Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१
सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’चा आज पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
Ø केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातल्या काँग्रेस पक्षाच्या
संघर्ष यात्रेला कोल्हापुरमधून सुरूवात
Ø अटक करण्यात
आलेल्या कार्यकर्त्यांचे माओवादी संघटनांशी
संबंध असल्याबाबत सबळ पुरावे असल्याचा
मुंबई पोलिसांचा दावा
Ø
१०
महामंडळं, सहा मंडळं, दोन प्राधिकरणं आणि एका
आयोगावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची राज्य शासनाची घोषणा
आणि
Ø
आशियाई
क्रीडा स्पर्धेत भारताला दोन रजत आणि चार कांस्य पदक तर
इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला पहिल्या डावात २७ धावांची
आघाडी
****
केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधातल्या काँग्रेस
पक्षाच्या संघर्ष यात्रेला काल कोल्हापुरमधून प्रारंभ झाला. त्यापूर्वी शहरातनू रॅली
काढण्यात आली. कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष
अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण
विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत
मशाला प्रज्वलित करून या यात्रेला प्रारंभ करण्यात आला.
त्यानंतर झालेल्या सभेत सर्व नेत्यांनी केंद्र आणि
राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आणि
लिंगायत समाजाच्या आरक्षणाला यावेळी पाठिंबा देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या
यात्रेच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राज्यात विविध ठिकाणी रॅली काढून निदर्शनं
करणार आहेत. यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आठ सप्टेंबरला पुण्यामध्ये होणार
आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या कार्यकर्त्यांचे माओवादी
संघटनांशी संबंध असल्याबाबत सबळ पुरावे हाती लागल्याचं काल पोलिसांनी मुंबईत वार्ताहर
परिषदेत सांगितलं. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कायदा आणि
सुव्यवस्था परमबीर सिंग यांनी अटकेत असलेल्या काही कार्यकर्त्यांदरम्यानच्या
पत्रव्यवहारामधली काही पत्रं पत्रकार परिषदेत दाखवली. यापैकी
एका पत्रात राजीव गांधी हत्येसारखी घटना घडवून आणण्याच्या कटाचा उल्लेख असल्याचं
सिंग यांनी यावेळी सांगितलं. पोलिसांनी भूमिगत आणि इतर माओवाद्या दरम्यानची हजारो
पत्र जप्त केली आहेत. या पत्रांमध्ये शस्त्र खरेदीसाठी लागणाऱ्या पैशांच्या
मागणीचाही उल्लेख असल्याचं सिंग म्हणाले.
****
राज्य शासनानं काल १० महामंडळं, सहा मंडळं, दोन प्राधिकरणं आणि एका आयोगावर पदाधिकाऱ्यांच्या
नियुक्त्यांची घोषणा केली. यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर
नरेंद्र पाटील, यांची तर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण - म्हाडाच्या
अध्यक्षपदी आमदार उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी श्रीमती ज्योती
ठाकरे, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ अध्यक्षपदी संदिप जोशी, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ - सिडकोच्या अध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर तर महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ
अध्यक्षपदी राजा उर्फ सुधाकर सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून शेख नासेर
शेख चांद याचा खून केल्याप्रकरणी इम्रान मेहंदी आणि त्याचा साथीदार सय्यद जहीर उर्फ
शेरा या दोघांना औरंगाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल जन्मठेप आणि पाच हजार
रूपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणातले पाच आरोपींना न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं
आहे. इम्रानला यापूर्वी माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्या प्रकरणातही जन्मठेपेची शिक्षा
सुनावण्यात आली आहे. कुरेशी खून खटल्याचा तपास करत असतानाचं शेख नासेर यांच्या खूनाच्या
घटनेचा उलगडा झाला होता.
****
औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं मराठा,
मुस्लिम, धनगर आणि कोळी समाजाच्या आरक्षणासाठी सुरू केलेलं आमरण उपोषण विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सोडवण्यात आलं. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळताच मराठा
आरक्षणाची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महिन्याच्या आत विधान मंडळाचे अधिवेशन
बोलावण्यात येईल, असे लेखी आश्वासनांचं मुख्यमंत्र्यांचं पत्र, प्रधान सचिव भूषण गगराणी
यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागं घेण्यात आलं.
काँग्रेसनं गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात
केली होती. उपोषणकर्ते आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह
कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना काल वैद्यकीय उपचार देण्यात आले होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जलसंधारणाची काम शंभर टक्के पूर्ण
करणाऱ्या गावांनाच पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतंर्गत निधी प्रदान करण्यात येणार आहे,
त्यामुळे गावातल्या सरपंच, उपसरपंच, तसंच ग्रामसेवकांनी आपल्या गावातल्या कामांचा आराखडा
येत्या आठ दिवसात सादर करावा असं आवाहन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर
यांनी केलं आहे. जलसंधारण कामं -अंमलबजावणी संदर्भात आयोजित कार्यशाळेच्या निमित्ताने जळकोट, अहमदपूर आणि चाकूर इथं ते काल बोलत होते.
****
इंडोनेशिया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत
काल भारताला दोन रजत आणि चार कांस्य पदक मिळाली. सुवर्ण पदकाची अपेक्षा निर्माण केलेल्या
भारतीय महिला हॉकी संघाचा काल अंतिम फेरीत जपानकडून दोन विरूद्ध एक गोलनं पराभव झाला.
यामुळे भारतीय संघाला रजत पदकावर समाधान मानावं लागलं. नौकानयनमध्ये भारताच्या वर्षा
गौतम आणि श्वेता शेरवेगार यांनी रजत पदक जिकलं. नौकानयनमध्येच खुल्या लेझर प्रकारात
हृर्षिता तोमर हिनं कांस्य पदक जिकलं आहे. वरूण ठक्कर आणि गणपती चेनगप्पा यांनी पुरूषांच्या
नौकानयनमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. मुष्टियुद्धात विकास कृष्णनला दुखापतीमुळे उपांत्य
फेरीतून माघार घ्यावी लागल्यानं त्यालाही कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं. मात्र
४९ किलो गटात अमित पंगल अंतिम फेरीत दाखल झाला आहे.
स्क्वॅशमध्ये सौरव घोसाल, हरींदर पालसिंग संधू, रमित
टंडन आणि महेश मानगावकर यांच्या संघांनही कांस्यपदक पटकावलं. स्क्वॅशमध्येच भारताच्या
महिला संघानं मलेशियाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
****
चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसअखेर
इंग्लंडनं दुसऱ्या डावात बिनबाद सहा धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव
२७३ धावांवर संपुष्टात आला. भारताला पहिल्या डावात २७ धावांची आघाडी मिळाली आहे. भारताच्या
चेतेश्वर पुजारानं १३२ धावा केल्या आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. इंग्लंडच्या मोईन
अलीनं पाच गडी बाद केले.
****
येत्या डिसेंबर मध्ये तीन राज्यांच्या निवडणुकीत
पराभवाचा सामना करावा लागू नये म्हणून भारतीय जनता पक्ष एकत्रित निवडणुकीचा घाट घालत
असल्याचा आरोप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते
बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर
त्यांनी टीका केली. इव्हिएम - मतदान यंत्रांच्या उपयोगाबाबतही राज ठाकरे यांनी यावेळी
शंका उपस्थितीत केली.
****
केंद्र सरकारनं सुरु केलेल्या दीनदयाल
कौशल विकास योजनेअंतर्गत जळगाव इथल्या दीपक जावळे या तरुणानं संगणकाचा ॲनिमेशन ॲण्ड
मल्टिमेडिया हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. बिकट आर्थिक परिस्थितीत
या योजनेचा झालेला फायदा सांगतांना दीपक जावळे
म्हणाले -
मी दीनदयाल उपाध्याय योजना राष्ट्रीय उपयोगी अभियान याअंतर्गत ॲपेक्स कम्पूटर
जळगाव या ठिकाणी ॲनिमेयशन ॲण्ड मल्टिमेडिया हा सहा महिन्यापर्यंत कालावधीचा अभ्यासक्रम
शिकलो. आणि या अभ्यासक्रमाअंर्तगत मला बेसिक कम्पूटर, ग्रॉफिक डिझांइनीग, प्रिटिंग
मिडिया. 2डी अॅनिमेशन आणि 3डी अॅनिमेशन या सारख्या आधुनिक विषयावर मी
याठिकाणी स्थडीकेला. आणि या योजनेचं महत्त्व सांगायचं म्हटंल म्हणजे बाहेर ॲनिमेयशनया
सारख्या याच अभ्यासक्रमाची फी जवळपास 1लाख ते दिडलाख रूपये आहे. आणि ही योजना माननीय
पंतप्रधान यांनी सूरू केल्यामुळे आमच्या सारख्या तरूणांना एक वेगळ्या प्रकारचा आणि
आधूनिक तऱ्येचा प्लाटर्फाम त्यांनी उपलब्ध करूण दिला. आमची जी परिस्थिती आहे. ही परिस्थिती
अत्यंत हालाखीची असून माझे वडील एम.आय.डी.सी. मध्ये चटाईच्या कंपनी मध्ये जाऊन आमच्या
कुटूंबाचं पालनपोषण करतात. या योजनाअंतर्गत हा अभ्यासक्रम मी मोफत शिकल्यामुळे याच
प्रशिक्षण केंद्रामार्फत मला हा अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर एक रोजगाराची संधी उपलब्ध
करूण दिली गेली. त्याबद्दल मी नरेंद्र मोदीजीनचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.
****
एकलव्य संघटनेच्यावतीनं विविध मागण्यांसाठी काल औरंगाबाद
शहरातल्या क्रांती चौकापासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापर्यंत टिकोरा
मोर्चा काढण्यात आला होता. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये, वन जमीन
आदिवासींच्या नावे करण्यात यावी, स्वाभिमान सबळीकरण योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासह
विविध मागण्यांचं निवेदन आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प आधिकाऱ्यांना यावेळी देण्यात
आलं.
****
औरंगाबाद इथल्या बीड बायपासवर काल देवळाई चौकात हायवा
ट्रकनं मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू
झाला आहे तर झाल्टा फाट्यावर एका माल मोटारीनं दिलेल्या धडकेत दुचाकीवरील गर्भवती महिला
ठार झाली.
*****
***
No comments:
Post a Comment