Tuesday, 25 September 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 25.09.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

ग्रामीण भागातल्या मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना बारावीपर्यंत राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी बसचा मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही बससाठीही सवलत लागू करण्यात आली आहे, तसंच पत्रकारांनाही आता वातानुकुलीत शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय इतर विविध सवलतींची घोषणा रावते यांनी यावेळी केली. या विविध सवलतींचा राज्यातल्या सुमारे दोन कोटी १८ लाख नागरिकांना लाभ होणार आहे.

****

राज्यातला ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. साखर संघाच्या शिफारशी तसंच वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन - विस्मा आणि राज्य सहकारी बँकेच्या शिफारशींबाबत केंद्र सरकारचं धोरण आणि इतर संबंधित घटकांशी चर्चा करुन लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

केंद्र सरकारच्या ऊर्जा खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांच्या संयुक्त भागीदारातला उपक्रम, एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडनं आज महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना पाच इलेक्ट्रिकल वाहनं हस्तांतरित केली. या अनुषंगानं वाहन चार्जिंग करणारी दोन केंद्रं मंत्रालयात बसवण्यात आली आहेत. राज्य सरकारला टप्प्याटप्प्यानं एक हजार इलेक्ट्रीक वाहनं भाड्यानं देण्यात येणार आहेत.

****

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत, राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. राज्यात महासंघाच्या जागांचा योग्य वापर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असं पाटील यावेळी म्हणाले.

****

‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत लातूर शहरातल्या महाराणा प्रताप नगर इथून जिल्हास्तरीय स्वच्छता मोहिमेला आज प्रारंभ झाला. प्रत्येक गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करण्यासाठी स्वच्छता ही लोकचळवळ होणं गरजेचं असल्याचं, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर यावेळी म्हणाले. या अभियानाअंतर्गत गावा-गावातल्या शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, तसंच मंदीर परिसरात स्वच्‍छता करण्यात आली.

परभणी तालुक्यातल्या झरी ग्राम पंचायतीमध्येही स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाअंतर्गत महाश्रमदान दिन पाळण्यात आला. जिल्हा परिषदेतले पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी गावात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करुन विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.

****

राफेल विमान खरेदीत ४१ हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला असून, या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी आज नांदेड इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं.

****

देशातल्या किरकोळ व्यापारामध्ये विदेशी गुंतवणुकीच्या विरोधात आणि फ्लीपकार्ट-वॉलमार्ट अंतर्गत झालेल्या कराराच्या विरोधात व्यापाऱ्यांनी येत्या २८ तारखेला देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ आणि सर्व संलग्न संघटनांचा पाठींबा असल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या बंद दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या लालवाडी इथल्या एका शेतातून पोलिसांनी प्रतिबंधित जिलेटीन स्फोटकाच्या ४०७ कांड्या जप्त केल्या. या प्रकरणी जालना तालुक्यातल्या जामवाडी इथल्या दोन संशयितांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, जालना तालुक्यातल्या दगडवाडी इथल्या एका शेतात आज पहाटे पोलिसांनी छापा टाकून अवैध उत्खनन करून काढलेला गारगोटी दगडाचा मोठा साठा जप्त केला. आठ टन वजन असलेल्या या मौल्यवान दगडाचं बाजारमूल्य १६ लाख ४० हजार रुपये असून, या प्रकरणी एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

****

लोकमान्य टिळक टर्मिनस ते निझामाबाद या गाडीचा करीम नगर पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. येत्या ३० सप्टेंबरपासून ही गाडी करीम नगर इथून दुपारी तीन वाजता निघणार आहे. निझामाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस - निझामाबाद दरम्यान ही गाडी पूर्वीच्या वेळेनुसारच धावणार आहे.

****

No comments: