Thursday, 20 September 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 20.09.2018 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

केंद्र सरकारनं वेगवेगळ्या अल्पबचत योजनाच्या व्याज दरावाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी हे वाढीव दर असतील. अर्थ मंत्रालयानं ट्विटरवरुन ही माहिती दिली. अल्प बचत योजना, ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजना आणि पाच वर्षाच्या आवर्ती ठेवीवरच्या व्याजदरात शून्य पूर्णांक चार टक्के तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी - पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांचा व्याजदर आठ टक्के करण्यात आला आहे. सध्या हा व्याजदर सात पूर्णांक सहा टक्के होता. किसान विकास पत्रावर सात पूर्णांक सात टक्के व्याज देण्यात येईल. खास मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवर आठ पूर्णांक पाच टक्के व्याज देण्यात येईल, याआधी हा व्याजदर आठ पूर्णांक एक टक्के होता. एक ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर शून्य पूर्णांक तीन टक्के जास्त व्याज मिळणार आहे.

****

आगामी निवडणुकांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसशी युती करण्याचा प्रयत्न कर, असं भारतीय रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. याआधी भारिपनं आगामी निवणुडकांसाठी एमआयएम या पक्षाशी युती केली आहे. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल नवी दिल्लीत संघाच्या कार्यक्रमात केलेलं भाषण हे जनतेची दिशाभूल करणारं असल्याची टीका आंबेडकर यांनी यावेळी  केली.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनतीनं काम करुन पक्षाला राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनवण्याचं आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. कार्यकर्त्यांना आज दिलेल्या संदेशात पाटील यांनी, राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पक्षाला मजबुत करणं आणि महिला सशक्तीकरणावर भर दिला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पक्षात स्थान दिलं जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आदिवासी, अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्यांक समुदायांच्या कल्याणासाठी कटीबद्ध असल्याचं पाटील यांनी नमूद केलं.    

****

पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक केलेल्या पाच मानवतावादी कार्यकर्त्यांच्या स्थानबद्धतेबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज राखून ठेवला आहे. आज यासंदर्भात दोन्ही बांजूचा युक्तिवाद संपला, मात्र न्यायालय याबाबत पुढच्या आठवड्यात निकाल देणार असून, तोपर्यंत पाचही जणांची स्थानबद्धता कायम ठेवण्यात आली  आहे.

****

ऊसाची थकीत रास्त आणि किफायतशीर मूल्य - एफआरपी रक्कम व्याजासकट मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज सोलापूर इथं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाला परवानगी नसल्यानं पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी देशमुख यांच्या स्वीय सहायकाला आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.

****

बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, २१ सप्टेंबर रोजी त्याचं आगमन राज्यात होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य-महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात २१ आणि २२ सप्टेंबर रोजी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या काळात हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. परंतु दक्षिण मध्य-महाराष्ट्र आणि दक्षिण-मराठवाड्यात पावसाची शक्यता कमी राहील. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचं नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावं, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात जळगावरोडवरील केऱ्हाळा फाटा इथं पुण्याहून रावेरला जाणाऱ्या एसटी बस आणि पिक अप गाडीचा अपघात झाला. या अपघातात पिकअप गाडीचा क्लिनर गंभीर जखमी झाला असून बसमधील अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचं वडोद बाजार पोलिसांनी सांगितलं. 

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या दुर्लक्षित ऐतिहासिक दरवाजे आणि पर्यटन स्थळांच्या संवर्धनासाठी उद्या आणि परवा शनिवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये सर्वप्रथम या ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेनं प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. शहरातल्या नागरिकांनी या ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन करण्यासाठीच्या मोहिमेत जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन महापालिका आयुक्त निपुण विनायक यांनी केलं आहे.

****

चीनमधल्या चँगझू इथं सुरु असलेल्या चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू उपान्त्य पूर्व फेरीत पोहोचली आहे. पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि बी सुमित रेड्डी यांच्या जोडीला आणि मिश्र दुहेरीत एन सिक्की रेड्डी आणि प्रणव जेरी चोप्रा यांच्या जोडीला दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला.

//**********//


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...