Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø मुंबई उच्च न्यायालयाकडून गणेशोत्सव तसंच विसर्जनाच्या
मिरवणुकीत डीजे डॉल्बीवरची बंदी कायम
Ø राज्यात गुटखा विक्री प्रकरणी तत्काळ अटक होणार - अन्न
औषध प्रशासन मंत्र्यांचा इशारा
Ø हिंगोली नजिक ट्रक आणि जीपच्या अपघातात सहा ठार - दोन
जखमी
आणि
Ø आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर ७ गडी
राखून विजय; चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात
****
मुंबई उच्च न्यायालयानं गणेशोत्सव तसंच
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे, डॉल्बीवरची बंदी कायम ठेवली आहे. ही बंदी येत्या
नवरात्रोत्सवासाठीही लागू रहाणार आहे. प्रोफेशनल ऑडीओ अँण्ड लाईटींग असोसिएशन 'पाला'
या संघटनेनं राज्यशासनाच्या डीजे बंदी विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. डीजे,
डॉल्बी यंत्रणांचा आवाज 50 ते 75 डेसिबलच्या मर्यादेबाहेर जाऊन 100 डेसिबलपर्यंत पोहोचतो
असं, राज्य सरकारनं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. सरकारचा युक्तीवाद मान्य करत
न्यायालयानं ही बंदी कायम ठेवली आहे.
****
राज्यात गुटखा बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार
असून गुटखा विक्री प्रकरणी तत्काळ अटक होणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री
गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.
गुटखा आणि पान मसाला विक्री प्रकरणी भारतीय दंड संहितेअंतर्गत,
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना प्रथम माहिती अहवाल - एफआयआर दाखल करण्यास प्रतिबंध नाही,
असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बापट बोलत होते. राज्याच्या
औषध प्रशासनातल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी गुटखा बंदीची अंमलबजावणी करतांना विक्रेत्याविरूद्ध
पोलिस ठाण्यात प्रथम माहिती अहवालाची नोंद करून गुन्हे दाखल केले होते. या कारवाईला
गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान
दिलं होतं. यासंदर्भात खंडपीठानं, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना असे गुन्हे दाखल करता
येणार नाही, असा निर्णय दिला होता. खंडपीठाच्या या निर्णयाला राज्य सरकारनं सर्वोच्च
न्यायालयात आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं, खंडपीठाचा निर्णय रद्दबातल ठरवत,
असे गुन्हे दाखल करण्यासं प्रतिबंध नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानुसार आता राज्यभरात
गुटखा बंदीची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.
****
केंद्र शासनाच्या ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य
योजने’ला उद्यापासून देशभरात प्रारंभ होत आहे. राज्यातल्या ८३ लाख ७२ हजार कुटुंबांना
या योजनेअंतर्गत मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाची महात्मा फुले जनआरोग्य
योजना या योजनेसोबतच एकत्रितपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ.
दीपक सावंत यांनी काल मुंबईत दिली. उद्या सकाळी ११ वाजता मुंबईत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत या योजनेचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या आदिवासी भागातल्या ग्रामपंचायत तसंच
नगर परिषदस्तरावरच्या अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजनेचा लाभ देणं शक्य व्हावं, याकरता
चार सदस्यीय आहार समित्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, आदिवासी
विकास मंत्री विष्णू सवरा यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. यामुळे अमृत आहार योजना
राज्यात अधिक गतीने आणि अधिक परिणामकारक पद्धतीनं राबवली जाईल, असा विश्वास मंत्री
सवरा यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राज्यात विविध विकासात्मक प्रकल्पांची कामं वेगानं
सुरू असून, उद्योग विस्तारासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचं जाळं विस्तारण्यात
राज्य अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं काल
ऑस्ट्रेलियन गुंतवणूक सल्लागार शिष्टमंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. राज्याचा आर्थिक
ताळेबंद मजबूत असल्यानं राज्यात होणारी परकीय गुंतवणूक सुरक्षित आहे असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिला.
****
सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत
२०१८-१९ या वर्षात अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकातल्या तब्बल एक लाख एक हजार ७१४ गरीब
नागरिकांना घरकुलं मंजूर करण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार
बडोले यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. घरकुलांसाठी प्रथमच एवढ्या
मोठ्या संख्येनं मंजुरी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदत करणाऱ्यांनी
आम्हाला धर्मनिरपेक्षता सांगू नये असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी
म्हटलं आहे. भारतीय रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी
केलेल्या विधानासंदर्भात पवार यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना, ही बाब स्पष्ट
केली. अकोल्यात दोन निवडणुकीमध्ये आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला
होता, असंही पवार यांनी आठवण करून दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या
‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४८वा
भाग असेल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
हिंगोली इथं ट्रक आणि जीपच्या अपघातात सहा जण ठार
तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांपैकी सर्व
सहा जण वाशिम जिल्ह्याच्या आडगांव इथले रहिवासी आहेत. या अपघातात दोन जण गंभीर जखमी
झाले असून, त्यांच्यावर हिंगोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
चीनमधल्या चँगझू इथं सुरु असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन
स्पर्धेतलं भारताचं पुरूष आणि महिला एकेरी अशा दोन्ही गटातलं आव्हान काल संपुष्टात
आलं. पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत के श्रीकांतला जपानच्या केन्टो मोमोटाकडून
२१ - नऊ, २१ - ११ असा पराभव पत्करावा लागला. तर महिला एकेरीत पी व्ही सिंधूला चीनच्या
चेन युफेईनं २१ - ११, ११ - २१, २१ - १५ असं पराभूत केलं.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं
काल बांगलादेशला ७ गडी राखून पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशचा संघ पन्नासाव्या
षटकात १७३ धावांत सर्वबाद झाला, भारतीय संघानं
कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद ८३ धावांच्या बळावर, ३७ व्या षटकात तीन गड्यांच्या
मोबदल्यात हे आव्हान पार केलं. चार बळी टिपणारा रवींद्र जडेजा सामनावीर ठरला.
काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा
तीन गडी राखून पराभव केला. या मालिकेत उद्या भारत आणि पाकिस्तान संघात लढत होणार आहे.
****
मांजरा परिवारानं साखर कारखाने उत्तमरित्या चालवून
शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन आणलं तसंच साखर उद्योगास आत्मविश्वास दिला, असं
कारखान्याचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर इथं बोलत होते. कारखान्याकडे
ठेवण्यात आलेल्या ठेवींवरचं दोन वर्षाचं व्याज संबंधीत शेतकरी सभासदांच्या खात्यावर
कारखाना जमा करत असल्याचं सांगून कर्मचाऱ्यांना येत्या दिवाळी सणा निमित्त बोनस म्हणून
दोन महिन्याचा पगार देत असल्याचंही देशमुख
यांनी जाहीर केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या २८० गावात एक गाव एक गणपती
ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी काल ही
माहिती दिली. जिल्ह्यातल्या १२०० गणेश मंडळाना यंदा प्रथमच गणेशोत्सवाचे ऑनलाईन परवाने
देण्यात आले आहेत. जिल्हाभरात पोलीस अधिकारी कर्मचारी आणि राज्य राखीव पोलिस तुकडी
असे एकूण १८०० पोलिस बंदोबस्तासाठी तैनात असल्याचं राजा यांनी सांगितलं.
****
लातूर येथील कचरा उचलण्यासाठी पंढरपूर नगर पालिकेने
अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर सुरु केला असून
तसाच प्रयोग लातूर महानगरपालिका करणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ
दिवेगावकर यांनी दिली. ते काल लातूर इथं वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. कचरा व्यवस्थापनात
औरंगाबाद सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून, कचरा उचलण्याची निविदा काढण्यासाठी
शासनाला नव्यानं प्रस्ताव पाठवल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथं चिकलठाणा औद्योगिक वसाहत- एमआयडीसी
मधल्या आनंद इंडस्ट्रीज या कुलर निर्मिती कंपनीला काल दुपारी आग लागून मोठं नुकसान
झालं. शुक्रवारची साप्ताहिक सुटी असल्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नाही.
****
वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथले हुतात्मा जवान सुनिल
धोपे यांच्या पार्थिव देहावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. १५ सप्टेंबरला
शिलाँग इथं कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. धोपे यांच्या कुटुंबियांनी
त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर घातपाताचा आरोप केल्यानंतर, शिलॉंग इथल्या सीमा सुरक्षा
दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर धोपे कुटुंबानं
सुनील यांचा पार्थिव देह स्वीकारला.
****
सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तहसील कार्यालयातला
लिपिक अरुण अहिरे याला काल ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
जमिनीच्या सातबारावर असणारी नोंद कमी करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
*****
***
No comments:
Post a Comment