Monday, 24 September 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 24.09.2018 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24  September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष संरक्षण पथक, अर्थात एसपीजीच्या प्रमुखांबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा, एसपीजीचे माजी संचालक विवेक श्रीवास्तव यांनी इन्कार केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं निवडलेल्या व्यक्तींचा या पथकात अधिकारी म्हणून समावेश करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. यावर, आपलं राहुल गांधींशी कधीही अशा प्रकारचं बोलणं झालं नसल्याचं श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे, तर, पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्या या पथकाबाबत राहुल गांधी यांनी केलेलं हे वक्तव्य निराधार, तथ्यहीन आणि दुर्दैवी असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

मुस्लिम समाजातल्या तिहेरी तलाकच्या प्रथेसंदर्भात सरकारनं नुकत्याच लागू केलेल्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. माजी नगरसेवक मसूद अन्सारी, रायझिंग व्हॉईस फाऊंडेशन ही बिगर सरकारी संस्था आणि विधीज्ञ देवेंद्र मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली असून, या अध्यादेशातल्या तरतुदी ह्या बेकायदेशीर, निरर्थक, अयोग्य आणि मनमानी प्रकारच्या असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. यामुळे मुस्लिम पुरुषांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं असून, या अध्यादेशातल्या, तिहेरी तलाकच्या कृतीला गुन्हा ठरवणाऱ्या तरतुदीला स्थगिती द्यावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या अट्ठावीस तारखेला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

****

दिवंगत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीकरता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अरुण अडसड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह भाजपचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अडसड वगळता अन्य कोणीही या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून औपचारिक घोषणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होईल.

****

राज्याच्या समृद्धीसाठी, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाला माहिती तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक सक्षम करणं गरजेचं आहे, असं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. महासंघाच्या अधिमंडळाची साठावी वार्षिक सभा आज मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते.कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर स्वच्छता आणि श्रेणी निश्चित करण्याची यंत्र उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महासंघाचे व्यवस्थापकीय महासंचालक डॉक्टर योगेश म्हसे यांनी यावेळी दिली.

****

काँग्रेस पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा शाखेच्यावतीनं पुकारलेल्या एल्गार यात्रेला आज औरंगाबाद शहरात क्रांती चौकातून सुरुवात झाली. जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, माजी आमदार कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या यात्रेत पक्षाचे जिल्हाभरातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. इंधन दरवाढीसह अन्य अनेक मुद्यांविरोधात या यात्रेतून गावपातळीवर चर्चा करण्यात येणार आहे.

****

काल गणेश विसर्जन करताना, जालन्यातल्या मोती तलावात बुडून मरण पावलेल्या तीन मुलांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत आणि वारसांना नोकरी देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिल्यानंतर नातेवाईकांनी मुलांचे मृतदेह स्वीकारल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.या नातेवाईकांनी आज पालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

****

माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या निधनानं विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा एक महत्त्वाचा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावचा तलाठी अनिल चव्हाण याला एक हजार रुपयांची लाच घेताना जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज अटक केली. तक्रारदाराच्या फळपिकाची सातबाऱ्यावर नोंद करून देण्याकरता चव्हाण यानं ही लाच मागितली होती.

****

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात एक जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी यावेळी संवाद साधला, तसंच, संबंधित कुटुंबियांना शासकीय योजनांचे लाभ त्वरित मिळवून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

//************//








No comments: