Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø प्रधानमंत्री जन आरोग्य -आयुष्मान भारत योजनेचा आज पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
Ø राफेल लढाऊ विमान खरेदी करारात भ्रष्टाचार झाल्याच्या
आरोपाचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पुनरूच्चार तर रिलायन्स
डिफेन्स कंपनीची निवड होण्यात, सहभाग नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण
Ø आज गणरायाला निरोप; राज्यभर पोलिसांचा कडक बंदोबस्त
आणि
Ø आशिया
चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत
****
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-आयुष्मान भारत या योजनेचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झारखंडमधल्या रांची इथं शुभारंभ होणार आहे.
या योजने अंतर्गत देशातल्या दहा कोटीहून अधिक कुटुंबांना प्रति वर्ष पाच लाख रुपयांचा
आरोग्य विमा दिला जाईल. आरोग्य सुविधांशी संबंधित आणि सरकारद्वारा चालवली जाणारी जगातली
ही सर्वात मोठी आरोग्य योजना असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. याचा ५० कोटीहून
अधिक लोकांना लाभ होईल. या योजनेत लाभार्थ्यांना उपचारासाठी रोख पैसे जमा करावे लागणार
नाहीत तसंच कोणतीही कागदपत्र द्यावी लागणार नाहीत. निशुःल्क आणि अडथळाहीन अशी ही योजना
आहे. या योजनेत वेगवेगळ्या आजारांचा आणि उपचारापूर्वीच्या तसंच उपचारानंतरच्या तपासण्यांचा
समावेश करण्यात आला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार देशातल्या गरीब कुटुंबांची यादी सरकारनं
तयार केली असून ते या योजनेचे लाभार्थी असणार आहेत.
मुंबईत राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या योजनेचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तसंच देशभरात
जिल्हास्तरांवरही या योजनेची सुरुवात होणार आहे.
****
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल
लढाऊ विमान खरेदी करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. ते काल नवी दिल्ली इथं
वार्ताहरांशी बोलत होते. राफेल करारासाठी रिलायन्स कंपनीला निवडण्यात फ्रान्सचा संबंध
नसल्याचं, फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं, त्या पार्श्वभूमीवर गांधी
यांनी, रिलायन्स कंपनीला यात भागीदार करण्यात सरकारचा
वैयक्तिक हेतू असल्याची टीका केली. या मुद्यावर पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावं, तसंच
राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी गांधी यांनी केली.
राफेल
लढाऊ विमान खरेदी हा देशाच्या इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा असून, पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी राजीनामे द्यावेत आणि संयुक्त संसदीय
समितीमार्फत या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे
अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. या प्रकरणी काँग्रेस, येत्या २७ सप्टेंबर
रोजी मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राफेल करारात
रिलायन्स डिफेन्स कंपनीची निवड होण्यात, आपला काहीही सहभाग नसल्याचा पुनरुच्चार, केंद्र
सरकारनं काल केला. या संदर्भात फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या विधानाचा सोईस्कर
अर्थ काढून विनाकारण वाद निर्माण केला जात असल्याचं, संरक्षण विभागानं जारी केलेल्या
पत्रकात म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद
यांनी काल नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेत बोलताना, काँग्रेसच्या या आरोपांचं खंडन
करत, हा करार २०१२ मध्येच झाला होता असं सांगितलं.
****
केवळ पुस्तकी शिक्षण न देता यशस्वी
माणसं घडवणाऱ्यावर रयत शिक्षण संस्थेचा भर राहणार असल्याचं, संस्थेचे अध्यक्ष खासदार
शरद पवार यांनी म्हटलं आहे. सातारा इथं काल या संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर
भाऊराव पाटील यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रयत शिक्षण
संस्था ही लवकरच १०० वर्ष पूर्ण करणार असून, त्यानिमित्तानं अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम
संस्थेत राबवले जातील, असं पवार यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या ३० सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४८वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या
सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर,
माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲपवर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं
आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
आज अनंत चतुर्दशी. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची आज
सांगता होणार आहे. घरोघरी स्थापन गणपतींसह सार्वजनिक गणपतींचं आज विसर्जन होणार आहे.
यानिमित्त आज राज्यभर कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईसह सर्वच मोठ्या शहरातल्या
विसर्जन मिरवणुकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
औरंगाबाद शहरातही पोलिसांनी चोख ठेवला आहे. सीसीटीव्ही
कॅमेरांद्वारे विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवलं जाणार असून, शहरातल्या मानाच्या संस्थान
गणपतीची मिरवणूक राजा बाजार इथून निघेल, सिडको-हडको, चिकलठाणा, मुकुंदवाडी, नवीन औरंगाबाद,
वाळूज औद्योगिक वसाहत, दौलताबाद आणि हर्सुल आदी ठिकाणांहून मिरवणुका निघणार आहेत. छावणी
परिसरातल्या गणपतींचं परवा सोमवारी विसर्जन होणार आहे.
दरम्यान, नांदेड शहरातल्या आठवडी बाजारातून मिरवणूक
निघणार असल्यानं, आज आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
हा आठवडी बाजार उद्या भरवण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातली बाऊची इथली
मुलींची शासकीय निवासी शाळा आणि निलंगा तालुक्यात जऊ इथल्या शासकीय निवासी विद्यालयाला
केंद्र शासनाचा ‘राष्ट्रीय स्वच्छ शाळा पुरस्कार’, नुकताच प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी
बाऊची इथल्या शाळेनं घेतलेल्या विविध उपक्रमांबाबात माहिती देत आहेत शाळेचे मुख्याध्यापक
जयपालसिंह जमादार -
या पुरस्कारासाठी
आम्ही गेली दोन वर्ष विद्यार्थावर स्वच्छतेचे संस्कार केले. त्यामुळे विद्यार्थांचे
आरोग्य सुधारले. आणि शाळा सोडवण्याचे विद्यार्थांचे प्रमाण कमी झाले. शाळेमध्ये एक
विद्यार्थी एक वृक्ष अभियान राबवून आम्ही विद्यार्थांवर पर्यावरणाचा संस्कार केला.
तसेच, लावलेल्या झाडांना शाळेतील ओला व सुखा कचरा वेगळा करूण त्यांचे कंपोस्ट खत तयार
करून घातले. त्यामुळे मुलासोबतचं झाडांचीही वाढ होत आहे.
जऊ इथल्या शासकीय निवासी विद्यालयानं या साठी राबवलेल्या
विविध उपक्रमांबाबत शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय
मुखम यांनी माहिती दिली, ते म्हणाले -
हमारे विद्यालय को पुरस्कार मिलनेका कारण हे. कचरेसे दोस्ती. हमारे विद्यालयसे
निकलने वाले कचरेको हमनें तिन विभागोमें बाटा. गिला, सुका और सेनिट्ररी प्याड. गिले
और सुके कचरेसे हमारे विद्यालय में कंपोस्ट
खात प्रकल्प चलाई जाती हे. खानेसे पहिले और शौचके बाद साबुन से हात धोना. हान्डवॉश
टेशन का इस्तेमाल करना. स्वच्छता के महत्त्व समझाने के लिये, रॉली, चित्रकला, निंबधस्पर्धा
आदी आयोजित किये गये. कचरेके लिये कुडेदान
का जादासे जादा उपयोग करना. साबून ब्यॉन, शौसटॉन्क का इस्तेमाल करना. वयक्तीक और सार्वजनीक स्वच्छता हि जिवन की शैली
बनाई. इसी कारन हमारे विद्यालय को, सन २०१७-१८ का राष्ट्रीय स्वच्छता विद्यालय पुरस्कार
से सन्मानीत हूवा. धन्यवाद.
****
क्रिकेट - आशिया चषक
क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर गटात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. या
स्पर्धेत गेल्या बुधवारी अ गटात झालेल्या लढतीत भारतानं पाकिस्तानचा आठ गडी राखून दणदणीत
पराभव केला. आज दुसरा सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघात होणार आहे.
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या
महिलांच्या ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात काल
कोलंबो इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर पाच गडी राखून विजय
मिळवला. भारताच्या जेमिमा रॉड्रिग्जनं ४० चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्यानं
५७ धावा केल्या. त्यामुळं भारतानं श्रीलंकेचं १३२ धावाचं आव्हान १८ षटकं आणि दोन चेंडूत
पूर्ण केलं. पाच ट्वेंटी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेत आता भारतानं श्रीलंकेविरूद्ध
२-शून्यनं आघाडी घेतली आहे.
****
बौध्दिक संपदा अधिकाराचं जतन करणं ही काळाची गरज
असल्याचं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर इथल्या उपकेंद्राचे संचालक
डॉ.डी.एन.मिश्रा यांनी म्हटलं आहे. दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित
‘बौध्दिक संपदा अधिकार’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन मिश्रा
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. बौध्दिक संपदा अधिकार कायद्यात समाविष्ट
विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कसबे
तडवळे इथल्या एस पी शुगर अँण्ड अँग्रो प्रायव्हेट लिमिटेड या साखर
कारखान्याच्या पहील्या गळीत हंगामाचा शुभारंभ काल आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात
आला. जिल्ह्यात सर्वात प्रथम कारखाना चालू करण्याचा मान एस पी शुगर कंपनीनं मिळवला
आहे. चालु गाळप हंगामात साडेचारशे शेतकरी सभासदांचा ऊस गाळपासाठी येणार असल्याचं कारख्यान्याच्या
वतीनं सांगण्यात आलं.
****
सरकारनं खरीप पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना
द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या लातूर शाखेनं केली आहे. लातूर जिल्ह्यात पावसाअभावी
खरीप हंगामातल्या सोयाबीन, तूर, उडीद आणि मूग पिकांचं नुकसान झालं असून, पिकांचे त्वरीत
पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचं निवेदन जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख
यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.
****
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी,
मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी, उद्या पावसाच्या
सरी कोसळतील, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment