Thursday, 2 November 2017

TEXT-AIR NEWS BULLETIN AURANGABAD 02.11.2017 06.50




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 November 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ नोव्हेंबर २०१७ सकाळी .५० मि.

*******

·    २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय नेत्यांनी उमेदवारी अर्जात नमूद केलेल्या गुन्हेगारी प्रकरणांसंदर्भात माहिती सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

·    सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचं पुनर्चक्रीकरण आणि पुनर्वापर करण्याच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

·    कृषी पंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीज बील भरण्यास पंधरा दिवसांची मुदतवाढ

आणि

·    नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षेनुसार काँग्रेसच्या शीला भवरे यांची तर उपमहापौरपदी विनय गिरडे पाटील यांची निवड



*****

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरतांना ज्या राजकीय नेत्यांनी उमेदवारी अर्जात त्यांच्याविरूद्ध असलेल्या गुन्हेगारी प्रकरणांचा उल्लेख केला आहे, त्या सर्व प्रकरणांची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. खासदार आणि आमदारांविरूद्धच्या गुन्हेगारीच्या प्रकरणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांची एकत्रित सुनावणी करताना न्यायालयानं काल एक हजार पाचशे एक्याऐंशी प्रकरणांपैकी किती प्रकरणं एका वर्षाच्या आत निकाली काढली, तसंच किती नेत्यांविरूद्ध गुन्हे सिद्ध झाले आणि किती जण निर्दोष सुटले याचीही माहिती सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. राजकीय गुन्हेगारीकरण संपुष्टात आणण्याची आवश्यकता असल्याचं केंद्र सरकारनं न्यायालयात सांगितलं असून यासाठी राजकीय नेत्यांविरूद्धचे गुन्हे लवकरात लवकर निपटण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यास सरकारचा विरोध नसल्याचं म्हटलं आहे. गुन्हेगारी प्रकरणात दोषी आढळलेल्या राजकीय नेत्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची निवडणूक आयोग आणि विधी आयोगाची सूचना सरकाच्या विचाराधिन असल्याचंही न्यायालयाला सांगितलं.

*****

पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करण्यासह जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्याच्या नागरी भागात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचं पुनर्चक्रीकरण आणि पुनर्वापर करण्याच्या धोरणास काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सध्या एकूण सांडपाण्यापैकी केवळ १० ते २० टक्केच सांडपाण्यावर प्रक्रिया होते. नव्या धोरणानुसार, राज्याच्या नागरी भागात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासोबत त्याचं पुनर्चक्रीकरण आणि पुनर्वापर करण्याचं कर्तव्य संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचं राहणार आहे. प्रक्रिया केलेलं हे पाणी औष्णिक विद्युत केंद्र,  औद्योगिक क्षेत्रं, रेल्वे किंवा इतर मोठे खरेदीदार आणि कृषी क्षेत्राला पुरवलं जाणार आहे.

*****

अंगणातल्या कुक्कुटपालनास चालना देण्यासाठी राज्यातल्या ३०२ तालुक्यांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यासदेखील काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेतून लाभार्थ्याला ५० टक्के म्हणजे ५ लाख १३ हजार ७५० रुपये अनुदान मिळणार आहे.

ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातल्या कारखान्यांना विविध सुविधांच्या वापरापोटी संबंधित पंचायतींना कराऐवजी ठोक रकमेच्या स्वरुपात अंशदान देण्याबाबतची तरतूद ग्रामपंचायत अधिनियमातून वगळण्यासदेखील काल मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. विविध कर आणि शुल्कापोटी ग्रामपंचायत कारखान्यांकडून अशा प्रकारची ठोक रक्कम वसूल करत असे. 

नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या ९१७ कोटी ७४ लाख रुपयांच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय प्रस्तावासही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मान्यतेमुळे येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यामधील एकूण ७४ हजार २१० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल.

*****

राज्यातल्या कृषी पंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीज बील भरण्यास सरकारनं पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. गेल्या ३० ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेनुसार शेतकऱ्यांना सात नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता १५ नोव्हेंबर पर्यंत वाढण्यात आली असून, आता १५ नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीजजोडणी खंडीत केली जाणार नाही.

*****

घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत त्र्याण्णव रुपयांनी वाढ झाली आहे. तर अनुदानित गॅस सिलिंडरची किंमतही साडे चार रुपयांनी वाढली आहे. कालपासून हे नवे दर लागू झाले.

*****

रेल्वेचं नवं वेळापत्रक कालपासून अंमलात आलं आहे. या नव्या वेळापत्रकानुसार अनेक गाड्यांच्या वेळेत बदल झाला असून, प्रवासाचा कालावधी कमी झाला आहे. रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागात वेळेत बदल झालेल्या गाड्यांमध्ये नांदेड-संभलपूर, नांदेड-विशाखापट्टणम, परळी –अकोला, परळी –आदिलाबाद, हैद्राबाद-अजमेर, नांदेड- बेंगळुरू, ओखा- रामेश्वरम, शिर्डी- सिकंदराबाद, पुणे –हैदराबाद, बिकानेर –सिकंदराबाद, नागपूर –मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस आदी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

*****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या शीला भवरे यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसच्याच विनय गिरडे पाटील यांची निवड झाली आहे. या दोघांनी प्रत्येकी ७४ मतं मिळवत भाजपच्या उमदेवारांचा पराभव केला. भाजपच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी सहा मते मिळाली.

*****

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा काल सिने अभिनेते संदीप पाठक यांच्या उपस्थितीत समारोप झाला. पाठक यांच्या हस्ते यावेळी विविध कलाप्रकारातल्या विजेत्यांना तसंच महाविद्यालयीन संघांना बक्षीस वितरण करण्यात आलं. या युवक महोत्सवात औरंगाबाद इथल्या देवगिरी महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद मिळालं.

*****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागच्या हंगामाची थकित बिलं त्वरित देण्यात यावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. या मागणीसह इतर विविध मागण्यांचं पत्र संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास, संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.

*****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १० अधिसभा सदस्यांच्या निवडणुकीकाँग्रेस - राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या ज्ञानतीर्थ पॅनलचे नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित एका जागेवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचचा उमेदवार विजयी झाला.

*****

राठवाड्याच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन संघटन स्थापन करणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. यासाठी आपण लवकरच मराठवाड्याचा दौरा करणार असून सर्व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय केला जाईल, असं ते म्हणाले.

*****

नांदेड इथले भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते संभाजी पवार आलूवडगावकर यांचं काल रात्री साडे दहा वाजता, दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थीवावर  सांगवी बुद्रुक इथं दुपारी दोन वाजेनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती, तसंच काही काळ ते नांदेड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षही होते.

*****

भारत आणि न्युझिलंड यांच्यात काल नवी दिल्लीत झालेला पहिला २० षटकांचा क्रिकेट सामना भारतानं ५३ धावांनी जिंकला. प्रारंभी फलंदाजी करत भारतानं २० षटकात, तीन गड्यांच्या मोबदल्यात २०२ धावांचं आव्हान न्यूझिलंड संघासमोर ठेवलं होतं. मात्र निर्धारीत षटकात न्यूझिलंडचा संघ केवळ १४९ धावाच करू शकला. सामन्यात ८० धावा करणारा भारताचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन सामनावीर ठरला.

*****

ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत काल पुरुषांच्या दहा मीटर्स एअर पिस्तुल स्पर्धेत भारतानं सर्व पदकं जिंकली आहेत. शाहजर रिझवीनं सुवर्ण, ओमकार सिंहनं रजत तर जीतू रायनं कांस्य पदक जिंकलं.

*****

No comments: