Saturday, 1 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.

****



Ø ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’चा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

Ø केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातल्या काँग्रेस पक्षाच्या संघर्ष यात्रेला कोल्हापुरमधून सुरूवात

Ø अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांचे माओवादी संघटनांशी संबंध असल्याबाबत सबळ पुरावे असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

Ø १० महामंडळं,  सहा मंडळं, दोन प्राधिकरणं आणि एका आयोगावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची राज्य शासनाची घोषणा

आणि

Ø आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला दोन रजत आणि चार कांस्य पदक तर इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला पहिल्या डावात २७ धावांची आघाडी

****



 केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातल्या काँग्रेस पक्षाच्या संघर्ष यात्रेला काल कोल्हापुरमधून प्रारंभ झाला. त्यापूर्वी शहरातनू रॅली काढण्यात आली. कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत मशाला प्रज्वलित करून या यात्रेला प्रारंभ करण्यात आला.



 त्यानंतर झालेल्या सभेत सर्व नेत्यांनी केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आणि लिंगायत समाजाच्या आरक्षणाला यावेळी पाठिंबा देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राज्यात विविध ठिकाणी रॅली काढून निदर्शनं करणार आहेत. यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आठ सप्टेंबरला पुण्यामध्ये होणार आहे.

****



 पुणे जिल्ह्यातल्या एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांचे माओवादी संघटनांशी संबंध असल्याबाबत सबळ पुरावे हाती लागल्याचं काल पोलिसांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था परमबीर सिंग यांनी अटकेत असलेल्या काही कार्यकर्त्यांदरम्यानच्या पत्रव्यवहारामधली काही पत्रं पत्रकार परिषदेत दाखवली. यापैकी एका पत्रात राजीव गांधी हत्येसारखी घटना घडवून आणण्याच्या कटाचा उल्लेख असल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. पोलिसांनी भूमिगत आणि इतर माओवाद्या दरम्यानची हजारो पत्र जप्त केली आहेत. या पत्रांमध्ये शस्त्र खरेदीसाठी लागणाऱ्या पैशांच्या मागणीचाही उल्लेख असल्याचं सिंग म्हणाले.

****



 राज्य शासनानं काल १० महामंडळं,  सहा मंडळं, दोन प्राधिकरणं आणि एका आयोगावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा केली. यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर नरेंद्र पाटील, यांची तर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण - म्हाडाच्या अध्यक्षपदी आमदार उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी श्रीमती ज्योती ठाकरे, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ अध्यक्षपदी संदिप जोशी, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ - सिडकोच्या अध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर तर महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षपदी राजा उर्फ सुधाकर सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****



 पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून शेख नासेर शेख चांद याचा खून केल्याप्रकरणी इम्रान मेहंदी आणि त्याचा साथीदार सय्यद जहीर उर्फ शेरा या दोघांना औरंगाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल जन्मठेप आणि पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणातले पाच आरोपींना न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं आहे. इम्रानला यापूर्वी माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्या प्रकरणातही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कुरेशी खून खटल्याचा तपास करत असतानाचं शेख नासेर यांच्या खूनाच्या घटनेचा उलगडा झाला होता.

****



 औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं मराठा, मुस्लिम, धनगर आणि कोळी समाजाच्या आरक्षणासाठी सुरू केलेलं आमरण उपोषण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सोडवण्यात आलं. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळताच मराठा आरक्षणाची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महिन्याच्या आत विधान मंडळाचे अधिवेशन बोलावण्यात येईल, असे लेखी आश्वासनांचं मुख्यमंत्र्यांचं पत्र, प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी दिल्यानंतर  हे उपोषण मागं घेण्यात आलं. काँग्रेसनं गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली होती. उपोषणकर्ते आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना काल वैद्यकीय उपचार देण्यात आले होते.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 जलसंधारणाची काम शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या गावांनाच पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतंर्गत निधी प्रदान करण्यात येणार आहे, त्यामुळे गावातल्या सरपंच, उपसरपंच, तसंच ग्रामसेवकांनी आपल्या गावातल्या कामांचा आराखडा येत्या आठ दिवसात सादर करावा असं आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी  केलं आहे. जलसंधारण कामं  -अंमलबजावणी संदर्भात आयोजित कार्यशाळेच्या  निमित्ताने जळकोट, अहमदपूर आणि  चाकूर इथं ते काल बोलत होते.    

****



 इंडोनेशिया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारताला दोन रजत आणि चार कांस्य पदक मिळाली. सुवर्ण पदकाची अपेक्षा निर्माण केलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचा काल अंतिम फेरीत जपानकडून दोन विरूद्ध एक गोलनं पराभव झाला. यामुळे भारतीय संघाला रजत पदकावर समाधान मानावं लागलं. नौकानयनमध्ये भारताच्या वर्षा गौतम आणि श्वेता शेरवेगार यांनी रजत पदक जिकलं. नौकानयनमध्येच खुल्या लेझर प्रकारात हृर्षिता तोमर हिनं कांस्य पदक जिकलं आहे. वरूण ठक्कर आणि गणपती चेनगप्पा यांनी पुरूषांच्या नौकानयनमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. मुष्टियुद्धात विकास कृष्णनला दुखापतीमुळे उपांत्य फेरीतून माघार घ्यावी लागल्यानं त्यालाही कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं. मात्र ४९ किलो गटात अमित पंगल अंतिम फेरीत दाखल झाला आहे.



 स्क्वॅशमध्ये सौरव घोसाल, हरींदर पालसिंग संधू, रमित टंडन आणि महेश मानगावकर यांच्या संघांनही कांस्यपदक पटकावलं. स्क्वॅशमध्येच भारताच्या महिला संघानं मलेशियाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

****



 चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडनं दुसऱ्या डावात बिनबाद सहा धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव २७३ धावांवर संपुष्टात आला. भारताला पहिल्या डावात २७ धावांची आघाडी मिळाली आहे. भारताच्या चेतेश्वर पुजारानं १३२ धावा केल्या आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. इंग्लंडच्या मोईन अलीनं पाच गडी बाद केले.

****



 येत्या डिसेंबर मध्ये तीन राज्यांच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागू नये म्हणून भारतीय जनता पक्ष एकत्रित निवडणुकीचा घाट घालत असल्याचा आरोप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली. इव्हिएम - मतदान यंत्रांच्या उपयोगाबाबतही राज ठाकरे यांनी यावेळी शंका उपस्थितीत केली.    

****



 केंद्र सरकारनं सुरु केलेल्या दीनदयाल कौशल विकास योजनेअंतर्गत जळगाव इथल्या दीपक जावळे या तरुणानं संगणकाचा ॲनिमेशन ॲण्ड मल्टिमेडिया हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. बिकट आर्थिक परिस्थितीत या योजनेचा झालेला फायदा सांगतांना दीपक जावळे  म्हणाले  -

मी दीनदयाल उपाध्याय योजना राष्ट्रीय उपयोगी अभियान याअंतर्गत ॲपेक्स कम्पूटर जळगाव या ठिकाणी ॲनिमेयशन ॲण्ड मल्टिमेडिया हा सहा महिन्यापर्यंत कालावधीचा अभ्यासक्रम शिकलो. आणि या अभ्यासक्रमाअंर्तगत मला बेसिक कम्पूटर, ग्रॉफिक डिझांइनीग, प्रिटिंग मिडिया. 2डी अॅनिमेशन आणि 3डी अॅनिमेशन या सारख्या आधुनिक विषयावर मी याठिकाणी स्थडीकेला. आणि या योजनेचं महत्त्व सांगायचं म्हटंल म्हणजे बाहेर ॲनिमेयशनया सारख्या याच अभ्यासक्रमाची फी जवळपास 1लाख ते दिडलाख रूपये आहे. आणि ही योजना माननीय पंतप्रधान यांनी सूरू केल्यामुळे आमच्या सारख्या तरूणांना एक वेगळ्या प्रकारचा आणि आधूनिक तऱ्येचा प्लाटर्फाम त्यांनी उपलब्ध करूण दिला. आमची जी परिस्थिती आहे. ही परिस्थिती अत्यंत हालाखीची असून माझे वडील एम.आय.डी.सी. मध्ये चटाईच्या कंपनी मध्ये जाऊन आमच्या कुटूंबाचं पालनपोषण करतात. या योजनाअंतर्गत हा अभ्यासक्रम मी मोफत शिकल्यामुळे याच प्रशिक्षण केंद्रामार्फत मला हा अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर एक रोजगाराची संधी उपलब्ध करूण दिली गेली. त्याबद्दल मी नरेंद्र मोदीजीनचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.

****



 एकलव्य संघटनेच्यावतीनं विविध मागण्यांसाठी काल औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकापासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापर्यंत टिकोरा मोर्चा काढण्यात आला होता. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये, वन जमीन आदिवासींच्या नावे करण्यात यावी, स्वाभिमान सबळीकरण योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासह विविध मागण्यांचं निवेदन आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प आधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं.

****



 औरंगाबाद इथल्या बीड बायपासवर काल देवळाई चौकात हायवा ट्रकनं मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर झाल्टा फाट्यावर एका माल मोटारीनं दिलेल्या धडकेत दुचाकीवरील गर्भवती महिला ठार झाली.

*****

***

Friday, 31 August 2018

AIR News Bulletin, Aurangabad 31.08.2018....Evening Bulletin

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.08.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 August 2018

Time 18.00 to 18.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ सायंकाळी ६.०० वा.

****

राज्यात अलिकडेच अटक करण्यात आलेले कार्यकर्ते माओवाद्यांशी संबंधित असल्याचे पुरावे आहेत तसंच त्यातील एकाच्या पत्रांमध्ये ‘राजीव गांधी यांच्याप्रमाणे प्रकार’ घडवण्याचा उल्लेख असल्याचं राज्य पोलिसांनी म्हटलं आहे. रोना विल्सन आणि माकपच्या एका नेत्यादरम्यान ईमेल संवादामध्ये ‘मोदीराज’ ‘राजीव गांधी सारख्या प्रकारानं’ संपवण्याचा उल्लेख असल्याचं अतिरिक्त पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितलं. 

****

कोल्हापुरातल्या औद्योगिक वसाहतीमध्ये आज सकाळी आग लागली. डिझेलच्या टाकीला गळती लागल्यानं ही आग लागली. या आगीमध्ये ऑइल आणि भांडी बनवण्याचे दोन कारखाने भस्मसात झाले आहेत. यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं असून महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या चार बंबांनी सुमारे दीड तास प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. तर एक कारखानदार जखमी झाला असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात औषध उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.

****

येत्या डिसेंबर मध्ये तीन राज्याच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागू नये म्हणून भारतीय जनता पक्ष एकत्रित निवडणुकीचा घाट घालत असल्याचा आरोप, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली. इव्हिएम - मतदान यंत्रांच्या उपयोगाबाबतही राज ठाकरे यांनी यावेळी शंका उपस्थितीत केली.    

****

औरंगाबाद इथं एकलव्य संघटनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी आज क्रांती चौकापासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर टीकोरा मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीमध्ये समावेश करू नये, वन जमीन आदिवासींच्या नावे करण्यात यावी, स्वाभिमान सबळीकरण योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासह विविध मागण्यांचं निवेदन आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प आधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

औरंगाबाद इथल्या बीड बायपासवर आज सकाळी देवळाई चौकात हायवा ट्रकनं मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

****

शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी-विक्री व्यवहार गेल्या तीन दिवसांपासून ठप्प आहेत. सदर शासन निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय भुसार संघटनेनं घेतला आहे. जिल्ह्यातल्या वसमत बाजार समितीत मात्र खरेदी सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली आहे.

जालना इथंही बाजार समितीमधल्या आडत व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार पाच दिवसांपासून बंद ठेवले आहेत. यामुळे शेतकरी, हमाल तसंच मापाड्यांचे हाल होत आहेत. शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत एक निवेदन दिलं असून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या समनापूर इथं जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवणाऱ्या पाच मांत्रिकांना काल मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून रंगेहाथ पकडलं. रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी गोरे वस्तीवर ही कारवाई केली. या मांत्रिकांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासोबत अन्य गुन्ह्यांचीही नोंद करण्यात आली आहे.

