Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø फौजदारी गुन्ह्यात दोषी सिद्ध होण्यापूर्वी निवडणूक लढवण्यास
कोणीही अपात्र नाही- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Ø मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी बारावीपर्यंत एसटी
बसचा मोफत प्रवास पास
Ø
राज्यात
प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला मुदतवाढ नाही - पर्यावरण मंत्र्यांकडून स्पष्ट
Ø मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ
उद्योजक मधुकर मुळे यांना प्रदान
आणि
Ø आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत अफगाणिस्तान सामना अनिर्णित
****
फौजदारी गुन्ह्यात दोषी सिद्ध होण्यापूर्वी कोणत्याही
लोकप्रतिनिधीला निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च
न्यायालयानं दिला आहे. मात्र, अशा लोकप्रतिनिधींना रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची
आवश्यकता, न्यायालयानं व्यक्त केली. न्यायालय संसदेच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करणार
नाही, मात्र उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरच्या गुन्ह्यांची माहिती ठळक शब्दात
द्यावी, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या गुन्हेगारी
पार्श्वभूमीची माध्यमांमध्ये जाहिरात द्यावी, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किमान तीन वेळा
वृत्तपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध झाली पाहिजे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. राजकारणातला
वाढता भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरणामुळे लोकशाहीच्या मुळावर घाव घातला जात असल्याचं
मतही न्यायालयानं नोंदवलं.
दरम्यान, खासदार, आमदार आणि विधानपरिषदेच्या सदस्यांना वकील म्हणून काम
करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. या
जनहित याचिकेवरचा निर्णय न्यायालयानं
नऊ जुलै रोजी राखून ठेवला होता.
****
ग्रामीण भागातल्या मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी
त्यांना बारावी पर्यंत राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी बसचा मोफत प्रवास सवलत पास
देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी
काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आता
शिवशाही बससाठीही सवलत लागू करण्यात आली आहे, तसंच पत्रकारांनाही आता वातानुकुलीत शिवशाही
बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय इतर विविध सवलतींची घोषणा रावते यांनी
यावेळी केली. या विविध सवलतींचा राज्यातल्या सुमारे दोन कोटी १८ लाख नागरिकांना लाभ
होणार आहे.
गटशेतीला चालना देण्यासाठी उत्कृष्ट शेतकरी गटांना
पुरस्कार देण्यासही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. चांगली कामगिरी करणाऱ्या शेतकरी
गटांना २५ लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, दहा लाख रुपयांचा द्वितीय आणि पाच लाख रूपयांचा
तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहे. यासह गट शेती योजनेंतर्गत मंजूर गटांना प्रकल्प
खर्चाच्या ६० टक्के अथवा जास्तीत जास्त एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत. हे अनुदान
प्रचलित इतर योजनेतून मिळणाऱ्या अर्थसहाय्याव्यतिरिक्त असणार आहे.
महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीची स्थापना
करण्याचा निर्णयही कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. उर्दू साहित्य
अकादमीच्या धर्तीवर ही अकादमी कार्य करील.
जिल्हा परिषदेत कार्यरत कृषि अधिकाऱ्यांना आता राजपत्रित
गट ब संवर्ग दर्जा देण्यासही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
राज्यात
प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं पर्यावरण
मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट
केलं आहे. काल मुंबईत, मंत्रालयात प्लास्टिक
बंदी संदर्भात आढावा बैठकीत ते
बोलत होते. प्लास्टिक बंदीची मोहीम काटेकोरपणे
राबवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. व्यापाऱ्यांसह उत्पादक कंपन्यांना दिलेली तीन महिन्यांची मुदत संपत
आली असून मुदतीनंतर कारवाई सुरु करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
राज्यातला
ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल
मुंबईत ऊस
गाळप आढावा आणि हंगाम नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. साखर संघाच्या शिफारशी तसंच वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
- विस्मा आणि राज्य सहकारी बँकेच्या शिफारशींबाबत केंद्र सरकारचं धोरण आणि इतर संबंधित
घटकांशी चर्चा करुन लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी
सांगितलं.
****
राज्यात राष्ट्रीय कृषी सहकारी
विपणन महासंघ - नाफेडच्यावतीनं मूग, उडीद आणि सोयाबीनची आधारभूत खरेदी केंद्रं सुरू करण्यात येणार आहेत. मूग सहा हजार ९७५ रूपये प्रतिक्विंटल तर उडीद पाच हजार ६०० रूपये
प्रतिक्विंटल आधारभूत दरानं खरेदी केलं जाणार असून, या दोन्ही कडधान्याच्या खरेदीसाठी
कालपासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली. येत्या ९ ऑक्टोबरपर्यंत ही नोंदणी केली जाणार
आहे. सोयाबीनसाठी तीन हजार ३९९ रूपये प्रतिक्विंटल आधारभूत दर ठरवण्यात आला असून
येत्या १ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
मराठवाड्यानं राज्याला नेहमीच दिशा देण्याचं कार्य
केलं, असं प्रतिपादन माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. त्यांच्या हस्ते काल
औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक मधुकर
मुळे यांना देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि
२५ हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सद्यस्थितीत युवकांच्या हाताला काम नाही.
राज्यात मोठया प्रमाणात गुंतवणूक येत नाही त्यामुळे विविध समाजांकडून आरक्षणाची मागणी
होत असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.
****
अशिया चषक क्रिकेट स्पर्धेत
काल भारत-अफगाणिस्तान सामना अनिर्णित राहिला. सुपर फोर फेरीतल्या या सामन्यात नाणेफेक
जिंकून अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करत पन्नास षटकात आठ बाद २५२ धावा केल्या. भारतीय
संघ या आव्हानाचा पाठलाग करताना पन्नासाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर २५२ धावांवर
सर्वबाद झाल्यानं सामना बरोबरीत राहिला.
दरम्यान, भारतानं याआधीच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली
असून आज, बांग्लादेश आणि पाकिस्तान संघात होणाऱ्या सामन्यातल्या विजेत्याशी भारताचा
अंतिम फेरीत सामना होणार आहे.
****
‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत काल ठिकठिकाणी
स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
लातूर शहरातल्या महाराणा प्रताप नगर इथून जिल्हास्तरीय
स्वच्छता मोहिमेला काल प्रारंभ झाला. प्रत्येक गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करण्यासाठी
स्वच्छता ही लोकचळवळ होणं गरजेचं असल्याचं, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर
यावेळी म्हणाले. या अभियानाअंतर्गत गावा-गावातल्या शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, तसंच
मंदीर परिसरात स्वच्छता करण्यात आली.
परभणी तालुक्यातल्या झरी ग्रामपंचायतीमध्येही काल
स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाअंतर्गत महाश्रमदान दिन पाळण्यात आला. जिल्हा परिषदेतले
पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी गावात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करुन विद्यार्थ्यांना
स्वच्छतेची शपथ दिली.
नांदेड
जिल्ह्यात महाश्रमदानाव्दारे स्वच्छता करण्यात आली. या अंतर्गत
ग्राम पंचायत, शाळा, अंगणवाडी, महाविद्यालय, गावस्तरावरील
इतर कार्यालयांचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
येत्या 2 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत स्वच्छतेसंदर्भात विविध उपक्रम राबवले
जाणार आहेत.
हिंगोली, औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही
काल महाश्रमदान दिन पाळण्यात आला.
****
शेतीसाठी
ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कीड तसंच खत व्यवस्थापन, जलव्यवस्थापन सोपं होणार
आहे. लातूर जिल्ह्यातल्या
लोदगा इथल्या सर छोटुराम कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयानं बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट
ऑफ सायन्ससोबत याबाबत एक
करार केला आहे. या ड्रोनविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -
परंपरागत शेतीला
रामराम करून, नव्या तंत्रज्ञानाचा कासरा हाती घेऊन शेती करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा
वापर करता येऊ शकतो. परंतु एक एकर, दोन एकरवाल्या जमीनदारांना ते शक्य होणार नाही. त्यासाठी गट शेती, समूह शेतीचा
अंगीकार करावा लागणार आहे. ड्रोनच्या वापरामुळे पिकावर पडणाऱ्या रोगाचा, किडीचा प्रादुर्भावाचं
अचूक सर्वेक्षण करून त्यावर समप्रमाणात उपाययोजना करून कीटकनाशके फवारता येतील. आणि
खर्चात बचत करता येऊ शकते.
अरूण समुद्रे, आकाशवाणी बातम्यासाठी लातूर.
****
राफेल विमान खरेदीत ४१ हजार कोटी रूपयांचा घोटाळा
झाला असून, या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी काल नांदेड इथं काँग्रेस
पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत
हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं.
****
देशातल्या किरकोळ व्यापारामध्ये विदेशी गुंतवणुकीच्या
विरोधात आणि फ्लीपकार्ट-वॉलमार्ट अंतर्गत झालेल्या कराराच्या विरोधात व्यापाऱ्यांनी
परवा, २८ तारखेला देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ
आणि सर्व संलग्न संघटनांचा पाठींबा असल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष
जगन्नाथ काळे यांनी दिली. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या बंद
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या लालवाडी इथल्या
एका शेतातून पोलिसांनी प्रतिबंधित जिलेटीन स्फोटकाच्या ४०७ कांड्या काल जप्त केल्या.
या प्रकरणी जालना तालुक्यातल्या जामवाडी इथल्या दोन संशयितांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जालना तालुक्यातल्या दगडवाडी इथल्या एका
शेतात पोलिसांनी काल छापा टाकून अवैध उत्खनन करून काढलेला गारगोटी दगडाचा मोठा साठा
जप्त केला. आठ टन वजन असलेल्या या मौल्यवान दगडाचं बाजारमूल्य १६ लाख ४० हजार रुपये
असून, या प्रकरणी एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
*****
***
No comments:
Post a Comment