Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 September 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
भारत
आणि पाकिस्तानदरम्यान न्यूयॉर्क मध्ये होणारी चर्चा भारतानं रद्द केली आहे. परराष्ट्र
व्यवहार मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. सीमेवर भारतीय जवानांच्या निर्घृण हत्येच्या
पार्श्वभूमीवर ही चर्चा रद्द करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान,
जम्मू काश्मीरमधल्या एकाही पोलिसानं राजीनामा दिला नसल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं
दिली आहे. काही दहशतवादी संघटनांनी पोलिसांना नोकरी सोडा, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम
होतील, अशी धमकी दिली होती. तीन पोलिस कर्मचाऱ्यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्यानं
काही पोलिसांनी राजीनामा दिल्याचं वृत्त प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयानं
हे स्पष्टीकरण दिलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या ३० सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४८वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या
सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर,
माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲपवर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं
आहे.
****
राज्यात
विविध विकासात्मक प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून, उद्योग विस्तारासाठी आवश्यक असणाऱ्या
पायाभूत सुविधांचं जाळं विस्तारण्यात राज्य अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आज ऑस्ट्रेलियन गुंतवणूक सल्लागार शिष्टमंडळाच्या
बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या या विकासात्मक प्रकल्पांमध्ये ऑस्ट्रेलियन गुंतवणुकदारांनी
गुंतवणूक करावी, असं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी, राज्याचा आर्थिक ताळेबंद मजबूत असल्यानं
राज्यात होणारी परकीय गुंतवणूक सुरक्षित आहे असा विश्वास उपस्थितांना दिला. ऑस्ट्रेलिया
देशातल्या गुंतवणूक सल्लागार मंडळानं राज्यात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सामाजिक
न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात अनुसूचित जाती
आणि नवबौध्द घटकातल्या तब्बल एक लाख एक हजार ७१४ गरीब नागरिकांना घरकुलं मंजूर करण्यात
आली असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं.
ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. घरकुलांसाठी प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येनं मंजुरी
देण्यात आल्याचं ते म्हणाले.
****
भंडारा
आणि गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाला आज सकाळपासून सुरवात झाली असून, दोन्ही जिल्ह्यातल्या
सर्वच तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं
विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं
वर्तवला होता. त्याप्रमाणे सुरु झालेल्या या पावसामुळे बळी राजा सुखावला असून, वातावरणात
गारवा निर्माण झाला असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. मराठवाड्यात आज पावसाचं
वृत्त नाही.
****
वाशिम
जिल्ह्यातल्या कारंजा इथले हुतात्मा जवान सुनिल धोपे यांच्या पार्थिव देहावर आज कारंजा
इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. १५ सप्टेंबरला शिलाँग इथं कर्तव्य बजावत
असताना त्यांचा मृत्यू झाला होता. धोपे यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर
घातपाताचा आरोप केल्यानंतर, शिलॉंग इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर धोपे कुटुंबानं जवान सुनील धोपे यांचं पार्थिव स्विकारलं
होतं.
****
सातारा
जिल्ह्यातल्या खंडाळा तहसील कार्यालयातला लिपिक अरुण अहिरे याला आज ५० हजार रुपयांची
लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. जमिनीच्या सातबारावर असणारी नोंद कमी करण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
औरंगाबादनजिक
चिकलठाणा औद्योगिक वसाहत- एमआयडीसी मधल्या एका कंपनीत आज दुपारी आग लागली. अधिकृत सुत्रांनी
दिलेल्या माहितीनुसार, आनंद इंडस्ट्रीज असं या कंपनीचं नाव आहे. अग्नीशमन दलाच्या मदतीनं
आग आटोक्यात आणण्यात आली.
****
आशिया
चषक क्रिकेट स्पर्धेत ‘सुपर फोर’मध्ये भारत आणि बांग्लादेश यांच्यादरम्यान सुरु असलेल्या
सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा बांगलादेशच्या ११व्या षटकांत तीन बाद ४८ धावा
झाल्या होत्या. भुवनेश्वर कुमार, रविंद्र जडेजा आणि जसप्रित बुमराहनं हे तीन बळी घेतले.
दुबईत सुरू असलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
घेतला.
****
चीनमधल्या
चँगझू इथं सुरु असलेल्या चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं एकेरीतलं आव्हानही आज संपुष्टात
आलं. पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत के श्रीकांतला जपानच्या केन्टो मोमोटाकडून
२१ - नऊ, २१ - ११ असा पराभव पत्करावा लागला. तर महिला एकेरीत पी व्ही सिंधूचा चीनच्या
चेन युफेईनं २१ - ११, ११ - २१, २१ - १५ असं पराभूत केलं.
****
No comments:
Post a Comment