Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
** व्याभिचार हा गुन्हा ठरवणारं कलम ४९७ रद्द करण्याचा सर्वोच्च
न्यायालयाचा निर्णय
** औरंगाबादच्या लेमन ट्री हॉटेलसह राज्यातल्या तीन संस्थांना
राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार
** राफेल विमान खरेदी व्यवहाराची
जनतेला माहिती द्यावी - काँग्रेसची मागणी
** प्रसिद्ध साहित्यिक कविता महाजन यांचं निधन
आणि
** ऑनलाईन कंपन्यांच्या निषेधार्थ
अखिल भारतीय व्यापारी महासंघाचा आज बंद
****
भारतीय दंड विधानातलं व्याभिचार हा गुन्हा ठरवणारं कलम
४९७ रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा
यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या पीठानं हा निर्णय दिला. पती हा पत्नीचा
मालक नसून, समाजात महिलांचं स्थान सर्वात वर आहे. महिला आणि पुरुषांना समाजात समान
अधिकार आहे. व्यभिचार हे घटस्फोटाचं कारण ठरू शकतं, मात्र,तो फौजदारी गुन्हा नाही,
असा निर्वाळा न्यायालयानं दिला आहे.
****
अयोध्या जमीन वादविवाद प्रकरणी येत्या २९ ऑक्टोबरपासून
सर्वोच्च न्यायालयात नव्यानं सुनावणी सुरु होणार आहे. काल न्यायालयानं, मशीद हा इस्लामचा
अविभाज्य घटक आहे की नाही हा मुद्दा घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका, फेटाळून
लावली आहे.
****
उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि उच्चशिक्षित मंडळींचा मतदानासाठी
अनुत्साह ही चिंतेची बाब असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी म्हटलं
आहे. ते काल नवी मुंबईत एका कार्यशाळेत ते बोलत होते. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे,
असं सांगतानाच निवडणुकांमध्ये पैसा आणि सामाजिक संपर्क माध्यमांचा दुरुपयोग रोखण्याचं
आव्हान आपणा सर्वांना पेलायचं आहे,
असं सहारिया म्हणाले.
****
उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र, देशात अग्रेसर असल्याचं
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत एका परिषदेत बोलत होते.
उत्पादन क्षेत्रासाठी राज्य शासन सुविधा उपलब्ध करून देत असून, विविध कंपन्यांनी राज्यात
आपली गुंतवणूक वाढवावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितल्या
राज्य महामार्ग, राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरच्या खड्ड्यांच्या तक्रारींसाठी
सार्वजनिक बांधकाम विभागानं डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा पी डब्ल्यू डी डॉट कॉम
या संकेतस्थळावर तक्रार यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.नागरिकांनी खड्डे असलेल्या रस्त्यांची
माहिती, फोटो या संकेतस्थळावर अपलोड करावेत, जेणेकरून त्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात
येईल, असं आवाहन विभागानं केलं आहे.
****
पर्यटन क्षेत्राच्या
विकासात योगदान देणाऱ्या राज्यातल्या दोन हॉटेल आणि एका संस्थेला काल केंद्रीय
पर्यटन मंत्री के. जे. अल्फॉन्स यांच्या हस्ते राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार देऊन
सन्मानित करण्यात आलं. यामध्ये औरंगाबाद शहरातलं लेमन ट्री आणि मुंबईतल्या
मेलुहा-द- फर्न ही दोन हॉटेल तसंच ‘ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा समावेश आहे. काल
दिल्लीत, हे राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
****
राफेल विमान खरेदी प्रकरणी संयुक्त
संसदीय समितीची तत्काळ बैठक बोलावून, जनतेला या व्यवहाराची माहिती द्यावी अशी मागणी
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे
केली आहे. काल मुंबईत काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी खरगे बोलत
होते. संयुक्त संसदीय समिती मार्फत या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यास सरकार घाबरत
आहे. त्यामुळे जो पर्यंत पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत
हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं यावेळी पक्षातर्फे सांगण्यात आलं. दरम्यान, पक्षाच्या
शिष्टमंडळानं काल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन, आपल्या मागण्याचं निवेदन
सादर केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
स्त्री अस्मितेचा हुंकार मांडणाऱ्या प्रसिद्ध साहित्यिक
कविता महाजन यांचं काल निधन झालं. त्या ५१ वर्षांच्या होत्या. न्युमोनियामुळे आजारी
असलेल्या महाजन यांच्यावर पुण्यातल्या खाजगी इस्पितळात उपचार सुरू होते. काल उपचारादरम्यान
त्यांचं निधन झालं. त्यांच्या ब्र, भिन्न, ठकी आणि मर्यादित
पुरुषोत्तम, जोयानाचे रंग, या कादंबऱ्यांसह कुहू हा दृकश्राव्य लेखसंग्रह, ‘तत्पुरुष’,
‘धुळीचा आवाज’ यासह अनेक कवितासंग्रह, प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांनी वारली लोकगीतांचं
संकलन-संपादन केलं, विविध भाषांमधल्या अनेक कथा कविता संग्रहांचे अनुवाद केले तसंच
वृत्तपत्रातून विविध विषयांवर स्तंभलेखनही केलं. साहित्य क्षेत्रातल्या योगदानासाठी
त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. इस्मत चुगताई यांच्या लघुकथांचा अनुवाद
असलेल्या रजई या त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमीनं भाषांतरासाठीचा पुरस्कार देऊन
गौरवलं होतं. महाजन यांच्या निधनानं साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
****
ऑनलाईन कंपन्यांच्या निषेधार्थ अखिल
भारतीय व्यापारी महासंघानं आज बंद पुकारला आहे.
