Friday, 21 September 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 21.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21  September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



जम्मू काश्मीरमधून दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या तीन पोलिसांचे मृतदेह शोपिया भागात सापडले आहेत. कापरान, बाटागुंड आणि शोपिया भागातून दहशतवाद्यांनी काल तीन पोलिसांसह एका पोलिस कर्मचाऱ्याच्या भावाचं अपहरण केलं होतं. तिघांची हत्या करुन पोलिस कर्मचाऱ्याच्या भावाला दहशतवाद्यांनी सोडून दिलं. कालपासून हे पोलिस बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचं अपहरण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांच्या संघटनेनं पोलिसांना नोकरी सोडण्यासंबंधी धमक्या दिल्या होत्या. दरम्यान, हिजबुल मुजाहीद्दीन या दहशतवादी संघटनेनं त्याच्याशी संबंधित ट्विटर अकाउंटवरुन या अपहरण आणि हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

भारतासाठी पाच वर्षांच्या महत्वाकांक्षी भागिदारी आराखड्याला जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे. भारताच्या उच्च, शाश्वत आणि समावेशी वाढीच्या उद्दिष्टांना त्यामुळे पाठबळ मिळणार आहे. साधनसंपत्तीसमृद्ध आणि समावेशी वाढ, रोजगार निर्मिती आणि मानवी भांडवलाची उभारणी यासारख्या महत्वाच्या विकास प्राधान्यांची पुर्तता करून, उच्च मध्यमवर्गीय उत्पन्न गटातला देश बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देणं हा यामागचा उद्देश आहे. या आराखड्यानुसार जागतिक पुनर्बांधणी आणि विकास बँक, आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि विविधांगी गुंतवणुक हमी यंत्रणा यांच्याकडून २५ ते ३० अब्ज डॉलरचं अर्थसहाय्य मिळणं अपेक्षीत आहे.

****

एकाच व्यक्तीला वेगवेगळया प्राधिकरणांकडून एकापेक्षा जास्त चालक परवाने मिळाले आहेत का? याची तपासणी करण्याच्या दृष्टीनं सरकार वाहन चालक परवान्यांची आकडेवारी गोळा करणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन नितीन गडकरी यांनी काल दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली. भारतात सध्या वाहन चालक परवाना मिळवणं सोपं असून, काही जणांकडे वेगवेगळया राज्यांमधून मिळवलेले परवाने आहेत. त्यामुळे चालकांची संख्या जास्त दिसत असली तरी, सध्या किमान २२ लाख चालकांचा तुटवडा भासत आहे. तो भरुन काढण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार केलं जात आहे. चालकविरहित गाडयांना परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

****

नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी सर्व विमान कंपन्या, विमानतळं, विमान उड्डाण प्रशिक्षण संस्था तसंच देखभाल यंत्रणाच्या सुरक्षेचं ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. जेट एअरवेजच्या विमानातले चालक दलाचे सदस्य हवेच्या दाबावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सुरु करायला विसरले, त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या सुमारे ३० प्रवाशांच्या कान आणि नाकातून रक्तस्त्राव झाल्याची घटना काल घडली. या पार्श्वभूमीवर प्रभू यांनी सुरक्षेचं ऑडीट करून ३० दिवसांच्या आत अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत.

****

केंद्रीय गृह मंत्रालय आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो यांनी आणीबाणीच्या कारवाईसाठी गृह मंत्रालयात अत्याधुनिक एकत्रित नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा कक्ष स्थापन करण्यासाठी इस्रो तांत्रिक कौशल्य उपलब्ध करुन देणार असल्याचं मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. हा कक्ष आपत्ती व्यवस्थापनासह अंतर्गत सुरक्षेसाठीही मदत करणार आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या जयसिंगपुरा वॉर्डचे माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सलीम यासिन खान उर्फ सलिम मौला यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. विद्यमान नगरसरवक अफसर खान यांचे ते ज्येष्ठ बंधु होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी पाच वाजता जयसिंगपुरा कब्रस्थान इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. 

****

औरंगाबाद महानगरपालिका आणि इतिहासप्रेमी नागरिकांतर्फे आज शहरातल्या ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांच्या संरक्षण आणि स्वच्छतेसाठी जनजागृती मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, तसंच विविध स्पर्धा घेण्यात आल्या. आज आणि उद्या ही मोहीम राबवली जात असून, आज याअंतर्गत ऐतिहासिक बीबी का मकबरा, मकाई गेट, भडकल गेट, छत्रपती शिवाजी महराज पुराण वस्तु संग्रहालय, रंगीन दरवाजा, हुतात्मा स्मारक आदी ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांवर जनजागृती मोहीम राबवण्यात आली. महापालिका आयुक्त निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत महापालिकेतर्फे गेल्या सात दिवसांपासून या स्थळांवर स्वच्छता मोहीमही राबवण्यात येत आहे.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोरमध्ये आज दुबईत भारताचा सामना बांग्लादेशविरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं स्पर्धेतील प्रारंभीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आजच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान लढत होणार आहे.

//***********//


No comments: