Thursday, 27 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.09.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७   ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातल्या काजीगुंड क्षेत्रात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. आज सकाळी ही चकमक झाली. या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं शोधमोहीम सुरु केली. बडगाम जिल्ह्याच्या पंजन क्षेत्रातही आज सकाळपासून चकमक सुरु आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘संयुक्त राष्ट्रसंघाचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थपुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांना धोरणात्मक नेतृत्व श्रेणीअंतर्गत हा पुरस्कार दिल्याचं संयुक्त राष्ट्र पर्यावरण विभागानं सांगितलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर सौर ऊर्जेच्या वापरासाठी या दोन्ही नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यंदा पुरस्काराचं तेरावं वर्ष आहे. राजकीय नेते, नागरिक तसंच खाजगी क्षेत्रांनी पर्यावरणाबाबत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

****



 औरंगाबाद शहरानजिक, नायगाव फाट्यापासून केंब्रिज शाळेकडे जाणाऱ्या सावंगी वळण रस्त्यावर तीन ट्रकच्या अपघातात काल दोन जण ठार तर अन्य चार जण जखमी झाले. दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्यावर, मागून येणारा ट्रकही अपघातग्रस्त ट्रकवर धडकल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस मध्ये अत्याधुनिक एल. एच. बी. डबे जोडण्यात आले आहेत. आरामदायक असलेले हे कोच, अधिक सुरक्षित असल्याचं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****



 लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीबाबत पालिकेनं केलेली कार्यवाही सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवली आहे. या निर्णयामुळे मनपाच्या महासभेत झालेली स्थायी समितीच्या सदस्यांची निवड आणि शैलेश गोजमगुंडे यांची सभापतीपदी झालेली निवड कायम झाली आहे. पाच सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयानं ही निवड रद्द ठरवली होती. भारतीय जनता पक्षानं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल होतं.
*****
***

No comments: