Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26
September 2018
Time 1.00
to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६
सप्टेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
आधार योजना घटनात्मक दृष्ट्या वैध
तसंच सुरक्षित असून, बनावट आधारपत्र तयार होणं शक्य नसल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं
व्यक्त केलं आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षते खालील पाच न्यायाधीशांच्या
घटनापीठानं आज आधार संदर्भात दाखल विविध याचिकांवर सुनावणी दरम्यान हे मत नोंदवलं.
मात्र शैक्षणिक संस्थांना शाळेसह विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आधार पत्र अनिवार्य
करता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दूरसंचार सेवा किंवा बँकेत बचत
खाते उघडण्यासाठी आधार पत्र बंधनकारक करता येणार नाही, मात्र आयकर विवरणपत्र तसंच पॅन
- कायम खाते क्रमांकासाठी मात्र आधार बंधनकारक असेल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांना,
सरकारी नोकरीत पदोन्नतीसाठी आरक्षणा संदर्भात, २००६ च्या निर्णयावर, सात न्यायाधीशांच्या
घटनापीठाकडून पुनर्तपासणीची आवश्यकता नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश
दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं, आरक्षणाचा लाभ
देण्यासाठी अनुसूचित जाती जमातीच्या एकूण लोकसंख्येचा विचार करावा, अशी मागणी करणारी
याचिका फेटाळून लावली. असं आरक्षण देण्यासाठी राज्यसरकारांना या प्रवर्गाच्या मागासलेपणासंदर्भात
संपूर्ण आकडेवारी सादर करण्याची आवश्यकता नसल्याचं, न्यायालयानं नमूद केलं.
****
संरक्षण खरेदी परिषदेनं लष्कराच्या
टी-७२ रणगाड्यांसाठी एक हजार इंजिनांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. यासाठी तेवीसशे कोटी
रूपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. या इंजिनांमुळे
या रणगाड्यांची क्षमता वाढेल आणि युद्धकाळात ते अधिक प्रभावीपणे काम करू शकतील असं, संरक्षण
मंत्रालयानं म्हटलं आहे. यातल्या बहुतेक इंजिनांचं उत्पादन, आयुध
कारखाना मंडळातर्फे केलं जाणार आहे. संरक्षण खरेदी प्रक्रियेतल्या नियमांमध्ये
सुधारणा करण्यालाही या परिषदेनं मंजुरी दिली. संरक्षणसंबंधी खरेदीसाठी लागणारा वेळ
कमी करण्याबरोबरच ती प्रकिया अधिक सोपी करण्याच्या हेतूनं या नियमांमध्ये सुधारणा करण्यात
आली आहे.
****
भारतीय
सैन्यानं सीमारेषेजवळ २८
सप्टेंबर २०१६ रोजी
केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा दुसरा स्मृतीदिन ‘पराक्रम पर्व’ म्हणून
साजरा करण्यात येणार आहे. सैन्याचं धैर्य, आणि
त्याग यांच्या सन्मानार्थ येत्या शुक्रवारपासून रविवारपर्यंत पराक्रम पर्व साजरं होईल. कार्यक्रमाचा
मुख्य सोहळा दिल्लीत इंडिया गेट आणि राजपथ इथं आयोजित केला आहे. संरक्षणमंत्री
निर्मला सीतारामन या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. देशातल्या
५१ शहरात एकूण ५३
ठिकाणी पराक्रम पर्वचं आयोजन करण्यात
आलं आहे.
****
पंजाब
नॅशनल बँक घोटाळ्यातला मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला
फरार घोषित करण्याच्या सक्तवसुली संचालनालयाच्या मागणीवर मुंबईच्या विशेष न्यायालयानं
नीरव मोदीकडून २९ ऑक्टोबरपर्यंत उत्तर मागितलं आहे. विशेष न्यायाधीशांना आर्थिक
गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याखाली नीरव मोदीला समन्स
जारी केलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑक्टोबरला होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० सप्टेंबरला
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा
हा ४८वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा
कार्यक्रम प्रसारित होईल.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या ५३ ग्रामपंचायतींसाठी आज
मतदान होत आहे. यात नंदुरबार तालुक्यातल्या २०, शहादा तालुक्यातल्या २२, नवापुर तालुक्यातल्या
पाच, तळोदा तालुक्यातल्या चार, तर अक्कलकुवा तालुक्यातल्या दोन ग्रामपंचायतींचा समावेश
आहे. ५३ ग्रामपंचायतींमध्ये लोकनियुक्त सरपंच पदासाठी १७४, तर सदस्य पदासाठी ७५६ उमेदवार
निवडणूक रिंगणात आहेत.
****
सातारा जिल्ह्यातल्या पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावर
आंबेनळी घाटात आज सकाळी दरड कोसळल्यानं या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरड
हटवण्याचं काम सुरू झालं नसल्यानं घाटमार्गातली एकेरी वाहतूक कायम ठेवण्यात आली असून,
जड वाहनांना घाटात प्रवेशबंदी लागू करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यातल्या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी निर्माण करण्यात
आलेल्या कल्याणकारी मंडळाचं कामकाज गतीनं सुरु करावं, तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी
काल परभणी इथं वृत्तपत्र विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. असंघटीत कामगार
म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी तत्काळ सुरु करा, कल्याणकारी मंडळासाठी आर्थिक
तरतूद करावी, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन करावं, घरकुल
योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव जागा ठेवाव्या, आदी मागण्यांचं निवेदन यावेळी
प्रशासनाला देण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment