Thursday, 20 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 एयरसेल मॅक्सिस प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाला तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. हा तपास तीन महिन्यात पूर्ण झाला पाहिजे, असं न्यायमूर्ती ए के सिकरी आणि न्यायमूर्ती अशोक भुषण यांच्या पीठानं सांगितलं आहे. याप्रकरणाच्या तपासासाठी संचालनालयाला आणखी मुदतीची आवश्यकता असल्याचं अतिरिक्त  अधिवक्ता जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितलं. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात समोर आलेल्या एयरसेल मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संचालनालय तपास करत आहे.

****



 वीज महावितरण कंपनीच्या तीनं राज्यात पाचशे ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रं उभारली जाणार आहेत. हरित ऊर्जेच्या वापराला अधिकाधिक प्रोत्साहन मिळावं, या उद्देशानं, हा निर्णय घेण्यात आल्याचं, कंपनीकडून सांगण्यात आलं. पहिल्या टप्प्यात अशी पन्नास केंद्र उभारली जाणार असून, यामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये प्रत्येकी चार,  ठाण्यात सहा, पुणे तसंच नागपूरमध्ये प्रत्येकी दहा आणि पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर बारा केंद्र उभारली जाणार असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.



 पुढच्या तीन वर्षांत केंद्रांची संख्या पाचशेपर्यंत वाढवली जाणार आहे. या संदर्भातली ई निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, साधारण आठवडाभरात कार्यादेश जारी होण्याची शक्यता या वृत्तात वर्तवण्यात आली आहे. अशा प्रकारचं एक केंद्र उभारण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या केंद्रावर एक वाहन सुमारे तासाभरात पूर्ण चार्ज होईल, त्यासाठी प्रति युनिट सहा रुपये दर आकारला जाणार आहे.

****



 पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं सध्या उच्चांक गाठल्यानं नागरिक खरोखरच त्रस्त आहेत, असं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत आयोजित एका आर्थिक मंच परिषदेत बोलत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनदर लवकरच कमी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. देशातल्या महामार्गांच्या निर्मितीसाठी आपल्या मंत्रालयानं ९९ टक्के प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवला असून, बँकांनी या प्रकल्पांना सढळ हस्ते सहाय्य करावं, असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं.

****



 मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एयरवेजच्या विमानामध्ये प्रवाशांच्या कक्षात हवेच्या दाबाची समस्या निर्माण झाल्यामुळे आज हे विमान पुन्हा मुंबईच्या विमानतळावर परतलं. विमानानं उड्डाण केल्यावर प्रवाशांच्या कक्षात आवश्यक असलेला हवेचा दाब कायम राखणारी यंत्रणा कार्यान्वीत करायला कर्मचारी विसरल्यानं, हवेच्या दाबावर परिणाम झाला आणि काही प्रवाशांच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव झाला. तसंच डोकेदुखीचा त्रास झाला. विमानात एकूण १६६ प्रवासी होते, त्यापैकी ३० प्रवाशांना हा त्रास झाल्याचं वृत्त आहे.

****



 केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आपल्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी बजट डॅशबोर्ड नावाचं एक वेब पोर्टल सुरु केलं आहे. या पोर्टलवर खर्च आणि देयकांसंबंधी माहिती उपलब्ध होणार आहे. सरकारच्या प्रमुख योजना, त्यांचे लाभ यासंबंधीची सविस्तर माहिती नागरिकांना मिळणार आहे.

****



 भारतीय संविधानानं प्रदान केलेल्या आरक्षण व्यवस्थेचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्णपणे समर्थन करतो, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित, भविष्यातील भारत : संघाच्या नजरेतून, या तीन दिवसीय व्याख्यानमालेत ते काल बोलत होते. आरक्षण मिळालेले घटक स्वत:हून आरक्षण नाकारेपर्यंत ही व्यवस्था सुरू रहायला हवी, असं त्यांनी म्हटलं. कोणत्याही परदेशी भाषेला विरोध नाही, मात्र शिक्षण मातृभाषेतून दिलं जावं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

****



 कामगार राज्य विमा महामंडळ - ई एस आय सीनं नव्या अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेलामंजूरी दिली आहे. या योजनेनुसार विमाधारक व्यक्ती बेरोजगार झाली तरी पुढची नोकरी मिळेपर्यंत एक निश्चित रक्कम तिच्या खात्यात जमा होईल. यापूर्वी विशेष उच्च उपचारासाठी कर्मचारी दोन वर्ष सेवेत असणं आवश्यक होतं, ही मर्यादा आता केवळा सहा महिन्यावर आणली आहे. या योजनेचा लाभ विमा पॉलिसीत केवळ ७८ दिवसांचं योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यालाही मिळणार आहे. विमाधारकावर अवलंबून असलेल्या व्यक्तीलाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

****



 कन्नड तसंच सोयगाव तालुक्यांतल्या विविध सिंचन प्रकल्पांसंदर्भात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड यांनी बैठक घेतली. या दोन्ही तालुक्यातले डावे, उजवे कालवे तसंच नेवपूर मध्यम धरणातून वाहून जाणारं पाणी गणेशपूर धरण्यात वळवण्याचे निर्देश कराड यांनी या बैठकीत दिले. दोन्ही तालुक्यांतल्या सिंचन प्रकल्पांचं सर्वेक्षण करुन प्राथमिक अहवाल तत्काळ मराठवाडा वैधानिक विकास मंडळाकडे सादर करण्यास त्यांनी सूचित केलं. तालुक्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प तत्काळ पूर्ण निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

*****

***

No comments: