आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
देशाच्या विविध भागात आज अशूरा-ए मोहरम पाळला जात आहे. हा
दिवस मोहम्मद पैंगंबरचे नातू हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करबला इथं सत्य, न्याय
आणि प्रामाणिकरणासाठी दिलेल्या बलिदानाप्रीत्यर्थ पाळला जातो. यानिमित्त
ताबूतांच्या मिरवणूका निघतात तसंच धार्मिक बैठकाही आयोजित केल्या जातात. देशातल्या काही भागात काल मोहरम साजरा करण्यात आला.
मोहरम सणानिमित्त आज औरंगाबाद इथं ‘यौम ए आशुरा’ साजरा केला जाणार आहे. आशुऱ्यानिमित्त
ढोल-ताश्यांच्या गजरात शहरातून सवाऱ्यांचा मजमा आणि मातमी मिरवणूक काढली जाणार आहे.
****
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळानं संपादित केलेल्या
जमिनीच्या मिळकतीवर आयकर विभाग कर आकारू शकत नसल्याचा महत्वपूर्ण निकाल आयकर
न्यायाधिकरणानं दिला आहे. या निर्णयामुळे एमआयडीसीला मोठा दिलासा मिळाला असून आयकर
विभागानं महामंडळाकडून वसूल केलेले ३९५ कोटी रुपये १२ टक्के व्याजानं परत करावे
लागणार आहेत. तसंच मागील दहा वर्षांची नऊ हजार कोटींची वसुलीही रद्द होणार आहे. या
निकालाचा महाराष्ट्राच्या शासन पुरस्कृत सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, अशा
अन्य महामंडळांना फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे इतर राज्यांनाही या निर्णयाचा लाभ
होणार आहे. या न्यायालयीन प्रक्रियेच्यावेळी महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री
सुभाष देसाई यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं.
****
हिंगोली ते वाशिम मार्गावर कलगाव पाटीजवळ भरधाव ट्रकनं
जीपला धडक दिल्यानं झालेल्या अपघातामध्ये सहा जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मध्यरात्री हा अपघात झाला. या अपघातातील मृत सहा जण हे वाशिम जिल्हातल्या आडगाव इथले
रहिवासी होते. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड इथं नेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथल्या टेम्भे गणेशाची काल
एकादशीच्या दिवशी मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या गजरात प्रतिष्ठापना करण्यात आली.
देशात गणेशाची स्थापना भाद्रपद चतुर्थीला होते
परंतु ११८ वर्षांची परंपरा असलेल्या या गणेशाची स्थापना एकादशीला होते आणि विसर्जन
प्रतिपदेला म्हणजे अनंत चतुर्थी नंतर दोन दिवसांनी होतं.
//**********//
No comments:
Post a Comment