****

कर्जमाफी न मिळाल्यानं बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातल्या मुरंबा इथल्या एका शेतकऱ्यानं आज आत्महत्या केली. या शेतकऱ्यानं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पिंपळगाव शाखेतून पीक कर्ज घेतलं होतं. मात्र त्याची परतफेड करू न शकल्यानं त्यांनं आत्महत्या केली.

****

भारतानं इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात साउथम्पटन इथं दुसऱ्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला तेंव्हा दोन बाद १०० धावा केल्या आहेत. सलामीवीर शिखर धवन २३ आणि लोकेश राहुल १९ धावा काढून बाद झाले आहेत. स्टुअर्ट ब्रॉडनं त्यांना बाद केलं. इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांवर आटोपला आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंड संघ २-१ असा आघाडीवर आहे.

****

इंडोनेशिया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सेलिंगमध्ये भारताच्या वर्षा गौतम आणि श्वेता शेवगर यांनी रौप्य पदक जिकलं आहे. सेलींगमधील ओपन लेझर प्रकारात हर्षिता तोमर हिनं कांस्य पदक जिकलं आहे. वरून ठाकूर आणि गणपती चेनगप्पा यांनी पुरूष सेलिंगमध्ये कास्य पदक पटकवलं आहे. मुष्टीयुध्दात ४९ किलो गटात अमित फनगल अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा.

****



 चौथ्या बिमस्टेक परिषदेचा काठमांडू घोषणापत्राला मंजुरी देऊन आज समारोप करण्यात आला. बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या सर्व सदस्य देशांनी या काठमांडू घोषणापत्राला मंजुरी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्यानमारचे राष्ट्रपती विन मिंट यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करण्याबाबत चर्चा केली. बिमस्टेक संमेलनादरम्यान या दोन नेत्यांमध्ये ही बैठक झाली. विकास, उर्जा आणि व्दिपक्षीय सहकार्याच्या अन्य मुद्दांवर या भेटीदरम्यान चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

*****



 सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँका सुरू राहातील आणि नियमित कामकाज सुरू राहील, अशी माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. समाज माध्यमांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँका सहा दिवस बंद रहातील, अशी अफवा पसरली होती. त्या पार्श्र्वभूमीवर अर्थ मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. केवळ दोन सप्टेंबर- रविवार आणि शनिवार - आठ सप्टेंबर रोजी बँकांना सुटी राहील. ज्या राज्यांत तीन सप्टेंबर रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे, तिथंच केवळ बँका बंद राहतील, असंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.

****



 राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती केंद्र, हे सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातली एक लोकचळवळ बनलं आहे, असं पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते काल भुवनेश्वर इथं अनुसूचित जाती-जमाती मेळावा आणि प्रदर्शनात बोलत होते. अनुसूचित जाती-जमातींमधे उद्योजकांचा विकास घडवणारं हे महत्वाचं पाऊल ठरलं असून, उद्योजक आता शेकडो तरुणांना रोजगार पुरवू शकतात, असं प्रधान यावेळी म्हणाले.

****



 देशातले एक लाख ३५ हजार बंदर आणि गोदी कामगार आणि निवृत्तीवेतनधारकांना लाभदायक ठरणारा नवा वेतन करार नौवहन मंत्रालयानं केला आहे. काल मुंबईमध्ये  नौवहन मंत्रालय, बंदर अधिकारी आणि कामगार संघटना यांच्यात हा करार झाला. या नव्या करारामुळे कामगार आणि निवृत्ती वेतनधारकांना १० पूर्णांक सहा दशांश टक्के वेतनवाढ मिळेल. जानेवारी 2017 पासून येत्या पाच वर्षांसाठी या कराराचा लाभ मिळेल.

****



 राज्य सरकारनं राज्यातल्या ११५ तहसील मंडळांना कापूस उत्पादक क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. कापड उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. यामुळे कापूस लागवड, पीक वाढ, पुरवठा आणि प्रक्रिया याकडे लक्ष देणं सोपं होणार आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या १८ जिल्ह्यांमधले हे ११५ तालुके आहेत. ज्या तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी कापूस उत्पादन होतं, त्याठिकाणी सरकार एक वस्त्रोद्योग केंद्र उभारायला प्रोत्साहन देणार आहे.

