Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
केंद्रीय
मंत्रिमंडळानं आज साखर उद्योगासाठी साडेचार हजार कोटी रूपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली
आहे. २०१७-१८ च्या हंगामात देशात साखरेचं ३२ दशलक्ष टन इतकं विक्रमी उत्पादन झालं आहे.
या अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच २०१८-१९ या वर्षात पाच दशलक्ष
टन साखर निर्यात करण्यासाठी कारखान्यांना अनुदान देण्याच्या हेतूनं, हे पॅकेज मंजूर
करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय
डिजिटल संचार धोरण या नवीन दूरसंचार धोरणालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
या धोरणाअंतर्गत शंभर अब्ज डॉलरची गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा उद्देश असून, २०२२ पर्यंत
४० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
जीएसटी नेटवर्कला सरकारी मालकीच्या कंपनीमध्ये रुपांतरीत
करण्यालाही आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री
अरुण जेटली यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. याच्यात केंद्र सरकार आणि
राज्य सरकारांची ५० - ५० टक्के भागीदारी राहील, असं त्यांनी सांगितलं.
****
अनुसूचित
जाती-जमातीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षणाचा कोटा ठेवण्यासाठी त्यांच्या मागासलेपणाची
पुष्टी करणारी आकडेवारी राज्यांनी गोळा करण्याची गरज नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं
म्हटलं आहे. राज्यात मागसलेपणा असल्याचं आणि योग्य प्रतिनिधीत्व नसल्याचं, राज्य सरकारनं
यापूर्वीच मान्य केलं असल्यामुळे, राज्यात आता बढतीमधला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला
आहे अशी प्रतिक्रिया, या प्रकरणांमधले याचिकाकर्ते आमदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त
केली आहे.
****
महाराष्ट्राच्या
विविध भागांमधून गेल्या महिन्यात जप्त करण्यात आलेल्या अवैध शस्त्रं प्रकरणी
मुंबईतल्या सत्र न्यायालयानं चार संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लीलाधर
लोधी आणि वासुदेव सुर्यवंशी या दोघांना दहशतवाद विरोधी पथकानं जळगाव जिल्ह्यातून
अटक केलं होतं तर पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी भारत कुरणे आणि सुजीथ कुमार या
दोघांना अटक केल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आलं होतं.
****
मराठवाड्यात
तातडीनं मंत्रीमंडळाची बैठक बोलावून दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी
कॉंग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या सक्षमीकरण संकल्प मेळाव्यात बोलत होते. सरकारनं कर्जमाफीची
फक्त घोषणा केली, त्याचा अद्यापही अनेकांना लाभ मिळालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पवार यांनी यावेळी सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे, आमदार राजेश टोपे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम
कोते पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.
****
जाती-धर्मांच्या
पलीकडे आपण माणूस म्हणून एक आहोत आणि आपल्यामधले प्रेम कायम राहण्यासाठी युवकांनी प्रयत्नशील
राहण्याचं आवाहन अभिनेता सुबोध भावे यांनी केलं आहे. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत ‘केंद्रीय युवा महोत्सवा’च्या उदघाटनाप्रसंगी ते आज बोलत
होते. युवक महोत्सवात भाग घेणं हा विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा पुरस्कारचं असल्याचंही
ते म्हणाले. यावेळी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तसंच अभिनेते उमेश जगताप यांनी, विद्यार्थ्यांना
कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड न बाळगण्याचं आवाहन केलं. ग्रामीण भागातून आपण आलो यात
कलावंतांनी कमीपणा मानू नये असंही त्यांनी सांगितलं. या चार दिवसीय युवा महोत्सवात
मराठवाड्यातले विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी कलावंत सहभागी झाले आहेत.
****
परभणी
शहरात आज काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांतर्फे सरकारच्या धोरणाविरोधात
मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली
निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
करण्यात आली. पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ कमी करावी, राफेल लढाऊ विमान खरेदी घोटाळ्याची
संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात
आलं.
****
औरंगाबाद
इथं येत्या ३० सप्टेंबरला राज्यस्तरीय धनगर एल्गार मेळावा आणि मेंढपाळ हक्क परिषदेचं
अयोजन करण्यात आलं आहे. जय मल्हार सेनेचे लहुजी शेवाळे यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर
परिषदेत ही माहिती दिली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी,
तसंच राज्यातल्या मेंढपाळांच्या समस्यांसंदर्भात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं
असून, यावेळी राज्यभरातून एक लाख मेंढपाळ आणि धनगर समाज प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचंही
त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment