आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
मोहरम आज साजरा होत आहे. या निमित्तानं ताबुत, सवाऱ्यांची
मिरवणूक तसंच मातमी जुलूस काढले जातात. अहमदनगर इथं मोहरमचे ताबूत आणि सवाऱ्या पाहण्यासाठी
राज्यातून मुस्लिम भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. आज मोहरमच्या रात्री इमाम
हुसेन आणि इमाम हसन यांच्या सवाऱ्यांची मिरवणूक काढली जाते.
दरम्यान, आज मोहरमनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय- घाटीचा बाह्यरुग्ण विभाग बंद
राहणार असल्याचं घाटीच्या अधीक्षकांनी कळवलं आहे.
****
राज्यात येत्या पंचवीस तारखेपासून पंडित दीनदयाळ
उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना लागू होणार आहे. या योजनेद्वारे राज्यातल्या नागरी,
ग्रामीण बिगर शेती, महिला आणि पगारदार सहकारी पतसंस्था तसंच मल्टीस्टेट पतसंस्थांमधल्या
एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण मिळणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी
काल मुंबईत ही माहिती दिली. या योजनेमुळे राज्यातल्या आठ हजार चारशे एकवीस पतसंस्थांच्या
चाळीस हजार कोटी रुपयांच्या ठेवींना संरक्षण मिळणार आहे.
****
विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या तीन ऑक्टोबरला
मतदान होणार आहे. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. विधान
सभा सदस्यांद्वारे होणाऱ्या या निवडणुकीसाठी तीन ऑक्टोबरला सकाळी ९ ते दुपारी चार या
वेळेत मतदान होणार असून, निवडणुकीचा निकाल लगेचच सायंकाळी पाच वाजता जाहीर होण्याची
शक्यता आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात माहिती अधिकारातंर्गत दाखल सुमारे
४०० प्रकरणांची, माहिती आयोगानं काल आणि परवा हिंगोलीत जाऊन सुनावणी घेतली. यामध्ये
पहिल्या दिवशी २०२ तर दुसऱ्या दिवशी १५० प्रकरणांची सुनावणी घेतल्याचं, माहिती आयुक्त
दिलीप धारुरकर यांनी सांगितलं.
****
पोषण आहार महिन्यानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्याच्या
तुळजापूर तालुक्यात मंगरूळ इथं गर्भवतींना पोषण आहाराचं वाटप करण्यात आलं. सहा वर्षांपर्यंतची
बालकं, मुली आणि गर्भवतींसाठी पोषण आहाराच्या महत्त्वाबाबत यावेळी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन
केलं.
*****
***
No comments:
Post a Comment