****



 लातूर जिल्ह्यात देवणी तालुक्यातल्या कवठाळा गावचे तलाठी राजू कांबळे आणि कोतवाल सुभाष हणमते यांना आठ हजारांची लाच घेतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. तक्रारदाराकडून मयत वडीलांच्या नावावर असलेल्या शेतीचा वारसा हक्क आईच्या नावे फेर करून देण्यासाठी कांबळे यांनं ही लाच मागितली होती.

****



 नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मागे घेण्यात येईल असं नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी आज स्पष्ट केलं. मुंढे यांच्यावर सत्तारूढ भारतीय जनता पक्षानं अविश्वास ठराव दाखल केला असून शनिवारी विशेष महासभा होणार आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून आता हा ठराव मागे घेण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, नाशिक मधील विविध नागरी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी आज सकाळी मुंढे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला.

****



 इंडोनेशियात जकार्ता इथं सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम सामना आज जपान विरूध्द होणार आहे. वीस वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. कांस्य पदकासाठी भारतीय पुरूष हॉकी संघाचा  सामना उद्या शनिवारी पाकिस्तान विरूध्द होणार आहे. स्कवॉश मध्ये महिला आणि पुरूष संघ उपांत्य फेरीचे सामने खेळणार आहेत. टेबल टेनिस मध्ये मनिका बत्रा, अचंत शरत कमल आणि जी साथियान उप उपांत्य पूर्व फेरीत लढत देतील. तर जुडो, ब्रिज, साईक्लिंग आणि सेलिंगच्या सामन्यातही भारतीय संघ खेळणार आहे. पदक तालिकेत भारत १३ सुवर्ण, २१ रौप्य आणि २५ कांस्य पदकासह ५९ पदक घेवून आठव्या क्रमांकावर आहे.

*****

*** 

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.08.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये चौथ्या बिम्सटेक शिखर परिषदेचं आयोजन केलं जात आहे. बांग्लादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या सात सदस्य देशांचे नेते यावेळी घोषणापत्र जाहीर करणार आहेत. पंतप्रधान थायलंड, म्यानमार आणि भूतान या देशांच्या नेत्यांशी यावेळी संवाद साधणार आहेत.

****



 वेतनप्राप्त करणारे तसंच व्यापारी आणि अन्य व्यवसायांशी जोडले गेलेल्यांसाठी प्राप्तीकर परतावा दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे. दरम्यान, प्राप्तीकर भरणाऱ्यांची संख्या यावर्षी आतापर्यंत पाच कोटी झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या ६० टक्क्यांनी अधिक आहे. सरकारी वित्त संस्थेसाठी प्राप्ती कर भरणाऱ्यांची संख्या वाढणं हे चांगले संकेत असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

****



 ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना मराठी साहित्यातील भरीव योगदानाबद्दल रानगंध साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडे इथं नामवंत साहित्यिक श्याम मनोहर यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. मंगला घुणावत आणि रामलालजी घुणावत यांनी आपल्या उद्योगाच्या वतीनं कविवर्य ना.धो महानोर यांच्या सन्मानार्थ रानगंध पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

एक लाख रूपये मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****



 नांदेडच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागानं नांदेड ते दिल्ली हजरत निझामुद्दीन या आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या रेल्वेगाडीच्या आणखी ५२ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या जानेवारी पर्यंत ही गाडी सुरू राहील. नांदेड रेल्वे स्थानकातून ही गाडी दर गुरुवारी सुटेल. पूर्णा,  हिंगोली,  अकोला,  खांडवा, भोपाळ, आग्रा, मार्गे ती निझामुद्दीन-नवी दिल्लीला दुसऱ्या दिवशी पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी दर शनिवारी दिल्लीहून सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वे विभागानं कळवलं आहे.

//*****//

AIR News Bulletin, Aurangabad. Date : 31.08.2018, Time :8.40- 8. 45 AM

AIR News Bulletin, Aurangabad. Date : 31.08.2018, Time :8.40- 8. 45 AM

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...