वी झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
*****
उत्तरप्रदेशात रायबरेली जिल्ह्यातल्या राष्ट्रीय औष्णीक वीज
महामंडळाच्या उंचाहर प्रकल्पात काल झालेल्या स्फोटातल्या बळींची संख्या २६ वर पोहचली
आहे. यात अनेक जण ७० टक्क्यांपेक्षा जास्त भाजले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं
गृहविभागाचे प्रधानसचिव अरविंद कुमार यांनी सांगितलं.
*****
भारताचे पाकिस्तानातले उच्चायुक्त म्हणून वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अजय बिसारिया
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल रात्री परराष्ट्र मंत्रालयानं काढलेल्या निवेदनात
ही माहिती दिली. १९८७ च्या तुकडीतले भारतीय प्रशासनिक सेवेचे अधिकारी असलेले बिसारिया
हे गौतम बंबवाले यांची जागा घेतील. गेल्या महिन्यात बंबवाले यांची चीनमध्ये नियुक्ती
झाली आहे. बिसारिया सध्या पोलंडमधील भारताचे राजदूत आहेत.
*****
बिहार सरकारनं आऊटसोर्सींग संस्थाच्या माध्यमातून व्यावसायिक
आणि इतर कर्मचारी सेवेत घेतानाही आपलं आरक्षण धोरण राबवायचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री
नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पाटण्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासह विविध तांत्रिक कामांसाठी तसंच वाहनचालकापासून सफाई
कामगारापर्यंत इतरही कामांसाठी सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये हजारो लोकांना आऊट
सोर्सींग संस्थामार्फत काम दिलं जातं. सध्याच्या धोरणानुसार मागास जातींच्या आरक्षणाशिवाय महिलांसाठीही ३५ टक्के
आरक्षण आहे.
*****
शेतकऱ्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी शासन त्यांच्या
पाठीशी असल्याचं कृषी, फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद, मूग आणि सोयाबिन खरेदी केंद्र, तसंच शेतकरी
भवनाचं उद्घाटन आज खोत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना आता मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होणार असल्याचं
ते म्हणाले.
*****
कर्करोगाच्या रुग्णांसाठीच्या मार्गदर्शनासाठी लाईव्ह
व्हर्चुअल ट्युमर बोर्ड चा वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितलं आहे. मुंबई इथं लाईव्ह व्हर्चुअल
ट्युमर बोर्डचं उद्घाटन महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. याअंतर्गत
कर्करोगाच्या रुग्णांना तज्ज्ञ वैद्यांकडून लाईव्ह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
*****
शास्त्रीय कला क्षेत्रात प्राविण्य
मिळवणाऱ्या तसंच लोककला प्रकारात सहभाग नोंदवणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देऊन प्रोत्साहन देण्याचा निर्णय सांस्कृतिक
विभागानं घेतला आहे. मार्च २०१८ मध्ये घेतल्या जाणार्या दहावीच्या परिक्षेत या निर्णयानुसार
विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळणार आहेत.
*****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या लाखणी-जांबरखेडा
ग्रुप ग्रामपंचायतीच्या सातपैकी तीन सदस्यांनी सरपंचाच्या कामकाजाला कंटाळून सदस्यत्वाचा
राजीनामा दिला आहे. सरपंचांनी मात्र हा राजीनामा स्वीकारला नसून, प्रशासनाच्या भूमिकेकडे
सर्वांचं लक्ष लागलं आहे. लाखणी-जांबरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका बारसे या पदाचा
गैरवापर करुन, सर्व निधी जांबरखेडा गावासाठीच खर्च करतात आणि लाखणीच्या विकासाकडे दुर्लक्ष
करतात अशी या सदस्यांची तक्रार आहे.
*****
लातूर जिल्ह्यातल्या ११ बाजार समित्या तीन दिवसांपासून
बंद असून, शेतकऱ्यांसोबत हमाल, मापाडी, मजूर आणि गाडीवानांचाही रोजगार बुडाला आहे.
लातूर बाजार समितीच्या यंत्रणेत जवळपास पाच हजार कामगार काम करतात. सोयाबीनच्या भावावरून
या समित्या बंद आहेत.
*****
जपानमधे काकामिगाहारा इथं सुरु असलेल्या
आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.
आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारतानं कझाकीस्तानचा सात - एक असा पराभव केला. या
स्पर्धेत भारतीय संघाचा आतापर्यंत एकही पराभव झाला नाही.
*******
No comments:
Post a Comment