आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते आज झारखंड मधल्या रांची इथं प्रधानमंत्री आयुष्यमान भारत -जन आरोग्य योजनेचं उद्घाटन
होणार आहे. देशातल्या ५० कोटी जनतेला लाभ देणारी ही जगातली सर्वात मोठी सरकारी
विमा योजना असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या लाभार्थ्यांचा खर्च कमी करणं आणि योजनेअंतर्गत त्यांना
चांगल्या आरोग्य सुविधा पुरवणं हा या योजनेचा हेतू आहे. ही
योजना आरोग्य वीमा योजना असून, देशातल्या आरोग्य सेवांमध्ये क्रांतीकारी बदल घडवू
शकेल असं आयुष्यमान भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण यांनी म्हटलं आहे.
मुंबई
इथं राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या
योजनेचा शुभारंभ होणार आहे. जिल्हास्तरावरही ही योजना सुरु करण्यात येणार असून, औरंगाबाद
इथं पालकमंत्री डॉ. दीपक सावंत आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते
योजनेची सुरुवात होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातले एक लाख ४७ हजार
कुटुंब, तर शहरी भागातल्या ९५ हजार कुटुंबांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं
आहे.
****
आज अनंत चतुर्दशी. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची आज
सांगता होणार आहे. घरोघरी स्थापन गणपतींसह सार्वजनिक गणपतींचं आज विसर्जन होणार आहे.
यानिमित्त आज राज्यभर कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईसह सर्वच मोठ्या शहरातल्या
विसर्जन मिरवणुकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. औरंगाबाद श्हरातल्या मानाच्या
संस्थान गणपतीची मिरवणुक काही वेळात निघणार आहे.
****
उपेक्षीतांचे प्रश्न जगासमोर मांडण्याचं कार्य लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केलं असं मत डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्राध्यापक
संजय सांभाळकर यांनी व्यक्त केलं. काल जालना इथं क्रांतीगुरू लहुजी साळवे विकास परिषदेच्या
वतीनं साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यान
मालेचं अकरावं पुष्प त्यांनी गुफंलं, त्यावेळी ते बोलत होते. मागासवर्गीयांवर होणाऱ्या
अन्याय आत्याचारांसंबंधी मातंग समाज रस्त्यावर येत असून, संघर्ष करत असल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं
*****
***
No comments:
Post a Comment