Tuesday, 25 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****



Ø गोरक्षणाशी संबंधीत हिंसा तसंच जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखवण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाचं, काटेकोर पालन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Ø तिहेरी तलाकसंदर्भात जारी अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल

Ø राज्यातल्या ३५ जिल्ह्यात आणि ३५५ तालुक्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियानाला सुरूवात

Ø जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून सुमारे दीडहजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग

आणि

Ø भारत - श्रीलंका महिलांच्या क्रिकेट संघादरम्यानची टी ट्वेंटी मालिका भारतानं जिंकली

****



 गोरक्षणाशी संबंधीत हिंसा रोखणं आणि जमावाकडून होणाऱ्या सामूहिक हत्या थांबवण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी काटेकोर पालन करण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या निर्देशांच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्व राज्यांकडून अहवाल मागवण्यात आला होता, मात्र आठ राज्यांचा अहवाल अद्याप मिळालेला नाही, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं या सुनावणी दरम्यान सांगितलं. जमावानं हिंसक होऊन कायदा हातात घेणं, म्हणजे कायद्याचं उल्लंघन आहे, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे.

****

 दाऊदी बोहरा मुस्लिम समाजातल्या अल्पवयीन मुलींच्या खतना करण्याच्या प्रथेला आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल पाच न्यायाधीशांच्या पीठाकडे सोपवली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि न्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांच्या पीठानं या जनहित याचिकेवर सुनावणी केली. या याचिकेमध्ये अल्पवयीन मुलांची खतना करणं कायद्याच्या विरोधात असून बाल अधिकार सामंजस्य तसंच जागतिक मानवाधिकाराच्या घोषणेविरूद्ध असल्याचं म्हटलं आहे.

****



 मुस्लिम समाजातल्या तिहेरी तलाकच्या प्रथेसंदर्भात सरकारनं नुकत्याच लागू केलेल्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. माजी नगरसेवक मसूद अन्सारी, रायझिंग व्हॉईस फाऊंडेशन ही बिगर सरकारी संस्था आणि विधीज्ञ देवेंद्र मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे. या अध्यादेशातल्या तरतुदी, बेकायदेशीर, निरर्थक, अयोग्य आणि मनमानी प्रकारच्या असल्याचं, या याचिकेत म्हटलं आहे. या अध्यादेशामुळे मुस्लिम पुरुषांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं, याचिकाकर्त्यांनी म्हटलं असून, या अध्यादेशातल्या, तिहेरी तलाकच्या कृतीला गुन्हा ठरवणाऱ्या तरतुदीला, स्थगिती द्यावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या अट्ठावीस तारखेला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

****



 दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीकरता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अरुण अडसड यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अडसड वगळता अन्य कोणीही या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, यासंदर्भात औपचारिक घोषणा होईल.

****



 राज्याच्या समृद्धीसाठी, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाला माहिती तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक सक्षम करणं गरजेचं आहे, असं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. महासंघाच्या अधिमंडळाची साठावी वार्षिक सभा काल मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना केंद्र बिंदू ठेवून आणि ग्रामीण भागाच्या विकासाकडे अधिक लक्ष देऊन महासंघानं काम करावं, असं आवाहन, देशमुख यांनी केलं. शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर स्वच्छता आणि श्रेणी निश्चित करण्याची यंत्र उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महासंघाचे व्यवस्थापकीय महासंचालक डॉक्टर योगेश म्हसे यांनी यावेळी दिली.

****



 राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कालपासून ९ ऑक्टोबरपर्यंत राज्यातल्या ३५ जिल्ह्यात आणि ३५५ तालुक्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियानाला सुरूवात झाली. ७१ हजार २९७ पथकांच्या सहाय्याने ही मोहीम राबवण्यात येत असून, १४ दिवसात सुमारे साडे आठ कोटी लोकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल मुंबईत दिली.

