Friday, 28 September 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 28.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28  September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ सप्टेंबर २०१दुपारी १.०० वा.

****

केरळच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश करता येईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या पीठानं चार विरुद्ध एक अशा मतानं हा निर्णय दिला. मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणं हे लिंगभेद आणि हिंदू महिलांच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. देवाशी असलेलं नातं हे शारिरीक घटकांवर ठरू शकत नाही, सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे, त्यासाठी लिंगभेद करणं योग्य नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

****

भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी देशभरातून पाच कार्यकर्त्यांना अटक केल्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला असून, यासंदर्भात विशेष तपास पथक स्थापन करण्यासही नकार दिला आहे. आपल्याविरुद्ध दाखल आरोपांचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणा निवडण्याचा अधिकार आरोपींना नसतो, असं न्यायालयानं म्हटलं आहे. अटकेची ही कारवाई, संबंधितांच्या वेगळ्या मतांबद्दल नव्हे, तर प्रतिबंधित संघटनांशी त्यांचा संबंध दर्शवणारे प्रथमदर्शनी पुरावे आढळल्यामुळे करण्यात आल्याचंही न्यायालयानं नमूद केलं आहे. या पाच आरोपींची नजरकैद न्यायालयानं आणखी चार आठवड्यांनी वाढवली आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस खासदार तारिक अन्वर यांनी लोकसभा सदस्यत्वासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राफेल विमान व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याच्या मुद्यावरून, अन्वर यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी, लोकांना मोदींच्या हेतूबाबत शंका नाही, असं सांगतानाच, राफेल कराराची तांत्रिक माहिती आणि तपशील जाहीर करण्याची मागणी चुकीची असल्याचं म्हटलं होतं. मात्र विमानाची किंमत जाहीर करण्यात काही धोका नसून, या मुद्द्यावर संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याच्या मागणीला पवार यांनी पाठिंबा दर्शवला होता.

****

सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारनं आठ सदस्यीय लोकपाल शोध समिती स्थापन केली आहे. प्रसारभारतीचे अध्यक्ष सूर्य प्रकाश, स्टेट बँकेच्या माजी प्रमुख अरुंधती भट्टाचार्य आणि न्यायमूर्ती सुखराम सिंह यादव यांचा या समितीत समावेश आहे. कार्मिक मंत्रालयानं यासंदर्भातला आदेश जारी केला असून, ही समिती लोकपाल अध्यक्ष आणि सदस्यांच्या नावाची शिफारस करेल. लोकपाल निवडीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही निवड प्रक्रिया सुरु आहे, असं कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं. लोकपाल नियुक्तीच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असून ही समिती आपलं काम लवकरच सुरु करेल असं असं सिंह यांनी सांगितलं. 

****

राफेल करार, दोन देशांमधल्या सरकारांमध्ये झाला असून डासो विमान कंपनीला भारतातला भागीदार निवडण्याचं स्वातंत्र्य होतं, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. देशात अधिक चांगल्या दर्जाची हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमानं खरेदी करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. सध्याच्या सरकारनं केलेल्या करारापेक्षा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं केलेल्या कराराची किमंत कैकपटीनं अधिक होती, असंही त्यानी यावेळी सांगितलं.  

****

उद्योग मंत्रालयाच्या सहाकार्यानं नागरी विकास मंत्रालय शहरी भागातल्या गरीब तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. ‘नारेडकोअर्थात राष्ट्रीय गृहनिर्माण विकास परिषद या कार्यक्रमाद्वारे शहरातल्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या अकुशल कामगार, बेरोजगार आणि व्यावसायिकांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देणार आहे. गृहनिर्माण क्षेत्रातली कुशल कामगारांची गरज लक्षात घेता, येत्या तीन वर्षात अडीच लाख शहरी गरीब युवकांना प्रशिक्षण देण्याची योजना असल्याचही पुरी यांनी सांगितलं.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि बांगलादेश संघादरम्यान होणार आहे. दुबई इथं होणाऱ्या या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सुरुवात होईल. भारतानं आतापर्यंत सहा वेळेस आशिया चषक जिंकला आहे.

//************//


No comments: