Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§
मुस्लिम महिला विवाह संरक्षण अध्यादेश कालपासून लागू
§
मराठवाडा
आणि विदर्भाच्या समतोल विकासासाठी पंधराव्या वित्त आयोगाकडे २५
हजार कोटी रुपयांची मागणी
§
डीजे
आणि तत्सम उपकरणांवरची बंदी योग्यच असल्याचा राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा
आणि
§ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर आठ गडी
राखून दणदणीत विजय
****
मुस्लिम महिला विवाह संरक्षण अध्यादेश कालपासून लागू
झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. या अध्यादेशानुसार,
एकावेळी तोंडी तिहेरी तलाक देणाऱ्या मुस्लिम पुरुषाला तीन वर्ष कारावासाची तरतूद आहे.
संसदेच्या गेल्या दोन अधिवेशनांपासून हे विधेयक राज्यसभेत
मंजूर होऊ शकलं नव्हतं. या मुद्यावर आपण काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन विधेयक मंजूर करुन
घेण्याचा प्रयत्न केला, मात्र विधेयक संमत होऊ शकलं नाही. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळानं,
कालच्या बैठकीत या अध्यादेशाला मंजुरी दिली, असं कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी
सांगितलं.
देशभरातल्या अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या
मानधनात केंद्र सरकारनं केलेल्या वाढीला या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावानं प्रशासकीय
मान्यता देण्यात आली. सुमारे २७ लाख अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सहायिकांना याचा
लाभ होणार आहे.
देशातल्या १९८ धरणांची सुरक्षा आणि कार्यान्वयन वाढवण्यासाठी
तीन हजार ४६६ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजित खर्चालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल
मंजुरी दिली. इंदूर - बुधनी या नवीन रेल्वेमार्गालाही कालच्या बैठकीत मान्यता देण्यात
आली. या पूर्णपणे विजेवर चालणाऱ्या मार्गामुळे मुंबई ते इंदूर हे अंतर कापण्यासाठीचा
वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे.
****
देशाच्या अर्थव्यवस्थेचं ट्रिलियन डॉलर्सचं उद्दीष्ट
पाहता, महाराष्ट्राचा आर्थिक प्रगतीचा वेग समाधानकारक असल्याचं, पंधराव्या
वित्त आयोगाचे अध्यक्ष एम.के.सिंग यांनी म्हटलं आहे. राज्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर
आलेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या पथकानं काल वार्ताहरांशी संवाद साधला. तत्पूर्वी आयोगानं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांची भेट घेतली. राज्याच्या गरजा आणि विकास क्षेत्रं याबाबत
मुख्यमंत्र्यांनी आयोगासमोर
तर्काधारित सादरीकरण केलं. विदर्भ आणि मराठवाड्याच्या समतोल सामाजिक-आर्थिक विकासासाठी
२५ हजार कोटी रुपयांच्या विशेष सहाय्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी आयोगाकडे केली आहे.
इतरही विविध योजनांसाठी सुमारे पाच
हजार शंभर कोटी रुपये अर्थसहाय्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी आयोगासमोर मांडला आहे.
****
लिंगायत समाजाला आरक्षणासह सर्व
मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लिंगायत समाज आरक्षण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्र्यांची
भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यामध्ये महात्मा बसवेश्वर
यांचं स्मारक होण्यासाठी त्वरित पावलं उचलली जातील तसंच, आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाच्या
शिफारशीनुसार केंद्राला अहवाल पाठवण्यात येईल, असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात येत्या पंचवीस तारखेपासून पंडित दीनदयाळ
उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना लागू होणार आहे. या योजनेद्वारे, राज्यातल्या
नागरी, ग्रामीण बिगर शेती, महिला आणि पगारदार सहकारी पतसंस्था तसंच मल्टीस्टेट पतसंस्थांमधल्या
एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण मिळणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी
काल मुंबईत ही माहिती दिली.
****
भाजप सरकारनं गेल्या चार वर्षात राज्यात
जल संधारण प्रक्रियेसाठी ६४ हजार कोटी रुपये खर्च केले, मात्र राज्याच्या
सिंचन क्षमतेत काहीही वाढ झाली नसल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. या निधीच्या खर्चामध्ये
काही अनियमितता असल्यास त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.
****
डीजे आणि तत्सम उपकरणांमुळे होणारा
आवाज हा, ध्वनी प्रदूषण कायद्यात सांगितलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यानं या उपकरणांवरची
बंदी योग्यच असल्याचा दावा, राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात केला. पंचाहत्तर
डेसिबल्स, ही या कायद्यानं ठरवून दिलेली आवाजाची मर्यादा असून या उपकरणांचा आवाज शंभर
डेसिबल्सहून जास्त असतो, असं सरकारनं, काल या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान
स्पष्ट केलं. न्यायालयानं या याचिकेबाबतचा निर्णय काल राखून ठेवला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानवर
आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानचा
संघ १६२ धावात सर्वबाद झाला, केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमाररनं प्रत्येकी तीन बळी
घेतले. १६३ धावांचं हे आव्हान भारतानं, २९ व्या षटकातच पूर्ण केलं. सात षटकांत पंधरा
धावा देऊन तीन बळी टिपणारा भुवनेश्वर कुमार सामनावीर ठरला. भारताचा पुढचा सामना उद्या
बांगलादेशसोबत होणार आहे.
****
श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेल्या
भारतीय महिला क्रिकेट संघानं पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला काल झालेला पहिला
सामना १३ धावांनी जिंकला. भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारीत २० षटकांत आठ बाद १६८
धावा केल्या. उत्तरादाखल श्रीलंकेचा संघ विसाव्या षटकांत १५५ धावांवर सर्वबाद झाला.
भारतातर्फे पूनम यादवनं सर्वाधिक चार तर राधा यादव आणि हरमनप्रीत कौरनं प्रत्येकी दोन
बळी घेतले. मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे.
****
भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार
काल अंबाजोगाई इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष
तथा ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते यांना ज्येष्ठ
साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. स्मृतिचिन्ह,
सन्मान पत्र आणि २५ हजार रुपये, असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. अंबाजोगाई इथल्या यशवंतराव
चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार शिवाजीराव नागवडे
यांचं काल मुंबईत निधन झालं. ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा
तालुक्यातल्या वांगदरी या त्यांच्या मूळ गावी आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत.
****
पेट्रोल दरवाढीच्या
निषेधार्थ काल हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. जिल्हा प्रमुख
संतोष बांगर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला, यावेळी
सरकारच्या धोरणांवर
टीका करण्यात आली.
****
हिंगोली जिल्हा ग्रंथालय
संघाच्या वतीनं ग्रंथालय संदर्भातल्या विविध मागण्यांसाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
धरणे आंदोलन करण्यात आलं. ग्रंथालयांचं अनुदान दुप्पट करणं, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना
वेतनश्रेणी लागू करणं, नवीन ग्रंथालयांना मान्यता देणं, यासह विविध मागण्यांसाठी हे
आंदोलन करण्यात आलं.
****
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय-
घाटीचा बाह्यरुग्ण विभाग आज मोहरमनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे बंद राहणार असल्याचं
या महविद्यालयाच्या अधीक्षकांनी कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात माहिती अधिकारातंर्गत दाखल झालेल्या
सुमारे ४०० प्रकरणांची, माहिती आयोगानं काल आणि परवा हिंगोलीत जाऊन सुनावणी घेतली.
यामध्ये पहिल्या दिवशी २०२ तर दुसऱ्या दिवशी १५० प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाल्याची
माहिती, आयोगाचे आयुक्त दिलीप धारुरकर यांनी दिली.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या
हिंदु कोड बिलाचं प्रारूप हे शाहू महाराजांच्या स्त्री हिंसेला प्रतिबंध करणाऱ्या कायद्यामध्ये
आढळत असल्याचं मत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भारतीय संस्कृती
विभागाचे प्राध्यापक उमेश बगाडे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं विद्यापीठातल्या
ताराबाई स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीनं आयोजित मुक्ता साळवे व्याख्यानमालेत ‘स्त्री
हिंसेला प्रतिबंध करणारा शाहू महाराजांचा कायदा’ या विषयावर बोलत होते.
स्त्री हिंसेला कुटुंब, धर्म आणि जात उतरंड कारणीभूत
असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूर
जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं शेतीच्या कामात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर
करण्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी येत्या २४ आणि २५ सप्टेंबर रोजी कार्यशाळेचं आयोजन करण्यात
आलं आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काल लातूर इथं वार्ताहर
परिषदेत ही माहिती दिली.
*****
***
No comments:
Post a Comment