Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी देशात स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेबाबत शाश्वत विकासाचं ध्येय साध्य
करण्याचं आवाहन केलं आहे. ते आज नवी दिल्लीत चार दिवसीय ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय
स्वच्छता परिषदे’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. चांगले शौचालय, आरोग्यसोयी आणि स्वच्छतेअभावी
जगण्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असंही ते यावेळी म्हणाले. मुलांना चांगले आरोग्य
पुरवण्यासाठी स्वच्छ भारत मोहीम अतिशय महत्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले. देशामध्ये २०३०
पर्यंत आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सोयी निर्माण करणं हे देशासमोर मोठं आव्हान
असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं.
****
स्वामी
विवेकानंदांनी सांगितलेल्या तत्वांची अंमलबजावणी होण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमधून
त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार होणं गरजेचं असल्याचं राज्यपाल सी विद्यासागर राव
यांनी म्हटलं आहे. शिकागो इथल्या धार्मिक संसदेत स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक
भाषणाच्या १२५व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई इथं आज रामकृष्ण मिशनद्वारे आयोजित कार्यक्रमात
ते बोलत होते. देशाचे भावनात्मक ऐक्य आणि अखंडता राखण्यासाठी विवेकानंदांच्या कल्पनांना
समजावून घ्यावं लागेल असंही ते यावेळी म्हणाले.
****
मराठवाड्यातल्या
विविध विकास कामांचा आराखडा राज्यपालांना सादर करणार असल्याचं, मराठवाडा वैधानिक विकास
मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद इथं आज मंडळाच्या सर्वसाधारण
बैठकीत ते बोलत होते. सरकारच्या विविध योजना मराठवाड्यात प्रभावीपणे राबवून मराठवाड्याला
विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी मराठवाडा विकास मंडळ प्रयत्न करत असल्याचं कराड यांनी
सांगितलं.
****
औरंगाबाद
शहरात उद्भवलेल्या कचरा प्रश्नामुळे शहर विकासाचे प्रश्न मागे पडले असल्याचं मत महापौर
नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं आज ‘शहरातील घनकचरा समस्या आणि
व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित एक दिवसीय आंतरविद्याशाखीय चर्चासत्रात ते बोलत होते.
कचराप्रश्न अंतिम टप्प्यात असून तो लवकरात लवकर सुटण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा
असल्याचंही महापौर यावेळी म्हणाले. निवृत्त सनदी अधिकारी कृष्णा भोगे या चर्चासत्राच्या
अध्यक्षस्थानी होते.
****
भारतीय
लष्करानं २०१६ मध्ये आजच्या दिवशी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ अर्थात ‘लक्ष्यभेदी
कारवाई’ला आज दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सर्वत्र शौर्य दिन साजरा करण्यात
आला. औरंगाबादच्या जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीनं जिल्ह्यातल्या माजी सैनिक, शहिद
सैनिकांच्या विधवा आणि कुटुंबियांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संविधान संरक्षणाचं कार्य सैन्यदल करत असल्याचं प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजीव
जाधवर यांनी यावेळी केलं. भारतीय सैन्यामुळेच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा लाभ देशातले
नागरिक घेत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
साहित्यिकांनी
समाजाला विकृतीकडून संस्कृतीकडे नेण्याचं काम केलं पाहिजे, असं जेष्ठ कवयित्री सिसिलिया
कार्व्हालो यांनी म्हटलं आहे. लातूर इथं आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आयोजित
केलेल्या सतराव्या राज्यस्तरीय ‘प्रतिभा संगम साहित्य संमेलना’चं उद्घाटन कार्व्हालो
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानावरुन बोलताना पालकमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांनी, तरुणांनी सामाजिक माध्यमांसाठी किती वेळ द्यायचा याचा
गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली असल्याचं मत व्यक्त केलं. दोन दिवस चालणाऱ्या या
साहित्य संमेलनाच्या ठिकाणाला ‘ग.दी.माडगुळकर नगरी’ नाव देण्यात आलं आहे. संमेलनाच्या
पहिल्या सत्रात कवयित्री कविता महाजन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र
आणि गोवा राज्यातून विद्यार्थी साहित्यीक या संमेलनाला उपस्थित असल्याची माहिती संमेलनाचे
निमंत्रक प्रसाद जाधव यांनी दिली.
****
हिंगोली-नांदेड
रस्त्यावर कळमनुरी तालुक्यातल्या पारडी जवळ अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या
अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. जखमी
दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर हिंगोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ४८वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
ज्येष्ठ
हार्मोनियमवादक पंडित तुळशीदास बोरकर यांचं आज मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं, ते
८३ वर्षांचे होते. १९५० ते १९८० च्या दशकात बोरकरांनी संगीत नाटकात ऑर्गनवर साथ केली
होती. बोरकर हे पद्मश्री पुरस्काराबरोबरच विविध पुरस्कारांनी
सन्मानित आहेत.
****
No comments:
Post a Comment