Friday, 28 September 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.09.2018....Evening Bulletin

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी देशभरातून पाच कार्यकर्त्यांना अटक केल्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला, या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. पोलिसांनी सादर केलले पुरावे नक्षलींशी संबंधित असून, यासंदर्भात आणखी पुरावे सादर करुन अटक केलेल्या पाच जणांचा ताबा घेऊ, असंही मुख्यमंत्री म्हणाले. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. देशाविरोधी षडयंत्र रचणारे, तसंच समाजात तेढ निर्माण करणारे नक्कीच गजाआड जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे पोलिसांची भूमिका योग्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरासाठीची प्रणाली विकसित करण्याचं आवाहन केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी उद्योग जगताला केलं आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे, असं सांगत या समस्येचा निपटारा करण्यासाठी समाजानं प्रयत्न करायला हवेत, त्यासाठी जनआंदोलन उभं राहायला हवं असं ते म्हणाले. प्लास्टिक पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापनावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते.
****
पोषण अभियानाचा योग्य परिणाम मिळण्यासाठी या अभियानास चळवळीचं रुप मिळणं आवश्यक असून, यासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला, मुंबईत आज या उपक्रमाचा समारोप झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. नवभारताच्या निर्माणासाठी कुपोषणाचं समूळ उच्चाटन होणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. 
****
राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावानं दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
प्रसिद्ध साहित्यिक कविता महाजन यांच्या पर्थिव देहावर आज सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाजन यांचं काल रात्री अल्पशा आजारानं निधन झालं, त्या ५१ वर्षांच्या होत्या. कविता महाजन यांच्या निधनानं मराठी साहित्यात स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख प्रस्थापित करणारी एक महत्त्वाची लेखिका आणि समाज जीवनावरच्या प्रभावी भाष्यकार आपण गमावल्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांच्यात झालेल्या कराराविरोधात आणि आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय व्यापारी संघानं पुकारलेल्या बंदला औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारपेठा बंद होत्या, त्यामुळे उलाढाल ठप्प होती. लातूर इथंही व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून, व्यापारी महासंघानं शहरातून मूक मोर्चा काढला.   
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांनीही आज स्वतंत्र बंद पुकारला आहे. उस्मानाबाद इथं या बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं.
जालना जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड इथं औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं.
****
परभणी इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी उच्चस्तरीय समितीनं आज जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. परभणी इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती, त्या पार्श्वभूमीवर शासनानं या समितीची स्थापना केली आहे. दोन दिवसांच्या पाहणीनंतर ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
****
लातूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रतिभा संगम या सतराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आज ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडी मध्ये विविध वेषभुषा केलेले विद्यार्थी, घोडेस्वार लक्ष वेधून घेत होते. शहरातल्या विविध शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी, प्राध्यापक, साहित्यिक यात सहभागी झाले होते. महापौर सुरेश पवार, मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य रामचंद्र तिरुके, उपमहापौर देवीदास काळे यावेळी उपस्थित होते. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन उद्या कवयित्री सीसिलिया काव्हरलो यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित राहणार आहेत. 
****
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा-भोगाव रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांना घेवून जाणाऱ्या बसला आज सकाळी अपघात झाला. या अपघातात दहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. खराब रस्त्यामुळे हा अपघात घडल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.
****

No comments: