Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø आधार योजना घटनात्मकदृष्ट्या वैध मात्र शैक्षणिक लाभासाठी
आवश्यक नाही - सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
Ø एसी, फ्रीज आणि वॉशिंग मशीनसह आरामदायक वस्तूंवरच्या सीमा
शुल्कात वाढ
Ø मराठवाड्यात
तातडीनं दुष्काळ जाहीर करावा
- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, अजित पवार यांची मागणी
आणि
Ø डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘केंद्रीय
युवा महोत्सवा’ला प्रारंभ
****
केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मकदृष्ट्या वैध
असल्याचा निर्वाळा काल सर्वोच्च न्यायालयानं दिला. मात्र आधार क्रमांकाअभावी विद्यार्थ्यांना
कोणत्याही योजनेचे लाभ नाकारता येणार नाहीत, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. आधार योजना
आणि संबंधित कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर सुनावणी
घेतल्यानंतर न्यायालयानं काल हा निकाल दिला. समाजातल्या दुर्लक्षित घटकांना लाभ मिळण्याच्या
दृष्टीनं आधार उपयुक्त असल्याचं मत, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या
पाच सदस्याच्या घटनापीठानं व्यक्त केलं. शाळा प्रवेशासाठी आधार अनिवार्य नसल्याचं सांगत,
सी बी एस ई, एन ई ई टी किंवा विद्यापीठ अनुदान आयोगालाही आधारची सक्ती करता येणार नाही,
असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. देशात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्यांना आधार क्रमांक
देऊ नये असे निर्देशही न्यायालयानं दिले. आधार क्रमांक बँक खात्यांशी जोडणं बंधनकारक
नाही, मात्र पॅन - कायम खाते क्रमांक आणि आयकर विवरण पत्र भरताना आधार क्रमांक देणं
अनिवार्य असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं.
****
अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत
आरक्षणासाठी त्यांच्या मागासपणाची पुष्टी करणारी आकडेवारी, राज्यांनी गोळा करण्याची
आवश्यकता नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भातल्या एन. नागराज प्रकरणी
२००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं अनावश्यक अटी घातल्या असून, त्यावर सात सदस्यीय पीठाकडून
फेरविचार केला जावा, अशा याचिका न्यायालयात दाखल झाल्या होत्या, सरन्यायाधीश दीपक मिश्रा
यांच्या नेतृत्वाखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं काल, या पुनर्तपासणीची आवश्यकता नसल्याचं
सांगितलं. आरक्षण कोट्यासाठी अनुसूचित जाती जमातींची एकूण लोकसंख्या विचारात घ्यावी,
ही केंद्र सरकारची विनंती मात्र न्यायालयानं फेटाळून लावली.
****
न्यायालयीन कामकाजाचं थेट प्रसारण करण्यास सर्वोच्च
न्यायालयानं परवानगी दिली आहे. या प्रक्षेपणाची सुरूवात सर्वोच्च न्यायालयापासूनच होणार
आहे. यासंदर्भात दाखल विविध याचिकांवर निर्णय देतांना, थेट प्रसारणामुळे न्यायालयाच्या
कामकाजात पारदर्शकता येईल आणि लोकहिताच्या दृष्टीनं ही बाब महत्त्वाची असल्याचं मत
न्यायालयानं व्यक्त केलं.
****
साखरेच्या उत्पादनासाठी आर्थिक बाबींविषयक मंत्रिमंडळाच्या
समितीनं काल सर्वंकष धोरणाला मान्यता दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल
नवी दिल्लीत ही माहिती दिली. राष्ट्रीय डिजीटल धोरणालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल
मंजुरी दिली. जनतेला ५० मेगाबाईट प्रति सेकंद वेगानं ब्रॉडबॅन्ड सेवा पुरवण्याचं या
धोरणाचं उद्दिष्ट आहे.
****
आरामदायक वस्तूंची आयात रोखण्याच्या दृष्टीनं सरकारनं
विमानांचं इंधन, एसी, फ्रीज तसंच वॉशिंग मशीनसह एकोणीस वस्तूंवरचं सीमा शुल्क वाढवलं
आहे. हे नवीन दर काल रात्रीपासून लागू झाले. पादत्राणं, दागिने, स्वयंपाकाची आधुनिक
भांडी, प्लास्टिकच्या वस्तूंचा यामध्ये समावेश आहे. एसी, फ्रीज तसंच दागिन्यांवरचं
आयात शुल्क २० टक्के, तर पादत्राणांवरचं शुल्क २५ टक्के करण्यात आलं आहे.
****
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींसाठी शिवसेनेसोबतची
युती कायम ठेवण्याची भारतीय जनता पक्षाची इच्छा आहे, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. भाजप-शिवसेनेच्या मतांचं विभाजन
झाल्यास काँग्रेसला लाभ मिळेल, हे टाळण्यासाठी भाजप युती कायम ठेवण्यास इच्छुक असल्याचं
सांगून, आता याबाबतचा निर्णय शिवसेनेच्या नेतृत्वानं घ्यावा, असं मुनगंटीवार म्हणाले.
****
राज्यातल्या सव्वीस जिल्ह्यांमधल्या मुदत संपणाऱ्या
आणि नवनिर्मित अशा एकूण नऊशे तीस ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झालं. या निवडणुकीसाठी
सरासरी एकोणऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली. सरपंचपदाच्या थेट निवडीसाठीही काल मतदान
झालं. मतमोजणी आज होणार आहे. मराठवाड्यातल्या बीड, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या
ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
मराठवाड्यात
तातडीनं मंत्रिमंडळाची
बैठक बोलावून दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते,
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं राष्ट्रवादी युवक
कॉंग्रेसच्या सक्षमीकरण संकल्प मेळाव्यात बोलत होते. सरकारनं कर्जमाफीची फक्त घोषणा
केली, त्याचा अद्यापही अनेकांना लाभ मिळालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. विधान परिषदेचे
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सरकारच्या विविध धोरणांवर यावेळी टीका करण्यात आली.
****
जाती-धर्मांच्या पलीकडे
परस्परांमधला स्नेह कायम
राहण्यासाठी युवकांनी प्रयत्नशील राहावं, असं आवाहन अभिनेता सुबोध भावे यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं, डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘केंद्रीय
युवा महोत्सवा’चं उदघाटन केल्यानंतर, ते बोलत होते. युवक महोत्सवात भाग घेणं हा
विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा पुरस्कारचं असल्याचंही ते म्हणाले. यावेळी विद्यापीठाचे
माजी विद्यार्थी तसंच अभिनेते उमेश जगताप यांनी, विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीचा
न्यूनगंड न बाळगण्याचं आवाहन केलं. या चार दिवसीय युवक महोत्सवात
मराठवाड्यातले विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी कलावंत सहभागी झाले आहेत.
****
क्रिकेट - आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि
बांगलादेश संघात होणार आहे. सुपर फोर फेरीत काल झालेल्या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानचा
सदोतीस धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला
आणि बाल कल्याण विभागाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या कुपोषणमुक्तीचा प्रयत्न यशस्वी
ठरत आहे. २५२ ग्राम बालविकास केंद्रांमूधन २५ जून ते आठ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातल्या
४४४ कुपोषित बालकांना प्रोटीनयुक्त आहार देण्यात आला आणि नियमीत काळजी घेण्यात आली.
याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर..
सदर कुपोषीत बालकांना
दिवसा मधुन पाच वेळा वेगवेगळा सकस आहार देण्यात आला. तिव्र कुपोषीत श्रेणीतून २१८ बालके
सर्वसाधारण श्रेणीत आली आहेत. तिव्र कुपोषीत श्रेणीमधील १८३ बालके मध्यम कुपोषीत श्रेणीत परिर्वतीत झालेली
आहे. तर अद्यापही ३४ बालके कुपोषण मुक्त झालेली नाही. नियमित आहार आणि उपचार देऊनही
कुपोषण मुक्त न झालेल्या बालकांना तज्ञ डॉक्टराकडून तपासून घेऊन, त्यांच्या सल्या नुसार
त्यांच्यावर उपचार करूण कुपोषण मुक्त करू असा निर्धार उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश
वाघ यांनी व्यक्त केला आहे.
रमेश कदम, आकाशवाणी वार्ताहर, हिंगोली.
****
परभणी शहरात काल काँग्रेस,
राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांतर्फे सरकारच्या धोरणाविरोधात मोर्चा काढण्यात
आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढ कमी करावी, आदी मागण्यांचं
निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
लातूर महानगरपालिकेच्या स्थायी
समितीच्या सभापती निवडीबाबत पालिकेनं केलेली कार्यवाही सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवली
आहे. या निर्णयामुळे मनपाच्या महासभेत झालेली स्थायी समितीच्या
सदस्यांची निवड आणि शैलेश गोजमगुंडे यांची सभापतीपदी झालेली निवड कायम झाली आहे. पाच
सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयानं ही निवड रद्द ठरवली होती. भारतीय जनता पक्षानं या निर्णयाला
सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल होतं.
या निर्णयामुळे प्रलंबित विकासकामांना गती देता येईल,
असं सभापती शैलेश गोजमगुंडे यांनी म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद इथं येत्या दोन आणि तीन आक्टोबरला, शिक्षा
संस्कृती न्यासाच्या वतीनं ‘ज्ञानोत्सव २०१८‘ चं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात
उपक्रमशील शिक्षक आणि शिक्षणसंस्था चालकांच्या अभ्यासपूर्ण संशोधनपर प्रयोगांची मांडणी
केली जाणार असून, यामध्ये राज्यातल्या चोवीस जिल्ह्यातले शिक्षक तसंच संस्थाचालक उपस्थित
राहतील अशी अपेक्षा आहे.
****
औरंगाबाद
इथं येत्या रविवारी ३० सप्टेंबरला राज्यस्तरीय धनगर एल्गार मेळावा आणि मेंढपाळ हक्क
परिषदेचं अयोजन करण्यात आलं आहे. जय मल्हार सेनेचे लहुजी शेवाळे यांनी काल औरंगाबाद
इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
*****
***
No comments:
Post a Comment