Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27
September 2018
Time 1.00
to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ सप्टेंबर
२०१८ दुपारी १.०० वा.
****
भारतीय दंड विधानातलं व्याभिचार
हा गुन्हा ठरवणारं कलम ४९७ रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश
दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या पीठानं हा निर्णय दिला.
याचिकाकर्त्यानं हा कायदा घटनाबाह्य असल्याची मागणी केली होती. पती हा पत्नीचा मालक
नसून, समाजात महिलांचं स्थान सर्वात वर आहे. महिला आणि पुरुषांना समाजात समान अधिकार
आहे. व्यभिचार हे घटस्फोटाचं कारण ठरू शकतं, परंतु तो फौजदारी गुन्हा नाही, असा निर्वाळा
न्यायालयानं दिला आहे.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - ईव्हीएम आणि मतदानाची पावती
देणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्राचा पुरवठा सुरळीत असून, चिंतेची बाब नसल्याचं
निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. आगामी लोकसभा तसंच राज्य विधानसभांच्या
निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर शंभर
टक्के व्हीव्हीपॅट यंत्रं बसवण्यासाठी
आपण कटिबद्ध असल्याचं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं
आहे. यासाठी बंगळुरुच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि हैदराबादच्या
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला १७ लाख
४५ हजार व्हीव्हीपॅटची ऑर्डर दिली आहे. आता पर्यंत नऊ लाख
४५ हजार व्हीव्हीपॅट यंत्रं तयार असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.
****
वातावरण बदला संदर्भात कोणत्याही अभियानात भारत महत्वाची
भुमिका बजावेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. न्यूयॉर्क
इथं काल हवामान बदलावर संयुक्त राष्ट्र महासभेच्या उच्चस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या.
भारतात पृथ्वीला आईचा दर्जा दिला जात असल्यानं, हवामान बदल नियंत्रित करणं हे भारतीय
जीवनमूल्यांचा भाग असल्याचं त्या म्हणाल्या.
****
अमेरिका सरकारनं एच फोर विसा बाबतच्या निर्णयाची
अंमलबजावणी करू नये, अशी मागणी अमेरिकेतल्या दोन महिला सिनेटर्सनी केली आहे. एच फोर
विसाधारकांना देण्यात आलेला रोजगार परवाना मागे घेत असल्याचं, अमेरिका सरकारतर्फे गेल्या
आठवड्यात सांगण्यात आलं होतं. येत्या तीन महिन्यात यासंदर्भातला वटहुकूम जारी होणार
असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं होतं. या निर्णयाचा प्रतिकूल परिणाम होणाऱ्या विसाधारकांमध्ये
९४ टक्के महिला आहेत, त्यापैकी ९३ टक्के महिला भारतीय वंशाच्या आहेत.
****
जम्मू काश्मीर मधल्या अनंतनाग जिल्ह्यातल्या काजीगुंड
क्षेत्रात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत एका जवामाना
वीरमरण आलं. या चकमकीत एक अज्ञात दहशतवादीही मारला गेला. दुसरीकडे बडगाम जिल्ह्याच्या
पंजन क्षेत्रातही आज सकाळपासून चकमक सुरु आहे.
****
आशियाई योग महासंघानं आयोजित केलेली आठवी आशियाई योग क्रीडा
अजिंक्यपद स्पर्धा आज केरळमधल्या थिरुवनंतपुरम इथं सुरु होत आहे. चार
दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत,
भारतीय योगपटूंसह मलेशिया, संयुक्त
अरब अमिरात, इराण, अफगाणिस्तान, बांग्लादेश, व्हिएतनाम, चीन, सिंगापूर, दक्षिण
कोरिया, श्रीलंका, हाँगकाँग, नेपाळ, आदी देशांचे
सुमारे ४०० स्पर्धक, आपलं योग कौशल्य दाखवतील.
****
दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मद्य तस्करीसाठी
खासगी आरामगाड्यांचा वापर होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. यवतमाळ पोलिसांनी काल
रात्री पांढरकवडा मार्गावर छापा मारुन एक आरामबस, एक दुचाकी आणि सुमारे एक लाख रुपयांच्या
देशी तसंच विदेशी मद्याच्या साठ्यासह दोन तस्करांना अटक केली. संबंधित आरामबसमधून एका
कारमध्ये मद्याच्या पेट्या उतरवल्या जात असताना पोलिसांनी हा छापा मारला, त्यावेळी
काही तस्कर कारमधून पसार झाले, मात्र दुचाकीवरून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या
दोघांना पोलिसांनी अटक केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाणा जिल्हयातल्या मलकापूर आणि नांदुरा तालुक्यांमध्ये हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूत गिरणीतल्या गैरव्यवहाराबाबत
शेअर धारकासह ‘आप’ संघटनेचे जिल्हा संयोजक डॉ. नितीन नांदुरकर यांनी उच्च न्यायालयाच्या
नागपूर खंडपीठात जनहितयाचिका दाखल केली आहे. ही सुतगिरणी गेल्या काही वर्षापासून वादाच्या
भोवऱ्यात सापडली आहे. कामगारांचं थकीत वेतन, महामार्गामध्ये संपादित जमिनीचा मोबदला
प्रकरण, माजी संचालकांकडून झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, निवडणुकीदरम्यान झालेली न्यायालयीन
लढाई अशी अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत.
****
स्वच्छ भारत अभियानात सातारा जिल्हा देशात उत्कृष्ट ठरला
आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी, येत्या दोन ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्हा परिषदेचा गौरव होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
रविवारी ३० सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ४८वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
*****
***
No comments:
Post a Comment