Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०१८ दुपारी
१.०० वा.
****
शांततेवर आमचा विश्वास
आहे आणि त्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता आम्ही कटिबद्ध
आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन
की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते. या मालिकेचा
आज ४८वा भाग प्रसारित झाला. पराक्रम पर्व सारखा दिवस युवकांना आपल्या सशस्त्र दलाच्या
गौरवपूर्ण वारशाचं स्मरण करून देतो, देशाची एकता आणि अखंडत्व राखण्यासाठी
आपल्याला प्रेरितही करतो, असं
ते म्हणाले. देशातली शांतता आणि प्रगतीचं वातावरण
नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपले सैनिक चोख प्रत्युत्तर देतील, असा विश्वासही
त्यांनी व्यक्त केला.
येत्या दोन ऑक्टोबरला राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांची जयंती. पुढचे दोन वर्ष आपण गांधीजींच्या दीडशेव्या
जयंतीनिमित्त जगभरात अनेक कार्यक्रम करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
सध्या देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानात सहभागी होणाऱ्या नागरिकांचे
त्यांनी आभार मानले.
गांधीजींसोबत लाल बहादूर शास्त्री यांचीही
जयंती साजरी केली जाणार असल्याचं सांगून, पंतप्रधानांनी, शास्त्रीजींचं सौम्य व्यक्तिमत्व प्रत्येक देशवासीयाला सदैव अभिमानास्पद असल्याचं म्हटलं.
येत्या आठ ऑक्टोबरला हवाई दल दिन साजरा करण्यात येणार आहे. देशासाठी
सेवा करणाऱ्या सर्व हवाई सैनिकांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं
पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे.
मदत आणि बचाव कार्य असो किंवा आपत्ती व्यवस्थापन, हवाई
दलाच्या प्रशंसनीय कामगिरीप्रती, देश कृतज्ञ असल्याचं ते म्हणाले.
१२ ऑक्टोबरला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला २५वर्षं पूर्ण
होणार असून, एन एच आर सीनं मानव अधिकारांच्या रक्षणाबरोबरच मानवी प्रतिष्ठा वृद्धिंगत
करण्याचं कार्य केलं असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं.
पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या नवरात्री,
दुर्गा पूजा, विजयादशमी या सणांच्या पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा
दिल्या आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर
असून, आणंद इथं अमूलच्या अत्याधुनिक चॉकलेट प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं.
पंतप्रधानांनी यावेळी अमूल चॉकलेट संयंत्राची पाहणी केली. आणंद इथं आधुनिक अन्नप्रक्रिया सुविधांचं उद्घाटन, तसंच
आणंद कृषी विद्यापिठाच्या अन्नप्रक्रिया करणाऱ्या नवीन उद्योगांना आसरा देणाऱ्या केंद्राचं आणि मुझकुवा गावात सौर सहकारी
संस्थेचंही उद्घाटन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
देशात मोबाईल हँडसेटच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी
मोबाईल फोन उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या 35 सुट्या भागांना सीमा शुल्कातून
सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स
असोसिएशननं सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
****
छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात काल १५ नक्षलवाद्यांनी
शरणागती पत्करली. यामध्ये एका पती-पत्नीचाही समावेश
आहे. या नक्षलवाद्यांपैकी चार जणांना
पकडून देण्यासाठी बक्षीस जाहीर केलं होतं. आपण
हिंसा आणि नक्षलवादी चळवळीतल्या वरिष्ठ नेत्यांकडून होणाऱ्या शोषणाला
कंटाळून शरणागती पत्करत आहोत, असं या नक्षलवाद्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
****
राफेल विमान खरेदी हा देशातला आतापर्यंतचा सर्वात
मोठा घोटाळा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या फौजिया खान यांनी केला
आहे. त्या काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. राफेल प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांनी कधीच प्रधानमंत्र्यांची पाठराखण केली नाही, परंतु त्यांच्या
वक्तव्याचा भाजपानं विपऱ्यास केला, असंही त्या म्हणाल्या. राफेल घोटाळ्याची संसदेच्या
संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. देशात न्यायव्यवस्था, निवडणूक
आयोग, रिझर्व्ह बँक आणि माध्यमांची स्वायत्तता धोक्यात आल्याचं त्या म्हणाल्या.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं होणाऱ्या ४० व्या मराठवाडा
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी समीक्षक कवी डॉ. ऋषिकेश कांबळे यांची निवड करण्यात
आली आहे. काल परभणी इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत
एकमतानं त्यांची निवड करण्यात आली.
****
वार्षिक सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस झाल्यानं, लातूर
शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या मांजरा धरणाची पातळी मृत साठ्यापर्यंत
खाली गेली आहे. शहराचे पूरक स्त्रोत असलेले नागझरी आणि साईबंधारेही कोरडे पडले आहेत.
त्यामुळे जनतेनं पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन लातूर महानगरपालिकेनं केलं आहे.
****
चेन्नईत काल संपलेल्या २५व्या
आशियाई कनिष्ठ वैयक्तिक स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या युवराज वाधवानीनं विजेतेपद
पटकावलं. त्यानं अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अनस अलिशाह याचा १३ - ११,
११ - पाच, सहा - ११, १२ - १० असा पराभव केला. या
स्पर्धेत भारताला एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकं मिळाली.
*****
***
No comments:
Post a Comment