Friday, 21 September 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 21.09.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****

** अल्पबचत योजनाच्या व्याज दरावाढ करण्याची केंद्र सरकारची घोषणा

** राज्यात पाचशे ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रं उभारण्याचा महावितरणचा निर्णय

** आगामी निवडणुकांसाठी शेवटच्या क्षणांपर्यंत काँग्रेसशी युती करण्याचा प्रयत्न भारिप - बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर 

आणि

** विराट कोहली आणि मीराबाई चानू यांना राजीव गांधी क्रिडा रत्न पुरस्कार; कुस्तीसाठी दादू चौगुले यांना ध्यानचंद तर कोल्हापूरच्या नेमबाज राही सरनोबतसह २० खेळाडूना अर्जुन पुरस्कार घोषित

****

केंद्र सरकारनं वेगवेगळ्या अल्पबचत योजनाच्या व्याज दरावाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी हे वाढीव दर असतील. अर्थ मंत्रालयानं ट्विटरवरुन ही माहिती दिली. अल्प बचत योजना, ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजना आणि पाच वर्षाच्या आवर्ती ठेवीवरच्या व्याजदरात शून्य पूर्णांक चार टक्के तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी - पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांचा व्याजदर आठ टक्के करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्याजदर सात पूर्णांक सहा टक्के होता. किसान विकास पत्रावर सात पूर्णांक सात टक्के व्याज देण्यात येईल. खास मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवर आठ पूर्णांक पाच टक्के व्याज देण्यात येईल, याआधी हा व्याजदर आठ पूर्णांक एक टक्के होता. एक ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर शून्य पूर्णांक तीन टक्के जास्त व्याज मिळणार आहे.

****

वीज महावितरण कंपनीच्यातीनं राज्यात पाचशे ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रं उभारली जाणार आहेत. हरित ऊर्जेच्या वापराला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावं, या उद्देशानं, हा निर्णय घेण्यात आल्याचं, कंपनीकडून सांगण्यात आलं. पहिल्या टप्प्यात अशी पन्नास केंद्रं उभारली जाणार असून, यामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये प्रत्येकी चार, ठाण्यात सहा, पुणे तसंच नागपूरमध्ये प्रत्येकी दहा आणि पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर बारा केंद्र उभारली जाणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

पुढच्या तीन वर्षांत केंद्रांची संख्या पाचशेपर्यंत वाढवली जाणार आहे. यासंदर्भातली ई- निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, साधारण आठवडाभरात कार्यादेश जारी होण्याची शक्यता या वृत्तात वर्तवण्यात आली आहे. अशाप्रकारचं एक केंद्र उभारण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या केंद्रावर एक वाहन सुमारे तासाभरात पूर्ण चार्ज होईल, त्यासाठी प्रति युनिट सहा रुपये दर आकारला जाणार आहे.

****

आगामी निवडणुकांसाठी शेवटच्या क्षणांपर्यंत काँग्रेसशी युती करण्याचा प्रयत्न कर, असं भारतीय रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करण्यास त्यांनी विरोध दर्शवला आहे. याआधी भारिपनं आगामी निवणुडकांसाठी एमआयएम या पक्षाशी युती केली आहे. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवी दिल्लीत संघाच्या कार्यक्रमात केलेलं भाषण हे जनतेची दिशाभूल करणारं असल्याची टीका आंबेडकर यांनी यावेळी  केली.

****

बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, त्यामुळे आज आणि उद्या विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य-महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. या काळात मराठवाड्यातल्या हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे. मात्र दक्षिण - मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण-मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी राहील. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचं नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या गोटेवाडी इथल्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळेला ‘स्वच्छ भारत विद्यालय’ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. या शाळेनं देशात १७ वा तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव अवचार यांनी शाळेत स्वच्छतेविषयी राबवण्यात आलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. ते म्हणाले…



मी साहेबराव अवचार मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा गोटेवाडी जिल्हा हिंगोली या ठिकाणी आम्ही गेल्यावर्षी भारत स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१८ करीता अर्ज केलेला होता.आणि त्यानुसार सर्वाधिक अगोदर विद्यार्थी क्षमतेनुसार टॉयलेट, बाथरूम आणि हँडवॉश स्टेशन यांची पूर्तता केली. बांधकाम केलं.आणि त्यानुसार सर्वात अगोदर विद्यार्थ्यांची जागृती केली.आणि स्वच्छतेचं महत्व आम्ही त्यांना पटवून दिलं.विद्यार्थी हा रोगमुक्त होण्यासाठी आम्ही वर्षभर हे अभियान राबवलं.आणि या अभियानातून देशातून १७ वा क्रमांक तर महाराष्ट्रातून क्रमांक एक आला.या करीता माननीय पंतप्रधान आणि माननीय संशोधन विकास मंत्री यांचे मी या ठिकाणी आभार मानतो.जयहिंद जय महाराष्ट्र.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

सरकारनं पत्रकार संरक्षण कायदा प्रलंबित ठेवला असून यात सरकारची भूमिका आणि निती बदलली असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते काल बोलत होते. सरकारला आज माध्यमांचा विसर पडला असून माध्यमांवर बंधनं घातली जात असल्याचं मत मुंडे यांनी व्यक्त केलं. सध्याची माध्यमांची अवस्था बिकट आहे अशी खंत ज्येष्ठ माध्यम तज्ञ समीरण वाळवेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

****

गणेशोत्सवाच्या काळात भाविक घरोघरी आणि मंडळांमध्ये श्रीगणेशाला भक्तीभावनं फुलांचे मोठ मोठे हार, दुर्वा, अर्पण करत आहेत. या निर्माल्याचं पावित्र टिकावं आणि शहरातल्या कचऱ्यातही वाढ होऊ नये म्हणून लातूर शहरातल्या पर्यावरण प्रेमी नागरिकांनी निर्माल्य ग्रुपची स्थापना केली आहे. या ग्रुपविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर..

या ग्रुपने शहरभर समाजमाध्यमातून निर्माल्य कचरा टाकू नये, अशी विनंती जनतेला केली.महापालिकेने या ग्रुपला सहकार्य केले असून दररोजचा कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीमध्ये निर्माल्य गोळा केलं जात आहे.सार्वजनिक महामंडळांना सुध्दा असे निर्माल्य एकत्र करून ठेवण्याची विनंती करून त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केली आहे.गोळा केलेल्या निर्माल्याचा सेंद्रीय खतासाठी वापर केला जात असल्याची माहिती पालिकेच्या उपायुक्त वसुधा फड यांनी आकाशवाणीला दिली. अरूण समुद्रे  आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर.

****

क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च असा राजीव गांधी क्रीडा रत्न पुरस्कार भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान विराट कोहली आणि भारोत्तोलन विश्वविजेती मीराबाई चानू यांना घोषित झाला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं काल क्रीडा पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली. आठ क्रीडा प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार तर २० खेळांडूना अर्जुन आणि चार जणांना ध्यानचंद पुरस्कार घोषित झाले आहेत. यात राज्यातले दादू चौगुले यांचा ध्यानचंद आणि महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबत सह हिमा दास, रोहन बोपन्ना, ॲथलीट नीरज चोप्रा यांचा अर्जुन पुरस्कार मिळालेल्या खेळांडूमध्ये समावेश आहे. येत्या मंगळवारी राष्ट्रपती भवनात एका विशेष समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.

****

चीनमधल्या चँगझू इथं सुरु असलेल्या चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू उपान्त्य पूर्व फेरीत पोहोचली आहे. पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि बी सुमित रेड्डी यांच्या जोडीला आणि मिश्र दुहेरीत एन सिक्की रेड्डी आणि प्रणव जेरी चोप्रा यांच्या जोडीला दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला.

****

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना चोवीस तर गटसचिवांना तेवीस टक्के  दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर बँकेच्या सभासदांनाही सहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. बँकेच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतची घोषणा करण्यात आली.

****

मोहरम सणानिमित्त आज औरंगाबाद इथं ‘यौम ए आशुरा’ साजरा केला जाणार आहे. आशुऱ्यानिमित्त ढोल-ताश्यांच्या गजरात शहरातून सवाऱ्यांचा मजमा आणि मातमी मिरवणूक काढली जाणार आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या दुर्लक्षित ऐतिहासिक दरवाजे आणि पर्यटन स्थळांच्या संवर्धनासाठी आज आणि उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सर्वप्रथम या ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेनं प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. शहरातल्या नागरिकांनी या ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन करण्यासाठीच्या मोहिमेत जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन महापालिका आयुक्त निपुण विनायक यांनी केलं आहे.

//***********//




No comments: