Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
दुष्काळ
मुक्तीसाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथं आज राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीनं आयोजित
‘लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे दुष्काळमुक्ती निर्धार’ समारंभात ते बोलत होते. राज्य
शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे पाणीपातळी वाढली असून, राज्यातली १६ हजार गावं
जलपरिपूर्ण झाल्याचं त्यांनी नमूद केलं. किल्लारी भूकंपाच्या घटनेला आज २५ वर्षं पूर्ण
झाली. भूकंपग्रस्त भागातल्या नागरिकांची वाढीव घराची मागणी मान्य केल्याची घोषणाही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. भूकंपानंतर ज्या शेतकऱ्यांनी पुनर्वसनासाठी जमिनी दिल्या
होत्या, त्या त्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असंही ते म्हणाले.
किल्लारी भूकंपात सामूहिक शक्तीनं काम केल्यामुळे नागरिकांचं लवकर पुनर्वसन झालं, असं
खासदार शरद पवार यावेळी म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या पाणलोटाच्या कामांबाबत पुन्हा
एकदा जलतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असंही ते म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील
चाकूरकर, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन
खोतकर, खासदार रवी गायकवाड आणि सुनिल गायकवाड यावेळी उपस्थित होते.
****
राज्यातल्या
आदिवासी समाजाला डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत वनजमीन पट्टे देण्याचं काम पूर्ण करण्यात
येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या
शिर्डी इथं आज अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमातर्फे आयोजित अखिल भारतीय कार्यकर्ता
संमेलनात ते बोलत होते. आदिवासी क्षेत्रात विविध विकासकामांच्या माध्यमातून आदिवासी
समाजाला सक्षम बनवण्याचे प्रयत्न सुरू असून, आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत
प्रवेश मिळावा, यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
दुर्घटनेत
जखमी झालेल्यांना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवणाऱ्या नागरिकांना कायदेशीर संरक्षण देण्याच्या
कर्नाटक सरकारच्या विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. दुर्घटनेत
जीव वाचवणाऱ्यांनाही कायदेशीर संरक्षण देणारं कर्नाटक हे देशातलं पहिलं राज्य आहे.
****
२०१४
साली पाकिस्तानच्या पेशावरमधल्या शाळेवर झालेला दहशतवादी हल्ला भारताच्या मदतीनं झाल्याच्या
पाकिस्तानच्या आरोपाचं भारतानं खंडन केलं आहे. हा आरोप म्हणजे त्या हल्ल्यात मृत्युमुखी
पडलेल्या मुलांच्या स्मृतीचा अपमान आहे, असं संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या राजनैतिक
अधिकारी एनाम गंभीर यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे परराष्ट्र
मंत्री मेहमूद कुरेशी यांनी भारतावर केलेल्या आरोपांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
पाकिस्तानचे हे आरोप बिनबुडाचे आहेत आणि शेजारील राष्ट्रांमध्ये अस्थिरता पसरवण्याचा
हा प्रयत्न आहे, असं त्या म्हणाल्या.
****
कुपोषणमुक्तीसह
भावी पिढी सशक्त आणि सक्षम बनवण्यासाठी पोषण अभियान प्रभावी असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं आज पोषण अभियान महारॅली काढण्यात आली, त्यावेळी
ते बोलत होते. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी
यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
पूर्णा
ते अकोला या ब्रॉडगेज मार्गाचं लवकरच विद्युतीकरण होणार आहे. त्यासाठी २११ कोटी ५४
लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथं झालेल्या बैठकीत
ही माहिती देण्यात आली. काचीगुडा ते नारखेड या इंटरसिटी एक्सप्रेसला वाशिम जिल्ह्यातल्या
अमानवाडी इथं थांबा आणि पूर्णा-अकोला या पॅसेंजरचा विस्तार शेगांवपर्यंत करण्यालाही
या बैठकीत मंजुरी मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या बैठकीला खासदार अशोक
चव्हाण, राजीव सातव, संजय धोत्रे, बंडू जाधव, चंद्रकांत खैरे आणि दक्षिण मध्य रेल्वेचे
महाप्रबंधक विनोदकुमार यादव उपस्थित होते.
****
डॉ.श्यामाप्रसाद
मुखर्जी जन वन विकास योजना आणि हनी मिशन अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्या
मधल्या निसर्ग परिचय केंद्रात आयोजित कर्यक्रमात बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन
मधुमक्षिका पालन पेटीचं वाटप करण्यात आलं. वन्य जीवांसाठी आरक्षित असलेल्या अभयारण्या
लगतच्या गावातल्या लोकांना रोजगार मिळावा आणि अभयारण्यात मानवी हस्तक्षेप थांबावा,
म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
****
तुर्कस्तान
इथं सुरू असलेल्या धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मानं दोन पदकं
पटकावली. ज्योती सुरेखा वेन्नम हिच्याबरोबर मिश्र दुहेरी सामन्यात रौप्य, तर वैयक्तिक
स्पर्धेत त्यानं कांस्य पदक मिळवलं. वैयक्तिक सामन्यात अभिषेकनं दक्षिण कोरियाच्या
किम जोंग हो ला ३०-२७ अशा गुण फरकानं हरवलं.
****
No comments:
Post a Comment