****



 पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये झालेली वाढ ही पूर्णतः राज्य आणि केंद्र सरकारनं लादलेल्या विविध करांमुळे झाली असून राज्य सरकारला जनतेबद्दल जराही सहानुभूती नाही, अशी टीका, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आजपर्यंतचं हे सर्वात असंवेदनशील सरकार आहे, असं सांगून त्यांनी केंद्र आणि राज्यसरकारच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून काल सकाळपासून एक हजार ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पैठण तालुक्यातल्या सिंचनासाठी आपेगाव अणि हिरडपुरी बंधाऱ्यातही पाणी सोडण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस न झाल्यामुळं खरीप हंगाम धोक्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे, पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. या विसर्गामुळे औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या चार जिल्ह्यातल्या अनेक गावांना आणि सुमारे ७० हजार हेक़्टर खरीप क्षेत्राला फायदा होणार आहे.

 ****



 भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला काल कोलंबो इथं झालेला चौथा सामना भारतानं जिंकला. नाणेफेक जिंकून भारतीय संघांनं प्रथम क्षेत्ररक्षण करत श्रीलंका संघाला एकशे चौतीस धावांवर रोखलं आणि प्रत्युत्तरात, आठ चेंडू बाकी असताना लक्ष्य गाठलं. पावसामुळे हा सामना प्रत्येकी सतरा षटकांचा करण्यात आला होता. या विजयाबरोबरच भारतानं पाच सामन्यांची ही मालिकाही जिंकली आहे. मालिकेतला शेवटचा सामना आज होणार आहे.



 दरम्यान, दुबई इथं सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान संघातही आज सामना होणार असून, या सामन्यातल्या विजेत्या संघासोबत भारताची अंतिम फेरीत लढत होणार आहे.

****



 औरंगाबाद इथं छावणी परिसरातल्या घरगुती तसंच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचं विसर्जन काल झालं. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जनाची प्रथा आहे. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

****



 गणेश विसर्जन करताना, जालन्यातल्या मोती तलावात बुडून मरण पावलेल्या तीन मुलांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत आणि वारसांना नोकरी देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मृतांच्या नातेवाईकांनी, पालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

****



 बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत, राज्यातल्या आणखी १२१ ग्रामपंचायतींना कार्यालयाची स्वतंत्र इमारत बांधण्याच्या तिसऱ्या टप्प्याला, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल मुंबई इथं  मंजूरी दिली. प्रत्येकी १२ लाख रुपये इतका निधी खर्च करून या इमारती उभारण्यात येणार आहेत. यात बीड जिल्ह्यातल्या नऊ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

****



 काँग्रेस पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा शाखेच्यावतीनं पुकारलेल्या एल्गार यात्रेला काल औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकातून सुरुवात झाली. जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, माजी आमदार कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या यात्रेत पक्षाचे जिल्हाभरातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. इंधन दरवाढीसह अन्य अनेक मुद्यांविरोधात या यात्रेतून गावपातळीवर चर्चा करण्यात येणार आहे.

****



 स्वच्छता ही सेवा या विशेष अभियानातर्गंत आज नांदेड जिल्ह्यात महाश्रमदान शिबीर घेण्यात येणार आहे. या महाश्रमदानात नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे. या विशेष पंधरवाड्यानिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीनं काल नांदेड शहरात स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली.

****



 जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावचा तलाठी अनिल चव्हाण याला एक हजार रुपयांची लाच घेताना जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. तक्रारदाराच्या फळपिकाची सातबाऱ्यावर नोंद करून देण्याकरता चव्हाण यानं ही लाच मागितली होती.

****



 यंदाचा मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द उद्योजक तथा परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर मुळे यांना औरंगाबाद इथं आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संध्याकाळी साडेपाच वाजता हा सोहळा होणार आहे.

****



 उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, सगळ्या प्रकल्पांमधली पाणी पातळी खालावली असून, खरिपाची पिकं वाया गेल्यात जमा आहेत, असं जनता दल सेक्युलर या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेवण भोसले यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी भोसले यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

****



 गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचं वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव आणि वाशिम तालुक्यासह अनेक ठिकाणी आगमन झालं. काल दुपारी जवळपास तासभर पाऊस झाला. या पावसाचा फायदा तूर पिकाला तसंच येणाऱ्या हंगामाला होणार असला तरी, काढणी झालेलं सोयाबीन तसंच कापून भिजून गेल्यानं नुकसान झालं असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

***

No comments: