Monday, 24 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****



Ø ‘आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला देशभरात प्रारंभ

Ø पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात ठिकठिकाणच्या गणपतींचं विसर्जन

Ø गणेश विसर्जनादरम्यान अनेक ठिकाणी तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

आणि

Ø अशिया चषक क्रिक्रेट स्पर्धेत पाकिस्तानचा दणदणीत पराभव करून, भारत अंतिम फेरीत दाखल

****



 ‘आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ ही मानवतेची खूप मोठी सेवा म्हणून भविष्यात ओळखली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. झारखंडमधल्या रांची इथं काल या योजनेचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. देशातल्या १० कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून, यात तेराशे गंभीर आजारांवर सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार होतील. या योजनेमध्ये द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमधल्या दोन हजार पाचशेपेक्षा अधिक आधुनिक रूग्णालयांचा समावेश होणार असल्यानं, रोजगारांच्या अनेक संधी निर्माण होतील. आतापर्यंत आयुष्यमान भारत योजनेमध्ये १३ हजाराहून अधिक रूग्णालयांचा समावेश करण्यात आला असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.



 मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात केली. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्योत्तर काळात खऱ्या अर्थानं अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबत शिक्षण, आरोग्य आणि रोजगार याचीही सरकारनं हमी दिली असल्याची भावना व्यक्त केली. या योजनेची सुरुवात म्हणजे ऐतिहासिक क्षण असून, या योजनेत देण्यात येणारी आरोग्य सेवा सर्वसामान्यांसाठी परवडणारी असेल, असं राज्यपालांनी सांगितलं. राज्यपालांच्या हस्ते यावेळी राज्यातल्या १६ लाभार्थ्यांना ई-कार्डचं वाटप करण्यात आलं.



 औरंगाबाद इथं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला सुरुवात करण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, महापौर नंदकुमार घोडेले यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात १० लाभार्थ्यांना आरोग्य कार्डचं वाटप करण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातले एक लाख ४७ हजार कुटुंबं, तर शहरी भागातल्या ९५ हजार कुटुंबांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं आहे.

या योजनेचे औरंगाबाद इथले लाभार्थी संदीप पाटील यांनी या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या - 


 मला आयुष्यमान भारत या योजनेमध्ये पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार. गरिबांच्या हितासाठी हि स्किम आहे. आणि भरपूर लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे. आज या शुभारंभाच्या दिवसी मला हे हेल्थ कार्ड भेटलं.

****



 लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते योजनेला सुरुवात झाली, जिल्ह्यातल्या दोन लाख कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.



 जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर आणि खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरु करण्यात आली.



 नांदेड इथं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यासह शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या योजनेचा काल शुभारंभ करण्यात आला. बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबादसह राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्येही या योजनेला काल प्रारंभ झाला.

****



 गणपती विसर्जन सोहळा काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. औरंगाबाद इथं, शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीपासून सकाळी अकरा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. खासदार चंद्रकांत खैरे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत गणपतीची आरती करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, निघालेल्या या मिरवणुकीत, यंदा ढोल पथकात महिला वादकांची संख्या लक्षणीय होती. रात्री बारा वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या मैदानावर मुख्य विसर्जन विहिरीवर, सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचं विसर्जन सुरू होतं.



 बीड जिल्ह्यात पावसाअभावी कोणत्याही प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नसल्यानं, कृत्रीम विहीरी तयार करुन विसर्जन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 परभणी इथं जलशुध्दीकरण प्रकल्पाजवळ महापालिकेच्या वती विसर्जनासाठी कृत्रीम हौद तयार करण्यात आला होता. या हौदात गणपती विसर्जन करण्यात आलं.



 जालना शहरात सकाळपासून मोती तलावावर गणेश विसर्जन सुरू होतं. घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी नगरपालिकेनं कृत्रिम हौदाचं नियोजन केलं होतं.



 लातूर जिल्ह्यात पारंपरिक वाद्यांच्या गजरात, गुलाला ऐवजी फुलांची उधळण करत, लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.



 नांदेड इथं गोदावरी आणि आसना नदीवर विविध ठिकाणी गणपती विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती. ऊमरी इथ विसर्जन मिरवणुकीतला डीजे बंद करण्यावरुन काही काळ मिरवणूक थांबवण्यात आली होती. हा एक अपवाद वगळला तर, जिल्ह्यात सर्वत्र शांततेत गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.  



 पुण्यातही गणेश विसर्जन शांततेत पार पडलं. मात्र काही गणेश मंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करत विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवत गणरायाचं विसर्जन केलं. तत्पूर्वी डीजेला परवानगी देण्यात येत नाही तोपर्यंत गणपती विसर्जन करणार नाही, असा पवित्रा पुण्यातल्या १२५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला होता.



 मुंबईत गणपती विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 गणेश विसर्जनादरम्यान काल अनेक ठिकाणी तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.



 जालना शहरातल्या मोती तलावात तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. अमोल रणमुळे, निहाल चौधरी, शेखर भदनेकर अशी त्यांची नावं आहेत.



 नांदेड जिल्ह्यात बिलोली इथ गणेश विसर्जन करतांना एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 शिर्डी इथं दोन तरुणांचा विर्सजनादरम्यान, प्रवरा नदीत बुडून मृत्यू झाल्याचं, वृत्त आहे.



 दरम्यान, रायगड जिल्ह्यात देवकुंड धबधबा पाहण्यासाठी आलेल्या तीन पर्यटकांचा बृडून मृत्यू झाला. माणगाव तालुक्यात पाटनस इथं ही दुर्घटना घडली. संदीप सिंग, सतिंदर लांबा आणि विश्वजित कुमार अशी या तिघांची नावं असून, हे तिघंही पुण्यातले रहिवासी आहेत.

****



 बुलडाणा जिल्ह्यात काल दोन वाहनांच्या अपघातात पाच जण ठार झाले. नागपूर - मुंबई महामार्गावर लोणार तालुक्यात काल पहाटे हा अपघात झाला. अपघातात मृत पावलेले सर्वजण वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातल्या भर जहागीर या गावचे रहिवासी होते. हे सर्वजण सिंदखेडराजा इथं गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजवण्यासाठी जात असताना, ही दुर्घटना घडली.

****



 दुबई इथं सुरू असलेल्या अशिया चषक क्रिक्रेट स्पर्धेत काल झालेल्या सुपर फोर फेरीच्या सामनात भारतानं पाकिस्तानवर नऊ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत सात बाद २३७ धावा केल्या. भारतानं कर्णधार रोहीत शर्मा आणि शिखर धवनच्या शतकी खेळीच्या जोरावर, चाळीसाव्या षटकात, विजयाला गवसणी घातली. ११४ धावा करणारा शिखर धवन सामनावीर ठरला. या विजयामुळे भारतानं स्पर्धेच्या अंतिम फेरीतलं आपलं स्थानही निश्चित केलं आहे.

दरम्यान, या फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात काल बांग्लादेशनं अफगाणिस्तानला तीन धावांनी पराभूत केलं. आता अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे.

****



 माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम पोटदुखे यांचं काल दुपारी नागपूर इथं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ते सलग चार वेळा लोकसभेवर निवडून आले होते. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात पोटदुखे यांनी अर्थराज्यमंत्री पद भूषवलं होतं. सुरुवातीच्या काळात त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम केलं होतं. सामाजिक कार्यासह, शिक्षण तसंच साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा सक्रीय सहभाग होता. आज चंद्रपूर इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

****



 चित्रपट निर्मात्या, दिग्दर्शक कल्पना लाजमी यांच्या पार्थिव देहावर काल मुंबई इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल मुंबई इथं कर्करोगानं निधन झालं, त्या ६१ वर्षांच्या होत्या. स्त्रियांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडणाऱ्या लाजमी यांनी, रुदाली, एकपल, चिंगारी, दमन यांसारख्या उत्तमोत्तम कलाकृतींचं दिग्दर्शन केलं होतं.

****



 ‘स्वच्छता ही सेवा’ या सध्या देशभर सुरू असलेल्या विशेष अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज नांदेड इथं स्वच्छता जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सकाळी नऊ वाजता ही फेरी निघणार आहे. कार्यशाळेनं फेरीचा समारोप होणार असून, या फेरीत सहभागी होण्याचं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेनं केलं आहे.

*****

*** 

No comments: