आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पुनरुत्थानासाठी शैक्षणिक नेतृत्व या विषयावरच्या
परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
भारतीय शैक्षणिक प्रणालीला भेडसावणाऱ्या आव्हानांवर चर्चा करणं, आणि शैक्षणिक फलनिष्पत्ती
तसंच या क्षेत्रातलं नियमन या दोन्हींमध्ये मोठे बदल घडवणारा आराखडा तयार करणं हा या
परिषदेचा उद्देश आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक कृती आराखडा
तयार करण्याच्या उद्देशानं सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. ३५०हून अधिक
विद्यापीठांचे कुलगुरु या परिषदेत सहभागी होणार आहेत. शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी
अध्यापनात सुधारणा करणं, नवनिर्मितीमध्ये सुधारणा, रोजगार निर्मितीसाठी उद्योजकता आणि
रचनात्मक अध्ययानाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर या विषयांसह विविध विषयांवर या एकदिवसीय
परिषदेत चर्चा होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन
की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४८वा भाग
असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
शौर्य दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे. नांदेड इथं आजी-माजी सैनिकांचा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या
हस्ते सत्कार केला जाणार आहे. भारतीय सैन्याने २०१६ मध्ये आजच्याच दिवशी लक्षभेदी कारवाई-सर्जिकल
स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केली होता, त्यामुळे आजचा दिवस शौर्य दिन म्हणून
साजरा केला जातो.
****
कोट्यवधींच्या वाहन घोटाळ्याप्रकरणी बीड प्रादेशिक
परिवहन कार्यालयातल्या दोन अधिकाऱ्यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र निकम
आणि निलेश भगुरे अशी या दोघांची नावं असून, सय्यद शकीर नावाच्या एजंटलाही अटक करण्यात
आली आहे. बनावट निर्मिती आणि विक्री प्रमाणपत्र बनवून सदोष कार विक्री केल्याचा घोटाळा
ऑगस्टमध्ये उघडकीस आला होता.
*****
***
No comments:
Post a Comment