देशभरातले सात कोटी व्यापारी तसंच २० हजार व्यापारी संघटना या बंद सहभागी होत
आहेत. वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार आणि ऑनलाईन कंपन्यांमुळे पारंपारिक किरकोळ व्यापार
संकटात आला आहे, यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार धोरण आखत नसल्याचं महासंघानं म्हटलं
आहे. औरंगाबाद जिल्ह्यातली सुमारे
५० हजार व्यापारी प्रतिष्ठानं या
बंदमध्ये सहभागी होत आहेत. ऑनलाईन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांनी स्वतंत्र बंद पुकारला आहे. त्यामुळे
आज औषध दुकानंही बंद राहण्याची शक्यता आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि
बांगलादेश संघादरम्यान होणार आहे. दुबई इथं आयोजित या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी
पाच वाजता सुरुवात होईल. भारतानं आतापर्यंत सहा वेळेस आशिया चषक जिंकला आहे.
****
नाशिक
जिल्ह्यातल्या अंबड इथले रमेश आहेर यांनी आपला सायकल दुरुस्तीचा व्यवसाय वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवलं. यामुळे
आपल्या उत्पन्नात वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
वीस वर्षांपासून मी हा व्यवसाय करतो. मला हे दुकान वाढवायचे
होते.माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.मी अनेक राष्ट्रीयकृत बँकेत गेलो.पण कर्ज
मिळाले नाही.केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेची माहिती मिळाली.कमीत कमी कागदपत्रात मला
मुद्रा लोनतर्फे ७५ हाजार रूपये कर्ज मिळाले.
यामुद्रा लोन मुळे माझा व्यवसाय वाढला आहे.आणि मी आता गाडी रिपेअरींगचे दुकान चालू
केले आहे.
****
केंद्र सरकारच्या अजिंठा आणि वेरुळ लेणी संवर्धनाच्या
तिसऱ्या टप्प्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही,
खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. औरंगाबाद इथं काल जागतिक पर्यटन दिनानिमित्त
पर्यटन विभागाच्या वतीनं आयोजित हस्तकला प्रदर्शन आणि सांस्कृतिक मेळाव्यात ते बोलत
होते. १६ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या पर्यटन पर्वाचा काल समारोप झाला. या दरम्यान
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका
अभियानाअंतर्गत परभणी महापालिकेच्या वतीनं काल संदेश फेरी काढण्यात आली. महापौर मीना
वरपूडकर यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी स्वच्छता अभियानाचीही सुरुवात
करण्यात आली.
****
बीड तालुक्याच्या वांगी इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या
मुलांना काल दुपारी माध्यान्ह भोजनानंतर उलट्यांचा त्रास सुरु झाला. ७५ विद्यार्थ्यांना
जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं जिल्हा
शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितलं.
****
नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी
डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम तसंच विभागीय स्तरावरील प्रशिक्षण
आणि चर्चासत्राचं काल नांदेड इथं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रकल्पाद्वारे फेरफार
ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्यानं शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम कमी होतील असं जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी यावेळी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक
कर्ज मिळावं या मागणीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेसमोर शेतकऱ्यांनी कालपासून
बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. या संदर्भात २४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर
यांना निवेदनही देण्यात आलं आहे.
****
राज्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. मुंबईत काल संध्याकाळी
पावसानं हजेरी लावली. जालना शहर आणि परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा
पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या लिंबाला, पाचेगाव, वडधूती, मानधनी,
आडगाव आदि भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
****
रक्तदानाबाबत जनजागृती होण्यासाठी येत्या एक ऑक्टोबर रोजीच्या
‘ऐच्छिक रक्तदान दिना’ निमित्त औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय
- घाटीच्या विभागीय रक्तपेढीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
प्राध्यापक राजन बिंदु यांनी काल औरंगाबाद इथं ही माहिती दिली. संपूर्ण ऑक्टोबर महिना
स्वेच्छा रक्तदान महिना म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
//**********//
No comments:
Post a Comment