आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिक्किम राज्यातल्या पहिल्या
विमानतळाचं उद्घाटन करत आहेत. सिक्किम ची राजधानी गंगटोक पासून तेहतीस किलोमीटर्स अंतरावर
असलेल्या पॅकयोंग या ठिकाणी, समुद्रसपाटीपासून साडेचार हजार फूट उंचीवर हे विमानतळ
उभारण्यात आलं आहे. या विमानतळामुळे सिक्किमच्या संपर्क सुविधेत वाढ होईल, असं पंतप्रधानांनी
म्हटलं आहे. येत्या चार ऑक्टोबर पासून या विमानतळावरून उड्डाणं सुरू होणार आहेत.
****
भारतानं पृथ्वी या संरक्षक क्षेपणास्त्राची काल ओडिशाच्या
किनारपट्टीवर यशस्वी चाचणी केली. दुहेरी स्तराची बॅलिस्टिक मिसाईल सुरक्षा यंत्रणा
विकसित करण्यात भारतानं यश मिळवल्याचं या चाचणीनं सिद्ध झालं आहे. पृथ्वीच्या वातावरणात
पन्नास किलोमीटर्सहून जास्त उंचीवर असलेल्या लक्ष्याचा भेद करणं या क्षेपणास्त्रामुळे
शक्य होणार आहे.
****
राफेल व्यवहार प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करावा,
या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं पथक आज केंद्रीय दक्षता आयोगाची
भेट घेणार असल्याचं या पक्षानं सांगितलं आहे. मागच्या आठवड्यात काँग्रेसनं भारताच्या
नियंत्रक आणि महालेखापाल, अर्थात कॅगकडे, या
प्रकरणातल्या अनियमिततेचा अहवाल संसदेत सादर करण्याची विनंती केली होती. केंद्रीय दक्षता
आयोगाकडेही अशीच मागणी हा पक्ष करणार असून, याप्रकरणी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याची
मागणीही करणार असल्याचं पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेस
या कराराबाबत खोटे आरोप करत असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.
****
नांदेड इथले विधीज्ञ विजयसिंह
देशमुख किल्लेवडगावकर यांचं काल पुणे इथं निधन झालं. ते 76 वर्षाचे होते. त्यांच्या
पार्थिव देहावर आज नांदेड इथ अंत्यसंस्कार
करण्यात येत आहेत.
****
कोल्हापूरमध्ये सलग
बावीस तासांच्या मिरवणुकीनंतर श्रीगणेशाला निरोप देण्याचा समारंभ आज सकाळी पार पडला आहे. या वेळी महानगरपालिकेकडून तीनशे एक्कावन्न मंडळांना
मानाचा नारळ देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
स्लोवाकियामध्ये
सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दीपक पुनियानं काल
शहाऐंशी किलो वजनगटात रौप्यपदक जिंकलं. या
स्पर्धेत भारतानं चार रौप्य आणि तीन कांस्यपदकं जिंकली आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment